Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

जाणून घ्या का “अक्षर मानव माणूस संमेलन” इतर संमेलनांपेक्षा हटके आहे

जाणून घ्या का “अक्षर मानव माणूस संमेलन” इतर संमेलनांपेक्षा हटके आहे



|| अक्षर मानव माणूस संमेलन, दहा ||

‘अक्षर मानव’ संघटनेकडून दर वर्षी माणसांचं एक संमेलन भरवलं जातं. दर वर्षीच्या संमेलनाला एक विषय किंवा एक नाव दिलं जातं. किंवा असं म्हणूया की, एक माणसाच्या जगण्यातली संकल्पना दिली जाते, आणि त्या संकल्पनेच्या भोवती पूर्ण तीन दिवस गप्पा मारत, चर्चा करत, त्या संकल्पनेचा आनंददायी आणि तेवढाच गंभीर, जगण्याला उपयुक्त उलगडा करत हे संमेलन चालतं.

*संमेलनाचा मुख्य उद्‌देश आहे, माणसाला माणूस जोडणं. त्यामुळं कसला भेदाभेद न करता, सर्व क्षेत्रांतली, सर्व भागांमधली, सर्व गटातटांची माणसं इथं येतात. या संमेलनात सहभागी होणारी सर्वच्या सर्व माणसं तीन दिवस एकत्र राहतात आणि एकमेकांशी सतत बोलत एकमेकांना जाणून घेत असतात.या संमेलनाचा कसलाही गाजावाजा केला जात नाही, पण हस्ते-परहस्ते महाराष्ट्रभर निरोप दिले जातात व माणसं जमतात. संमेलनाचं कुणालाही कसलंही निमंत्रण दिलं जात नाही. मानापानाच्या कसल्याही कल्पना राबवल्या जात नाहीत. सगळी माणसं समान आहेत आणि माणसं माणसाकडं जातातच या विश्वासावर माणसं जमतात. प्रत्यक्ष संमेलनातही फारशा औपचारिकता नसतात. उद्‌घाटन, अध्यक्ष, दीपप्रज्वलन, प्रतिमापूजन, हारतुरे काही नसतात. जमलेल्या सर्व लोकांमधून, ऐन वेळी-कसलीही नियोजित कार्यक्रमपत्रिका तयार न करता – एका व्यक्तीला बोलावलं जातं आणि एका खुर्चीत बसवून, तिला हव्या त्या विचारावर बोलू दिलं जातं. त्या व्यक्तीशी समोर बसलेले लोक मुक्तपणे संवाद करतात आणि असं सलग तीन दिवस चालतं. माणसांनी एकमेकांना आस्थेनं समजून घेण्यासाठी, माणूस घडवण्यासाठी आणि माणसांमध्ये सर्व मतांच्या, भेदांच्या पल्याड जाऊन आत्मीयता निर्माण होण्यासाठी हे संमेलन आहे. दर वर्षी मानवी आयुष्यातला एक महत्वाचा विषय घेऊन त्यावर हे संमेलन होतं.

या वर्षीचा विषय आहे, “माझ्या जगण्याची गोष्ट”. विविध स्तरांतली, क्षेत्रांतली, अनुभवांतली माणसं येतील संमेलनात. ती स्वतःचं जगणं मांडतील. सुखदुःखाची बोलणी करतील. सगळे जण एकमेकांपासून जगण्याचा बोध घेतील. संमेलनात सहभागी होणाऱ्या सगळ्यांना बोलावं मात्र लागतं. वर्षभर आपण सगळे राबत असतो. निरनिराळ्या उपद्‌व्यापात अडकलेले असतो. अपेक्षित असं असतं की, वर्षाच्या तीनशे पासष्ट दिवसांपैकी काही दिवस या संमेलनाच्या निमित्तानं माणसांनी सुट्‌टीचे म्हणून आणि सर्वांबरोबर आनंदानं एकत्र राहण्याचे म्हणून वेगळे काढावेत आणि निवांत राहायला यावं. संमेलन तीन दिवसांचं होतं. त्यात सर्व जण एकत्र राहतात. हे एकत्र राहणं म्हणजेच संमेलन.

अक्षर मानव माणूस संमेलन

काही वर्षं पाचगणीला हे संमेलन झालं, एके वर्षी पुण्याजवळच्या भोरगिरीला झालं, गेल्या वर्षी हे संमेलन गौताळ्याला झालं. या वर्षी भंडारदऱ्याला होतंय. रम्य ठिकाण, रम्य पाऊस, रम्य माणसं. उत्तम जेवण, चहा-नाश्ता. लागलं सवरलं तर देखभाल करायला माणसंही असतात. सोबतीला निकोप, निरोगी पाऊसही असतो. महिलांची राहण्याची स्वतंत्र व्यवस्था केली जाते. या संमेलनात दारूला बंदी असते. या संमेलनामुळं सामाजिक संस्कार घडतात, हा विश्वास आहे आणि तो अनुभव गेली काही वर्षं येतो आहे. इथली मतमतांतरं सर्वदूर पोहोचतात आणि पुढच्या काळात ती सर्वत्र नांदत, निनादत असतात. आयुष्याच्या खूप महत्वाच्या आणि दिशादर्शक गोष्टी या संमेलनामध्ये बोलल्या-ऐकल्या जातात. त्या अर्थानं ही संमेलनं खूप अर्थपूर्ण आणि खोल चिंतन-मननाची होतात.

या वर्षीच्या संमेलनासाठी आपण यावं म्हणून हे खुलं निमंत्रण. हे संमेलन ऐकायला कितीही जण येऊ शकतात, कुणाला त्यासाठी बंदी नाही, पण मुक्कामी राहण्याच्या जागेची मात्र मर्यादा आहे. तिथं शंभर-सव्वाशे माणसांचीच रात्रीच्या मुक्कामाची व्यवस्था करता येते, त्यामुळं संमेलनाला येणारांनी आगाऊच आपलं नाव कळवावं, अशी अपेक्षा असते आणि एकदा नाव कळवल्यावर काहीही झालं तरी रद्‌द करू नये अशी अपेक्षा असते. कारण आधी नाव नोंदवल्यानंतर, नंतर येणाऱ्या माणसांना नकार कळवला जातो, त्यामुळं आधी नाव नोंदवून नंतर गैरहजर राहणारांमुळं नंतर येऊ पाहणारांवर अन्याय होतो. येण्याआधी नावनोंदणी करून येतोय म्हणून कळवावं लागतं.

★प्रवेश शुल्क : अक्षर मानवच्या आजीव सदस्यांना पाचशे रुपये. इतरांना एक हजार रुपये.

#अक्षर_मानव
नाव नोंदणी अंतिम तारीख 23 जुलै 2019

|| अक्षर मानव माणूस संमेलन, दहा ||

२६, २७, २८ जुलै २०१९
रतनगड, भंडारदरा, जि. अहमदनगर

विषय : माझ्या जगण्याची गोष्ट

नावनोंदणीसाठी संपर्क :
जावेदा जिंदगी 8793414787 ◆ नितिन अदवंत 9637116597 ◆ शिरीष भोर 9822497711 ◆ श्रीकांत डांगे 9870504021

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *