जाणून घ्या उन्हाळी कालावधीत उष्णता विकारांपासून स्वतःचा कसा बचाव करावा व योग्य उपचार करावेत
मुंबई, दि. ९: सद्यस्थितीत मार्च महिन्यापासून राज्यातील अनेक भागांत तापमान वाढताना दिसत आहे. ही उष्णतेची लाट किंवा हीट वेव्ह म्हणजे एक मूक आपत्ती (सायलेंट डिझास्टर) आहे. सर्वसाधारणपणे एखाद्या प्रदेशात नेहमीच्या कमाल तापमानापेक्षा वातावरणातील तापमान ३ अंश सेल्सियसने सलग तीन दिवस जास्त असेल तर त्याला ‘उष्णतेची लाट’ असे संबोधले जाते. अथवा एखाद्या भागात सलग दोन दिवसांसाठी ४५ डिग्री सेल्शियस पेक्षा तापमान जास्त असेल तर त्या भागात उष्णतेची लाट आली आहे, असे म्हटले जाते.
साधारणपणे मार्च ते जून या मान्सून पूर्वकाळात या उष्णतेच्या लाटा येताना दिसतात. वातावरणाचे तापमान ३७ डिग्री सेल्सियस असते तोपर्यंत मानवाला त्याचा तितकासा त्रास होत नाही. मात्र त्यानंतर मात्र मानवी शरीर वातावरणातील उष्मा शोषून घेऊ लागते आणि त्याचे विपरित परिणाम मानवाच्या शरीरावर होऊ लागतात. तापमान आणि आर्द्रता यांचा मिळून होणारा परिणाम अधिक जास्त असतो.
अति जोखमीच्या लोकांची उष्णतेच्या लाटे संदर्भात विशेष काळजी घेतली पाहिजे. यामध्ये – उन्हात बाहेर कष्टाची कामे करणारे लोक, वृध्द नागरिक आणि लहान मुले, स्थूल नागरिक, अयोग्य कपडे घालेले लोक, पुरेशी झोप न झालेले लोक, गरोदर महिला, अनियंत्रित मधुमेह, हृदयरोग असलेले लोक, अपस्मार रुग्ण, दारुचे व्यसन असलेले लोक, काही विशिष्ट औषधे घेत असलेले लोक तसेच निराश्रित, घरदार नसलेले गरीब लोक यांनी विशेष काळजी घेतली पाहिजे.
उष्णतेमुळे होणारा शारीरिक त्रास हा मुख्यत्वे किरकोळ स्वरुपाचा त्रास किंवा गंभीर स्वरुपाचा त्रास या प्रकारचा असतो. किरकोळ त्रासात उष्णतेमुळे शरीरावर रॅश उमटणे, हाता-पायाला गोळे येणे, चक्कर येणे तर गंभीर प्रकारात उष्माघाताचा समावेश होतो. साधारणपणे उष्णतेमुळे अशा स्वरूपातला त्रास झाल्यास त्या अनुषंगाने प्रथमोपचार करावेत. यामध्ये –
(1) सनबर्न उष्णता विकारात कातडी लालसर होणे, सूज येणे, वेदना, ताप आणि डोकेदुखी ही लक्षणे आढळत असून त्यावर प्रथमोपचार करताना साधा साबण वापरून आंघोळ करावी, घामास अडथळा करणारा कातडीवरील तेलकटपणा दूर करावा, कातडीवर फोड असतील तर वैद्यकिय सल्ला घ्यावा.
(2) उष्णतेमुळे स्नायूंमध्ये गोळे येणे (हिट क्रॅम्पस) अशा स्वरूपाच्या उष्णता विकारात हातापायात गोळे, पोटाच्या स्नायूत मुरडा, खूप घाम अशी लक्षणे आढळत असून अशा रुग्णाला सावलीत आणि थंड जागी हलवावे, दुखणाऱ्या स्नायूला हलका मसाज द्यावा तसेच उलटी झाली तर पाणी देऊ नये.
(3) उष्णतेमुळे प्रचंड थकवा (हिट एक्झॉस्टेशन) विकारात खूप घाम, थकवा, कातडी थंडगार, नाडीचे ठोके मंद, डोकेदुखी, चक्कर, उलटी ही लक्षणे आढळत असून या रूग्णाला थंड जागी शक्यतो एसी मध्ये झोपवावे, अंगावरील कपडे सैल करावेत, ओल्या व थंड फडक्याने अंग पुसून घ्यावे, थोडे थोडे पाणी पाजत रहावे तसेच उलटी होत असेल तर पाणी देऊ नये व दवाखान्यात हलवावे.
(4) उष्माघात (हिटस्ट्रोक) विकारात ताप (१०६ डि.फॅ.), कातडी – गरम आणि कोरडी, नाडीचे ठोके – वेगात आणि जोरात, घाम नाही, अर्धवट शुध्द अशी लक्षणे आढळत असून अशा रुग्णाला तात्काळ दवाखान्यात भरती करणे आवश्यक आहे. थंड जागी/एसी मध्ये कपडे काढावेत, थंड पाण्याने अंघोळ किंवा स्पन्जिंग करावे, तोंडाने पाणी देऊ नये.
उष्णतेपासून बचाव करण्यासाठी पुरेसे पाणी प्यावे. प्रवासात पाणी सोबत ठेवावे. हलक्या वजनाचे, फिकट रंगाचे, सैलसर कपडे वापरावेत. उन्हात गॉगल, छत्री, पादत्राणे वापरावीत. उन्हात जाताना टोपी/हॅटखाली ओलसर कपडा ठेवावा. पाळीव प्राण्यांना सावलीत, थंड ठिकाणी ठेवावे. ओलसर पडदे, पंखा, कुलर यांच्या मदतीने घर थंड ठेवावे.
त्याचप्रमाणे – शक्यतो उन्हाच्या वेळेत घराबाहेर जाणे टाळावे. कष्टाची कामे उन्हात करु नये. पार्क केलेल्या वाहनात लहान मुलांना ठेवू नये. गडद रंगाचे, तंग कपडे वापरू नये. उन्हाच्या काळात स्वयंपाक करणे टाळावे. स्वयंपाकघर हवेशीर ठेवावे. मद्य, चहा, कॉफी, सॉफ्ट ड्रिंक्स घेणे टाळावे. जास्त प्रथिनयुक्त अन्न आणि शिळे अन्न खाऊ नये.
नागरिकांना उष्णता विकारांची लक्षणे आढळल्यास किंवा याबाबत अधिक माहिती हवी असल्यास आपल्या नजीकच्या शासकीय रुग्णालयाशी किंवा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा. आरोग्य विभागाच्या वतीने अशाच स्वरूपातले आवाहन करण्यात आले आहे.