“आवश्यक प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश” – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर
मुंबई/रत्नागिरी, दि. ४ : रत्नागिरी जिल्ह्यातील शासकीय आरोग्य संस्थांचा दर्जा उंचावण्यासाठी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक सक्षम व गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने आवश्यक विकासकामांना गती देण्याचा निर्णय घेतला आहे. खेड तालुक्यातील मौजे वावे, चिपळूण तालुक्यातील मौजे रामपूर तसेच गुहागर तालुक्यातील गुहागर आणि आबलोली येथील शासकीय आरोग्य संस्थांशी संबंधित प्रलंबित कामांबाबत आवश्यक प्रस्ताव तातडीने सादर करून त्यावर कार्यवाही करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.
विधान भवन येथे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत रत्नागिरी जिल्ह्यातील विविध शासकीय रुग्णालये व आरोग्य संस्थांच्या प्रलंबित प्रश्नांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीस आमदार भास्कर जाधव, आरोग्य विभागाचे आयुक्त संजय काटकर, आरोग्य सेवा संचालक डॉ. विजय कंदेवाड, सहसंचालक डॉ. सुनीता गोलाईत, सहसंचालक राजेंद्र भालेराव तसेच आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे रत्नागिरीचे जिल्हा शल्यचिकित्सक आणि कोल्हापूर विभागाचे आरोग्य उपसंचालकही सहभागी झाले.
बैठकीत खेड तालुक्यातील मौजे वावे येथील शासकीय रुग्णालयाच्या नवीन इमारतीसाठी आवश्यक अंदाजपत्रक, निधी मंजुरी, वैद्यकीय उपकरणांची उपलब्धता, जागेची स्थिती तसेच इतर पायाभूत सुविधांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या कामासाठी आवश्यक प्रस्ताव कोणताही विलंब न करता शासनाकडे सादर करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
चिपळूण तालुक्यातील मौजे रामपूर येथील श्रेणीवर्धित प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीसाठी किमान ६१ गुंठे जागेची आवश्यकता असून सध्या ३३ गुंठे जागा उपलब्ध आहे. उर्वरित जागेसाठी ग्रामपंचायतीच्या मालकीची सुमारे ४० गुंठे जागा उपलब्ध करून घेण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायतीशी समन्वय साधावा आणि नवीन इमारतीचे काम मार्गी लावावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
गुहागर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जुन्या इमारतीच्या जागी नवीन इमारत उभारण्याचा प्रस्ताव तातडीने तयार करून शासनाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच आरोग्य सेवा संचालक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित आरोग्य संस्थांना प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी करावी आणि रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य सुविधांशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचा विशेष बाब म्हणून विचार करून आवश्यक प्रस्ताव मुख्यमंत्री यांच्याकडे सादर करावेत, असेही मंत्री प्रकाश आबिटकर यांनी स्पष्ट केले.
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, “रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मौजे वावे, चिपळूण तालुक्यातील मौजे रामपूर तसेच गुहागर तालुक्यातील गुहागर व आबलोली येथील शासकीय आरोग्य संस्थांच्या विकासकामांना गती देण्यासाठी आवश्यक प्रस्ताव तातडीने सादर करावेत, तसेच बांधकाम, श्रेणीवर्धन, पदनिर्मिती, वैद्यकीय उपकरणांची उपलब्धता आणि इतर मूलभूत सुविधांबाबत तातडीने कार्यवाही करावी.”
तसेच त्यांनी पुढे सांगितले, “कोकणातील नागरिकांना दर्जेदार, सुलभ आणि वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून रत्नागिरी जिल्ह्यातील आवश्यक आरोग्य पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी सर्व संबंधित प्रस्तावांना प्राधान्याने गती दिली जाईल.”
राज्य शासन ग्रामीण आणि दुर्गम भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यावर भर देत असून नवीन इमारती, आधुनिक वैद्यकीय उपकरणे, आवश्यक मनुष्यबळ, पदनिर्मिती आणि मूलभूत सुविधांच्या बळकटीकरणाद्वारे सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक प्रभावी करण्यासाठी सातत्याने पावले उचलत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील प्रस्तावित कामे पूर्ण झाल्यानंतर स्थानिक नागरिकांना अधिक दर्जेदार आणि सुलभ शासकीय आरोग्य सेवा उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
