Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

Breakup घेऊन स्वत:ला आणि त्या व्यक्तीला मोकळं करता आलं असतं; पण…

“Breakup घेऊन स्वत:ला आणि त्या व्यक्तीला मोकळं करता आलं असतं; पण…” वाचा अनैतिक संबंधांवर आधारित, अपूर्व विकास यांचा लेख

चीटिंग…!

– “मी… एक घोळ घातलाय.”
– “हो. ऐकलं मी.”
– “ऐकलंस?”
– “हो. कुणाबरोबर घातलास तेही ऐकलं. कुणाशी प्रतारणा करून घातलास, त्याच व्यक्तीच्या तोंडून ऐकलं.”
– “मला… माझी रिलेशनशिप cure करायचीये.”
– “ओरिजिनल वाली? का ही, side-business प्रकारातली?”
– “अॉफ कोर्स ओरिजिनल वाली. अतिशहाणपणा करू नकोस.”
– “Cure? का? रिलेशनशिप आजारी आहे?”
– “हे बघ… माझं पार्टनर – ओरिजिनल वालं – खूप दु:खात आहे. जे झालंय ते… मला रिपेअर करायचंय.”
– “रिपेअर करणारं तू कोण?”
– “का? असं वाटण्याचा मला अधिकार नाही का?”
– “नाही म्हणजे – वाटत असेल तर उत्तम आहे; पण आपला फोकस जरा चुकलाय. कसंय, मच्छर मलेरियावर उपचार करत नाहीत; ते मलेरियाचा प्रसार करतात.”
– “ए, excuse me. मला ना, तुझ्यासारख्यांचा राग येतो… जरा संधी मिळाली की लगेच मॉरल पोलिसिंग सुरू… माहितीये मला – मी जे केलं ते समाजमान्य नाही; पण यामागची कारणं लक्षात घेतली जातात का कधी? तुला माहितीये का, माझं पार्टनर ही व्यक्ती कशी आहे? So… cold. So… dull. मी… मी उपाशी आहे, अनेक बाबतीत. म्हणजे ना, की -”
– “थांब. इथेच थांब. कारणांची लिस्ट मोठी असेल तुझ्याकडे, माहितीये मला. पार्टनरच्या दुर्गुणांचा पाढा वाचायचा; आपण कित्ती उपासमार सहन केल्ये ते ऐकवायचं; आणि मग जे इथे मिळालं नाही ते दुसरीकडे available होतं म्हणून घेतलं, हे सांगून स्वत:ची कृती justify करून घेण्याची कला तू एव्हाना आत्मसात केली असशीलच. तुला हवी असलेली सहानुभूती मी देणार नाही. पण तुझ्या लक्षात न आलेली एक गोष्ट लक्षात आणून देईन.”
– “कोणती?”
– “रिलेशनशिपमधल्या cheating चा विषय येतो, त्यावेळी बहुतेकवेळा ‘पहिलं असताना दुसरं धरलं’ यावर फोकस जातो. मी मात्र ‘दुसरं धरताना पहिलं सोडलं नाही’ यावर फोकस करेन. हा शब्दांचा खेळ नीट लक्षात घे. इथे विषय खोलात जातो.”
– “कसा?”
– “तुझ्या मूळच्या पार्टनरकडे ढीगाने दुर्गुण असतील. किंवा आवश्यक सद्गुणांचा अभाव असेल – whatever. मुद्दा हा आहे, की जर तुझी शारीरिक/भावनिक उपासमार होत होती, तर तू त्यावर केलंस काय? पार्टनरशी संवाद साधलास? Maybe. Maybe not. तू प्रयत्न केला असशील, आणि पार्टनरने दाद दिली नसेल, तर समुपदेशनाचा पर्याय होता. निवडलास? जर यातल्या कशालाच पार्टनरने दाद दिली नसती, तर तुला स्वत:च्या गरजांचा आदर ठेवून, त्याबद्दल पार्टनरशी समोरासमोर बसून बोलून, रीतसर रिलेशनशिप थांबवण्याचा निर्णय घेता आला असता. आणि मग एक अध्याय संपवून, नवा गडी, नवं राज्य करता आलं असतं. पण तू तसं केलं नाहीस. तुला बाहेर जे नवं उपलब्ध होतं, ते तर हवं होतंच; पण त्याचबरोबर पहिलंही चालू ठेवायचं होतं. लक्षात घे, हा तुझा choice होता.”

