सूरसम्राज्ञी आशा भोसले यांना अखेरचा निरोप; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
मुंबई, दि. १३ : ज्येष्ठ पार्श्वगायिका, पद्मविभूषण तसेच महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित आशा भोसले यांचे १२ एप्रिल २०२६ रोजी वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दादर शिवाजी पार्क येथील कै. भागोजी कीर हिंदू स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस दलाकडून बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली.
अंत्यसंस्कारावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मंत्री छगन भुजबळ, आशिष शेलार, शंभूराज देसाई, भरतशेठ गोगावले, संजय शिरसाट यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. तसेच लोकप्रतिनिधी, कलावंत, अधिकारी आणि मोठ्या संख्येने चाहते यांनीही उपस्थित राहून पुष्पचक्र अर्पण करत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून पाठविण्यात आलेले पुष्पचक्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार्थिवावर अर्पण करण्यात आले.
सोमवारी सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० या वेळेत दिवंगत आशा भोसले यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. या वेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार सुप्रिया सुळे, प्रणिती शिंदे, प्रफुल्ल पटेल, अरविंद सावंत तसेच आमदार आदित्य ठाकरे, भाई जगताप, सुनील शिंदे, मिलिंद नार्वेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि चाहत्यांनी उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
भारतीय संगीत क्षेत्रात अनेक दशकांपासून आपल्या सुरांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आशा भोसले यांच्या निधनामुळे कला क्षेत्रात शोककळा पसरली आहे. विविध भाषांतील आणि शैलीतील त्यांच्या बहुआयामी गायनामुळे त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनाने भारतीय संगीतविश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
