महाराष्ट्र विधान परिषदेच्या १६ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांसाठी द्वैवार्षिक निवडणूक जाहीर; १८ जून रोजी मतदान
मुंबई, दि. १९ : महाराष्ट्र विधान परिषदेतील १६ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांतील सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने भारत निवडणूक आयोगाने या जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच संबंधित मतदारसंघांमध्ये आचारसंहिता तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे.
राज्यातील सोलापूर, अहमदनगर, ठाणे, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, अमरावती, उस्मानाबाद-लातूर-बीड, परभणी-हिंगोली तसेच औरंगाबाद-जालना या १६ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांमध्ये ही निवडणूक होणार आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात निवडणूक घेण्यासाठी किमान ७५ टक्के स्थानिक स्वराज्य संस्था कार्यरत असणे आणि किमान ७५ टक्के मतदार अस्तित्वात असणे आवश्यक असते. संबंधित निकष पूर्ण न झाल्यामुळे या मतदारसंघांतील निवडणुका यापूर्वी घेण्यात आलेल्या नव्हत्या. मात्र, आता सर्व १६ मतदारसंघांमध्ये आवश्यक निकष पूर्ण झाल्याची माहिती महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने भारत निवडणूक आयोगाला कळविल्यानंतर आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
निवडणूक कार्यक्रमानुसार सोमवार, २५ मे २०२६ रोजी अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत सोमवार, १ जून २०२६ निश्चित करण्यात आली आहे. मंगळवार, २ जून रोजी उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येईल. तसेच गुरुवार, ४ जूनपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली आहे.
या निवडणुकांसाठी मतदान गुरुवार, १८ जून २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत होणार आहे. मतमोजणी सोमवार, २२ जून रोजी करण्यात येणार असून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया गुरुवार, २५ जून २०२६ पूर्वी पूर्ण केली जाणार आहे.
ज्या सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे त्यामध्ये प्रशांत परिचारक (सोलापूर), अरुणकाका जगताप (अहमदनगर), रवींद्र फाटक (ठाणे), चंदुभाई पटेल (जळगाव), मोहनराव कदम (सांगली-सातारा), अमरनाथ राजूरकर (नांदेड), दुष्यंत चतुर्वेदी (यवतमाळ), अनिल भोसले (पुणे), डॉ. परिणय फुके (भंडारा-गोंदिया), अनिकेत तटकरे (रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग), नरेंद्र दराडे (नाशिक), रामदास आंबटकर (वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली), प्रवीण पोटे (अमरावती), सुरेश धस (उस्मानाबाद-लातूर-बीड), विप्लव बाजोरिया (परभणी-हिंगोली) आणि अंबादास दानवे (औरंगाबाद-जालना) यांचा समावेश आहे.
दरम्यान, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींमध्ये या निवडणुकांबाबत उत्सुकता वाढली असून विविध राजकीय पक्षांकडून संभाव्य उमेदवारांच्या नावांची चाचपणी सुरू झाली आहे. आगामी काळात या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवरील राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