– “अं… हो.”
– “आणि इथे सगळा विषय फिरतो. या gameचा काहीएक pay-off होता. ज्याअर्थी तुला पहिलं चालू ठेवायचं होतं, त्याअर्थी पार्टनरच्या कमतरतांपलीकडे त्याच व्यक्तीकडून तुला असं काहीतरी मिळत होतं, जे तुला हवं होतं. आणि ते तुला सोडायचं नव्हतं. तुझ्या भूमिकेतल्या प्रत्येकाची याबाबतीत स्वत:ची वेगवेगळी कारणं असतात. कुणासाठी, ‘काहीही झालं तरी तिचं केअरिंग नेचर वादातीत आहे’ असं असतं. कुणासाठी, ‘ती माझ्या जेवणाची सोय आहे’ हा सरळ हिशेब असतो. कुणासाठी, ‘तो माझा ATM आहे’ ही गरज असते. कुणासाठी ‘माझा side-businessवाला सेक्सच्या बाबतीत रांगडा आहे; पण माझ्या नवऱ्यात ना, एक हळुवारपणा आहे, जो कधीकधी मलादेखील हवा असतो’ असं असतं. काहीही असू शकतं. तुमचं लग्न झालं असेल आणि कुटुंब पारंपरिक पठडीतलं असेल, तर लग्नासोबत कौटुंबिक, सामाजिक, सांस्कृतिक बंधनं असतात; ती बंधनं पाळण्याचा देखावा केला म्हणून एक प्रतिष्ठा असते; सामाजिक सुरक्षा असते; जी सोडायची नसते. मुद्दा हा आहे, की काहीतरी मिळत असतं; आणि म्हणून दुसरं धरताना पहिलं सोडलं जात नाही. खरंतर स्वत:च्या गरजांशी प्रामाणिक राहून, त्यांच्या पूर्तीसाठी, प्रॉपर breakup/divorce घेऊन या सगळ्याची किंमत चुकवण्याची हिंमत करतातही काही; पण आपण त्यातले नाही. आता पहिल्यात कोणत्या कमतरता होत्या याला अर्थच उरत नाही; कारण न सोडण्याचा निर्णय आपलाच असतो.”
– “हो… बरोबर आहे…”
– “तुझ्या गप्पा चालल्यात रिलेशनशिप cure करण्याच्या. इथे cure चा विषयच नाही; इथे growth हवीये. वाढ हवीये. तुझं वागणं लहान मुलासारखं होतं. हातात एक खेळणं असताना दुसरं दिसलं. ते घेतलं; पण पहिलं सोडलं नाही. तुझं पार्टनर खेळणं नाही. व्यक्ती आहे. भावना आहेत त्या मनाला. तू त्या भावनांना गृहीत धरलंस. Breakup घेऊन स्वत:ला आणि त्या व्यक्तीला मोकळं करता आलं असतं; पण तसं न करता ‘मला हेही हवं आणि तेही हवं’ यासाठी विश्वासाला खुंटीवर लटकवलंस. आणि आता बिंग फुटलंय तर स्वत:वर फोकस करण्याऐवजी रिलेशनशिपलाच आजारी ठरवून आणखी वर मानभावीपणा चालू आहे तुझा.”
– “पण मग मी आता काय करू?”
– “प्रथम पार्टनरची नीट माफी माग. ती का मागितली जातीये ते सांगून. घोळ आपण घातलाय, आपल्यासाठी. ते मान्य करून. पार्टनरची वेदना तुला जाणवलीये, हे शब्दात सांगून. माफी लगेच मिळावी ही इच्छा बाजूला ठेवून. आणि मग स्वत:च्या वैचारिक वृद्धीसाठी प्रयत्न चालू व्हायला हवेत. माफी मिळालीच तर ती या उन्नत व्यक्तीला मिळेल, लक्षात घे. थोडा वेळ वेगळंच हो. स्वत:ला ओळख. आपल्याला काय हवंय ते समजून घे. हवं असलेलं सगळंच मिळणार नाही हेही समजून घे. ते स्वीकार. त्यातलं आपल्याला उत्कटतेने काय हवंय, त्याच्याशी प्रामाणिक राहा. आणि त्याबदल्यात, जे मिळणार नाही, ती किंमत समजून, ती चुकवण्यासाठी स्वत:च्या भावना सक्षम कर. या सक्षमतेमध्ये, शक्य इच्छांच्या पूर्तीसाठी कष्ट, आणि काही इच्छांच्या अशक्यतेचा स्वीकार, हे दोन्ही येतं. संयम शीक. यापुढे कोणाहीबरोबर रिलेशनशिपमध्ये येताना ही समज घेऊन यायचंय. मग ते माणूस नवं असो वा जुनं. या सगळ्यात थोडा अवधी जाऊदेत. तुझ्या पार्टनरलाही स्वत:च्या भावनिक व्यवस्थापनासाठी तो वेळ गरजेचाय.”
– “हो. करेन मी हे.”
– “…आणि मग, भविष्यात कधीतरी, एखाद्या डिसेंबरातल्या सकाळी, थंडीतल्या ऊन्हात, पुन्हा एकदा, नव्याने, टोटली अनोळखी असल्याप्रमाणे एकमेकांना भेटा. त्यावेळी तुम्ही दोघेही नव्या, आतापेक्षा वेगळ्या व्यक्ती असाल. ही भेट भूतकाळाची आठवण आणि भविष्याच्या अपेक्षा पूर्ण बाजूला ठेवून व्हायला हवी. आणि, मग बघा… कसं वाटतंय… काय जाणवतंय… नवं काही गवसतंय का… जुनं काही राहिलंय का… हवं असलेलं काही दिसतंय का… नको असलेलं काही विरलंय का… कदाचित, दोघांच्या या नव्या रुपात सक्षम नात्याचे बंध शक्य असतीलही… कदाचित, पूर्वीपेक्षा टोटली वेगळी स्पंदनं सापडतीलही, ज्यात दुसरीकडे नजर जाण्याच्या शक्यता उरणारच नाहीत… किंवा कदाचित – यातलं काहीच न होता, एक closure मिळेल; एक cycle पूर्ण झाल्याचा भाव मिळेल; दोघे हसाल, हस्तांदोलन कराल, आणि मोकळ्या मनाने निरोप घेऊन दोन वेगळ्या दिशांकडे पावलं पडू लागतील… आणि कदाचित, तरीही — अवचित परत थांबून मागे वळून पाहाल, आणि नजरा तो क्षण लांबवायला एक सूक्ष्म होकार देतील – who knows…?”

© अपूर्व विकास
समुपदेशक आणि मानसशास्त्र तज्ज्ञ
8928183848
7774917184 (WhatsApp)

 

(Disclaimer: सदर लेखातील मते हि लेखक/लेखिकेची स्वतःची मते आहेत. न्युज पोर्टल फक्त एक माध्यम आहे.)

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *