Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

तटबंद यशस्वी ! जिवंत राहायचंय आणि जगायचंय

तटबंद यशस्वी ! जिवंत राहायचंय आणि जगायचंय

जिवंत राहणं, म्हणजे survival.
जगणं, म्हणजे जीवन-ध्येयांची पूर्ती. प्रगती. वृद्धी. यश.
जिवंत राहिल्याशिवाय जगणं होणार नाही. अर्थपूर्ण जगल्याशिवाय नुसतं जिवंत राहण्यात मजा नाही.
लक्ष दोन्हीकडे. एकाच वेळी.

Survival साठी निसर्गनियम समजावून घेणं गरजेचंय. चार्ल्स डार्विनने उत्क्रांतिवादात सांगून ठेवलंय, “Survival of the fittest; elimination of the weak.” जो जमवून आणतो तो टिकतो; बाकीचे मार खातात. विषय संपला.

Predator म्हणजे शिकारी.
Prey म्हणजे सावज.
“शिकारी का आहेत?” याचं उत्तर “सावजं उपलब्ध आहेत, म्हणून.” ससे आहेत म्हणून लांडगे आहेत. मुद्दा हा आहे, की “ससा असणं” आणि “लांडगा असणं” एवढेच पर्याय उपलब्ध आहेत का? नाही. मार्जारकुळाने स्वत:ला उत्क्रांत करून “सिंह असणं” हा पर्यायही उपलब्ध करून दिलाय. तुम्ही जंगलाचे राजे होऊ शकता. पण तिथे परत अडचण येते. तरसांचा कळप एकट्या सिंहावर हल्ला करतो, तेव्हा त्याच्या राजेपणालाही जीव वाचवण्यासाठी शिकार तरसांच्या हवाली करून पळ काढण्याचं शरमिंदेपण स्वीकारावं लागतं.

अनुकूलन क्षमतेचा खरा दावेदार आहे, तो म्हणजे हत्ती. बुलंदता कशी ती हत्तीकडून शिकावी. जंगलातल्या सर्वात जास्त काळ जगणाऱ्या प्राण्यांपैकी एक म्हणून उत्क्रांतीने त्याला मान्यता दिलीय; यावरूनच त्याच्या सक्षमतेची पावती मिळते. तो त्याच्या भारदस्त चालीने त्याच्या डौलात चालत येतो. दिमाखात वावरतो. त्याच्यावर चाल करून येण्याची हिंमत करत नसतं कुणी. तो लढत नाही. तो उचलून फेकून देतो. पाठीचे कणे फुटतात; माना तुटतात. परवडत नाही कुणाला. तो गर्जना नि डरकाळ्या काढत नाही. स्वत:च्या ताकदीचं प्रदर्शन नसतं त्याचं. गरज वाटत नाही. स्वत:ची असुरक्षितता झाकण्यासाठी दुसऱ्यांना घाबरवणारे पाहून तो मनोमन हसतो. पोरखेळ वाटतात त्याला ते. त्याला राज्य वगैरे करण्यात उत्साह नसतो; परत तेच – गरज नसते. जे कमकूवत आहेत त्यांच्या अशक्तपणाला वेठीस धरून सत्ता गाजवण्याचा लोचटपणा करण्यात क्षणभर मजा असते; पण इतर सत्तापीपासूंचे दात मानेत घुसण्याची भीतीही क्षणोक्षणी असते. त्यापेक्षा स्वत:च्या ताकदीला हरक्षणी वाढवत नेऊन तिला पूर्णत्वाने व्यक्त करण्यातली मजा त्याला माहीत असते. तो शिकार करत नाही. स्वत:ची भूक भागवण्यासाठी दुसऱ्यांचे जीव घेण्यात कुजकट मजबुरी असते; त्यात कौतुकाचं काहीही नसतं. तो झाडपाल्यावर पोट भरतो. इतरांना जगू देतो.

शक्तिशाली हत्ती

आपण हत्ती व्हायला हवं.
“त्रास कुणाला दिला जातो?” या प्रश्नाचं सोपं उत्तर हेच, की “जो मार खाण्यासारखा असेल त्याला.” लढाऊ व्हायला हवं; पण तेवढं पुरेसं नाही. शत्रूचा लढाईत पराभव कराल; पण त्याने त्याला पुन:पुन्हा हल्ला करण्याची ईर्ष्या मिळेल. त्याला ठार करालही; पुढे त्याचं पोरगं बदला घ्यायला येईल. मग नातू. हे अव्याहत चालू राहील. त्यापेक्षा आपल्या किल्ल्याला भरभक्कम तटबंदी करा. आक्रमणाचे इरादे तिथे ढेपाळतात. व्यक्तिमत्वाला भरभक्कम करा. अनुभव, बुद्धी, अन् अक्कल वापरा. विचारात विवेक घ्या. विचारापुढे कृती असू द्या. मनाला सकारात्मक विचारांची आणि शरीराला व्यायामाची शिस्त येऊ द्या. जावा आणि डॉट नेट शिकणं हे आयुष्याचं इतिकर्तव्य नव्हे; स्व-संरक्षणाचेही धडे गिरवायला हवेत. उच्चाराला उपयुक्त तेच बोलण्याची आणि आचाराला सतत स्वत:च्या मर्यादा जिंकण्याची शिस्त येऊ द्या. आयुष्यात स्वत:च्या personal space मध्ये काम करून स्वत:ला सतत सक्षम करत राहा. दुनियादारी खड्ड्यात गेली. घराण्याचे, जातीचे नि धर्माचे बुळचट दुराभिमान फेकून द्या; स्वत:वर लक्ष ठेवून स्वत:ला मोठं करा. एकेक मर्यादा जिंकत गेल्यावर मनात एक स्वत्वशील, सात्विक शांत आत्मविश्वास निर्माण होतो. तो तुम्ही काही न बोलता इतरांनाही जाणवेल. मेंदूत विद्युतशक्ती आणि रासायनिक ऊर्जेमार्फत क्षणोक्षणी विचारतरंग (neurochemical signals) निर्माण होतात आणि इतरांच्या मेंदूपर्यंत पोचतात. तेच तुमची सक्षमताही इतरांपर्यंत पोचवतील. नेणिवेच्या पातळीवर (subconscious mind) घडतं हे. तिथे दुर्जन तुमच्या आसपास फिरकणारही नाहीत; तुम्ही त्यांच्या दमनवादाशी (bullyism) संयुक्तिक नसाल. तरस हत्तींच्या जास्त जवळ जात नाहीत.

Survival जमलं, की success सुद्धा जमतो. कारण survival जमवताना जे मिळवलंय, ते सूत्रबद्ध वापरात आणूनच success मिळतो. Implementation. जिवंत राहण्यासाठी जी कौशल्यं मिळवलीत, ती स्वत:च्या जागेत भानावर राहून विजीगीषु वृत्तीने invest करत राहायला हवं. Hard work गरजेचंय; पण ते म्हणजे विचार बंद करून गाढवमेहनत करणं नव्हे. Smart work सुद्धा महत्वाचंय; पण ते म्हणजे कष्टांतून पळवाटा शोधणं नव्हे. एका smart plan वर सातत्याने hard work करत राहण्यातून आपण उद्दिष्टापर्यंत पोचतो. तो smart plan करणं, म्हणजे आपण मिळवलेल्या आपल्याच बलस्थानांना जास्तीत जास्त उपयुक्ततेने वापरण्याचा आराखडा. जो इतरांहून अगदी भिन्न असेल. कुठलेही साचे नकोत. Patterns नकोत. इतरांचे फॉर्म्युले नकोत. ते आपल्याला चालणार नाहीत; गरजही नाही. हंस आपल्याच डौलात चालेल. यश मिळवणं, म्हणजे खरंतर स्वत:ला नैसर्गिकपणे व्यक्त होऊ देणं. दुनियेतल्या कौतुकाच्या सगळ्या चित्रकारांनी, खेळाडूंनी, अभिनेत्यांनी, उद्योजकांनी हेच केलंय. दिलखुलासपणे, आणि तरीही survival जमवताना मिळवलेल्या शिस्तीच्या सूत्रबद्धतेत स्वत:ला व्यक्त करत राहीले ते ! स्वत:च्या बलदंड व्यक्तिमत्वाला स्वत:च्या चालीत व्यक्त होऊ द्या; तुम्ही जिंकाल !

© अपूर्व विकास
समुपदेशक, मानसशास्त्र तज्ज्ञ
(निगडी, पुणे)
7774917184 (WhatsApp)

 

(Disclaimer: सदर लेखातील मते हि लेखक/लेखिकेची स्वतःची मते आहेत. न्युज पोर्टल फक्त एक माध्यम आहे.)

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *