Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

ही नजर पहाया, नजर कुणी मज द्या रे…! – वाचा नवी दिशा देणारं अॅडम ग्रांटचं “थिंक अगेन” हे पुस्तक

ही नजर पहाया, नजर कुणी मज द्या रे…! – वाचा नवी दिशा देणारं अॅडम ग्रांटचं “थिंक अगेन” हे पुस्तक

डिसेंबर २०१५ मध्ये हाल्ला टॉमसडॉटिर हिला एक अनपेक्षित फोन आला. हाल्लाच्या घरावर तेव्हा बर्फाचा दाट थर जमला होता. हाल्ला खिडकीच्या काचेवर जमलेल्या बर्फाचे थर पहात होती आणि तिची मैत्रीण तिला फोनवर विचारत होती, “तू फेसबुक पोस्ट पाहिल्या आहेत का?” “हाल्लानं आईसलँडच्या राष्ट्राध्यक्षपदाचं उमेदवार व्हावं” यासाठी फेसबुकवर कॅम्पेन सुरु झालं होतं.

यावर हाल्लाच्या मनातला पहिला विचार होता, “मी राष्ट्राध्यक्ष व्हावं असं मी काय केलंय?”. हाल्लानं एक विद्यापीठ सुरु करायला मदत केली होती. २००७ मध्ये तिनं एक “इन्व्हेस्टमेंट कंपनी” सुरु केली होती. जगभरातल्या २००८ सालच्या आर्थिक मंदीत आईसलँड हा देश विशेष होरपळला होता. तिथल्या तीन महत्वाच्या खाजगी बँका दिवाळखोरीत निघाल्या होत्या. मानवाच्या इतिहासात अभूतपूर्व ठरावं असं आईसलँडवरचं तेव्हाचं आर्थिक संकट भयंकर होतं. त्या काळात हाल्लानं आपल्या नेतृत्वकौशल्यानं आपली कंपनी यशस्वीरीत्या चालवली होती. पण तिच्या मनातले विचार थांबत नव्हते, “एवढ्यानं काय होतंय? आपल्याला राजकीय पार्श्वभूमी नाही, आपण सरकारी पदांवर कामं केलेली नाहीत” हे विचार तिचा पिच्छा सोडत नव्हते.

अर्थात, असं “इंपोस्टर” वाटणं हे हाल्लाच्या आयुष्यात प्रथम घडत नव्हतं. हाल्लाला वाटत होता तसा “इंपोस्टर सिंड्रोम” अनेक यशस्वी व्यक्तींना सतावतो. उदाहरणार्थ, “एखाद्या दिवशी सकाळी उठल्यावर शूटिंगला जाताना, मला हे जमणार नाही.. मी चांगली अभिनेत्री नाही.. असं मला वाटतं”. हे “टायटॅनिक” फेम केट विन्स्लेट या अभिनेत्रीचे उद्गार आहेत. तर “एखाद्या दिवशी मला माझ्यातल्या टॅलेंटबद्दल शंका येते.. माझ्यातला आत्मविश्वास पूर्णपणे ढासळलेला असतो. लहान असताना मला माझ्या सौंदर्याबद्दल खूप शंका होती” असं चक्क मेरिल स्ट्रीप ही प्रख्यात अभिनेत्री म्हणते. फेसबुकची सीईओ शेरिल सँडबर्ग हिनं “लीन इन” या आत्मचरित्रात “हार्वर्डमध्ये आणि नंतर कॉर्पोरेटजगतात आपण इथे असण्याला लायक नाही” असं वाटल्याचं कबूल केलं होतं.

१९७८ साली पॉलिन क्लान्स आणि सुझान आईम्स या दोन मानसशास्त्रज्ञांनी “इंपोस्टर सिंड्रोम” प्रथम ओळखला. आपल्या अॅचिव्हमेंटस समोर दिसत असतानाही त्याबद्दल पुन:पुन्हा शंका घेणं; प्रत्येक गोष्टीत परिपूर्णतेचा अट्टाहास बाळगणं; गोष्टी आपल्या मनाइतक्या योग्य झाल्या आहेत का नाहीत ते वारंवार तपासणं/ न झालेल्या गोष्टींची यादी सातत्यानं डोळ्यासमोर दिसणं/ यामुळे आपल्याच कार्यक्षमतेवर परिणाम होतो हे लक्षात न येणं; कोणी कौतुक केलं तर ते स्वीकारता न येणं; अपयश येईल या कल्पनेची प्रमाणाबाहेर भीती वाटणं; आपल्या हातून उत्कृष्टच घडलं पाहिजे याची सक्ती वाटणं; प्रत्येक कामाची अतितयारी करणं ही “इंपोस्टर सिंड्रोम”ची लक्षणं आहेत.

त्यानंतर कित्येक महिने हाल्लाला राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवार बनण्याबाबत इंपोस्टर वाटत होतं. तिच्या कुटुंबियांनी आणि मित्रमैत्रिणींनी तिच्यात खूप क्षमता आहेत असं सांगूनही तिला आपल्याकडे योग्य तो अनुभव आणि आत्मविश्वास नाही असंच वाटत होतं.

अखेरीस आपल्या इंपोस्टरवर मात करुन हाल्लानं उमेदवारी पत्करायचा निर्णय घेतला.

********

हाल्लाला आईसलँडमध्ये ज्यांच्यासोबत स्पर्धा करायची होती ते उमेदवार असेतसे नव्हते. त्यांच्यापैकी एक तर बलशाली आणि धोकादायकही होता. कोण होता तो?

“२००८ सालच्या आईसलँडच्या दिवाळखोरीला कोणती तीन माणसं प्रमुख कारण ठरली?” या प्रश्नाचं एका नामवंत अर्थतज्ञानं “तीन माणसं नव्हेत, तर एकाच माणसानं, तिघांचं काम या दिवाळखोरीत केलं आहे तो म्हणजे डेव्हिड आॉडसन” असं उत्तर दिलं होतं.

तोच डेव्हिड आॉडसन – हाल्लाचा राष्ट्राध्यक्षपदासाठीचा स्पर्धक होता. १९९१ पासून २००४ पर्यंत डेव्हिड आईसलॅंडचा पंतप्रधान होता. बँकांचं खाजगीकरण करुन त्यानं देशाला संकटात टाकलं होतं. २००५ ते २००९ या काळात आईसलॅंडच्या “सेंट्रल बँके”चा गव्हर्नर असलेल्या डेव्हिडनं बॅकेचं बॅलन्स शीट देशाच्या जीडीपीपेक्षा दहापट मोठं दाखवलं होतं. या गैरकारभाराबद्दल त्याच्या राजीनाम्याची लोकांकडून आलेली मागणी त्यानं धुडकावून लावली होती. “टाईम” मासिकानं नंतर जगभरातल्या आर्थिक संकटाला कारण ठरलेल्या २५ माणसांमध्ये डेव्हिडचं नाव नमूद केलं होतं.

असं असतानाही २०१६ साली डेव्हिडनं स्वत:ला राष्ट्राध्यक्षपदाचा उमेदवार घोषित केलं. वर ”माझा प्रचंड अनुभव(!) आणि विलक्षण ज्ञान देशाच्या उपयोगी पडेल” असा दावाही केला.

डेव्हिडला वाटत होता तो होता “आर्मचेअर क्वार्टरबॅक सिंड्रोम”.

********

“आर्मचेअर क्वार्टरबॅक सिंड्रोम” हा काय प्रकार आहे ? तर थिअरीनुसार आत्मविश्वास आणि कॉंपिटन्स-क्षमता हातात हात घालून जातात. पण प्रत्यक्षात मात्र त्या गोष्टी दोन वेगळ्या वाटांनी जातात. उदाहरणार्थ, आपल्या नेतृत्वकौशल्याबद्दल एखादा माणूस स्वत:हून जे सांगतो आणि त्याचे सहकारी, वरिष्ठ किंवा कनिष्ठ जे सांगतात त्यातली तफावतही हे म्हणणं दाखवून देईल.

क्रिकेटचे अनेक फॅन्स “आपल्याला क्रिकेटच्या कोचपेक्षा खूप जास्त कळतं असा दावा करतात. त्यांना तशी मनोमन खात्री असते” याला “आर्मचेअर क्वार्टरबॅक सिंड्रोम” म्हणलं जातं. थोडक्यात, आईसलँडची वाट लावल्यानंतरही डेव्हिड ऑडसनला आपण राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून लायक नाही असं अजिबात वाटत नव्हतं. हाच तो “आर्मचेअर क्वार्टरबॅक सिंड्रोम”, जिथे क्षमतांवर आत्मविश्वास मात करतो. याउलट, “इंपोस्टर सिंड्रोम”मध्ये आत्मविश्वास क्षमतांच्या तुलनेत फार कमी असतो.

दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे, सुमारे १ लाख लोकांवर ९५ प्रकारच्या सर्वेक्षणांमधून एक गोष्ट वारंवार लक्षात आली आहे ती म्हणजे, स्त्रिया सहसा आपलं नेतृत्वकौशल्य अंडरएस्टिमेट करतात आणि पुरुष आपल नेतृत्वकौशल्य खूप जास्त वाढवून – ओव्हरएस्टिमेट करुन सांगतात.

उदाहरणार्थ, डेव्हिडला अर्थशास्त्रातलं ज्ञान अजिबात नव्हतं. राजकारणात येण्यापूर्वी तो रेडिओवर एक कॉमेडी कार्यक्रम करायचा. कथा लिहायचा. त्यानं पत्रकारिता केली होती. सत्तेवर असताना त्यानं “नॅशनल इकॉनॉमिक इन्स्टिट्यूट” मोडून काढली होती इतका त्याला तज्ञांचा तिटकारा होता. त्याला “सेंट्रल बँके”तून काढण्यासाठी सरकारनं “बँकेच्या गव्हर्नरनं अर्थशास्त्रातली मास्टर्स पदवी मिळवायला हवी” असा नवीन कायदा आणला. पण मग तो तिथून पायउतार झाला तरी राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीत हिरीरीनं उभा राहिलाच. आपल्याला काय माहिती नाही हेच त्याला माहिती नव्हतं.

*******

हे सगळं वाचायला मिळतं अॅडम ग्रांटच्या “थिंक अगेन” या नवीन पुस्तकात. अॅडम ग्रांट “व्हॉर्टन स्कूल आॉफ बिझिनेस”मध्ये आॉर्गनायझेशनल सॉयकॉलॉजीचा प्राध्यापक आहे. “ओरिजिनल्स” हे त्याचं गाजलेलं पुस्तक. चाळिशीच्या आतल्या चाळीस विचारवंतांच्या “फॉर्च्युन” मासिकाच्या यादीतला अॅडम ग्रांट सलग ७ वर्षं टॉप रेटेड प्राध्यापक आहे. त्याच्या पुस्तकांचे ३५ भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. “ओरिजिनल थिंकर्स”चा त्याचा “टेड टॉक” करोडो लोकांनी पाहिलेला आहे.
हाल्ला आणि डेव्हिड या दोघांच्या या उदाहरणातून अॅडमनं एक वेगळाच विचार मांडला आहे. त्याच्या म्हणण्यानुसार हाल्ला आणि डेव्हिड हे दोघंही आपल्या व्यक्तिमत्वाबाबत एक ब्लाईंट स्पॉट बाळगून होते. या ब्लाईंट स्पॉटची संकल्पना समजावून सांगताना अॅडमनं अजून एक गोष्ट सांगितली आहे. ती गोष्ट आहे उर्सूलाची..!

*******

उर्सुला एका इस्पितळात दाखल झाली होती. तिला डोकेदुखी, पाठदुखी आणि चक्कर येणं या समस्या दीर्घकाळ सतावत होत्या. त्या त्रासामुळे तिला कोणतंच काम करता येत नव्हतं. महिन्याभरात हा प्रकार जरा जास्त वाढला होता. उशाशी ठेवलेला पाण्याचा ग्लास, खोलीचं दार शोधणंही तिला जड जात होतं.

उर्सुला सुमारे ४५ वर्षांची होती. तिला आपलं नाक, हात, पाय कुठे आहेत हे दाखवता येत होतं. कात्रीनं निरनिराळ्या आकारात कागद कापता येत होता. तिच्या गॅब्रिएल अॅंटन या डॉक्टरनं तिच्यासमोर एकदा लाल फीत आणि कात्री ठेवली. तेव्हा तिला ते सगळं दिसत होतं, पण त्या वस्तूचं नाव मात्र सांगता येत नव्हतं. भाषेद्वारे स्वत:ला व्यक्त करण्यात तिला समस्या होती हे तिलाही कळत होतं.

पण अजून काहीतरी समस्यादेखील होती. उर्सुलाला अंधार आणि उजेड यातला फरक कळत नव्हता. अॅंटननं तिच्यासमोर एक वस्तू धरुन त्या वस्तूचं नाव विचारलं तर ती त्या वस्तूकडे पहात देखील नव्हती. उलट वस्तूला हातानं स्पर्श करायचा प्रयत्न करत होती. तिच्या वैद्यकीय चाचण्यांनुसार तिच्या दृष्टीवर आघात झाला होता. अॅंटननं तिला तसं विचारलं, तेव्हा तिनं आपल्याला लख्ख दिसतंय असं सांगितलं.

उर्सुलाची दृष्टी नंतर पूर्णपणे गेली. तिच्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, “उर्सुलाला आपल्या दृष्टीवर परिणाम झाला आहे आणि नंतर आपण पूर्णपणे अंध झालो आहोत हे लक्षात आलं नाही याचं मला फार आश्वर्य वाटलं नाही, पण मानसिक पातळीवर ती आपल्या अंधपणाबाबत आंधळी झाली होती हे फार विस्मयाचं होतं”.

अर्थात उर्सुला एकटी नव्हती. १८०० च्या दरम्यान आपण अंध होत चाललो आहोत असं न सांगता दुसर््या च समस्या सांगणारे सहा रुग्ण डॉक्टरांना आढळून आले होते. आपल्या परिस्थितीतून ते शिकायलाच तयार नव्हते. आपल्याला दिसत नाही हे लक्षात येऊनही ते दारावर / फर्निचरवर धडकले तरी वागणं बदलत नव्हते. त्यांना अंधपणाबद्दल विचारलं तर “ते खोलीत अंधार आहे, मी चष्मा घालायचा विसरलो आहे” अशा सबबी सांगायचे. हे पूर्वापार चालत आलेलं आहे. रोमन तत्वज्ञ सेनेका यानं “अंध असूनही प्रत्यक्षात आपण काळोख्या खोलीत असल्यानं आपल्याला दिसत नाही” असं म्हणणार््यात एका स्त्रीचं वर्णन लिहून ठेवलं आहे.

आज वैद्यकीय परिभाषेत आता याला “अॅंटन्स सिंड्रोम” म्हणलं जातं. मेंदूच्या एका विशिष्ट भागावर आघात झाल्यानं हा सिंड्रोम निर्माण होतो.

अॅडम ग्रांट म्हणतो, “आपले सगळ्यांचे मेंदू जरी सगळी कार्यं नीट करत असले आणि आपल्याला “अटन्स सिंड्रोम” नसला तरीही आपल्या ज्ञानाबाबत, मतांबाबत आपल्या सगळ्यांच्या मेंदूत “ब्लाईंड स्पॉटस” असतातच. त्याहून वाईट म्हणजे आपल्यातल्या त्या “ब्लाईंड स्पॉटस”बाबत आपण पूर्ण आंधळे असतो.

***********

या ब्लाईंट स्पॉटसमुळे आपण आपल्या मतांबाबत, धारणांबाबत फोल आत्मविश्वास निर्माण होतो आणि आपण कोणत्याही गोष्टीचा परत एकदा विचार करणं याला नकार देतो. याचा परिणाम म्हणजे,

● आपली मतं, आपले दृष्टिकोन इतरांनी समजावून घ्यावेत असा आग्रह धरताना आपण इतरांचं म्हणणं, इतरांचे दृष्टिकोन किती समजावून घेतो?

● प्रामाणिकपणे समोरच्याचं ऐकण्याऐवजी आपण मध्येमध्ये आपलं म्हणणं कितीवेळा ऐकवतो?

● आपल्या धारणांवर आधारित मतांपेक्षा वेगळी मतं ऐकल्यावर आपण ती मतं कितीवेळा ऐकून घेतो? कितीवेळा रागावतो? शाब्दिक प्रतिहल्ले चढवतो?

● इतरांनी त्यांची मतं, विचार तपासून पहावीत असा मात्र आपला आग्रह असतो. स्वत:बाबत मात्र आपल्याला जे योग्य असतं त्यापेक्षा जे योग्य वाटतं तेच आपण ग्राह्य मानतो.

● आपल्याला आपले विचार, धारणा याबद्दल पुनर्विचार करायला आवडत नाही. त्यामुळे कदाचित आपल्या गाभ्यातल्या व्यक्तिमत्वालाच धक्का पोचेल अशी आपल्याला भीती वाटते. एकदा कधीतरी बरोबर वाटलेलं आता चूक ठरेल, जे सत्य वाटलं होतं ते आता असत्य ठरेल याची आपल्याला भीती वाटते. त्यातून मग आपल्याला चांगलं वाटेल एवढीच मतं आपण ऐकतो. विचार करायला लावणारं काहीही पहायला, ऐकायला, वाचायला आपण नकार देत जातो.

*******

याबाबत “डनिंग क्रू्गर इफेक्ट” शोधणारे डनिंग आणि क्रूगर म्हणतात, “आपल्यात क्षमता नसतील तेव्हा आपण ओव्हरकॉन्फिडन्सनं ओसंडून वहात असतो. यामुळे “स्व”बद्दलची योग्य जाणीव होण्यात अडथळा येतो”. “इंपोस्टर आणि आर्मचेअर क्वार्टरबॅक” या दोन्ही सिंड्रोमच्या मध्ये योग्य ती आत्मविश्वासाची पातळी दडलेली असते. तो योग्य प्रकारचा आत्मविश्वास निर्माण झाला असेल तर आपण आपल्याकडे, आपल्या मतांकडे, धारणांकडे स्पष्टपणे पाहू शकतो. आपली मतं अपडेट करु शकतो. त्यासाठी आधी आपलंही चुकू शकतं हे मान्य करा. त्यातून काय चुकलं यावर विचार करुन सुधारण्याची संधी मिळते.

************

हे ज्यांना साधतं ते विचारवंत अंधपणानं कशावरही विश्वास ठेवत नाहीत. ते सतत शंका घेतात. आपण सगळेच थोड्याफार प्रमाणात आंधळे आहोत आणि आपली दृष्टी सुधारायला हवी याची त्यांना जाणीव असते. “आपल्याला कित्ती कित्ती माहिती आहे” याची शेखी मिरवण्यापेक्षा “आपल्याला किती कमी माहिती” आहे याचं त्यांना आश्चर्य वाटत असतं. प्रत्येक उत्तर नवीन प्रश्नाला जन्म देतं हे त्यांना कळतं. ज्ञानाचा शोध हा न संपणारा प्रवास आहे हे त्यांना चांगलंच ठाऊक असतं. वाटेत भेटलेल्या प्रत्येकाकडून काहीतरी शिकणारेच आयुष्यभर विद्यार्थी असतात.

*********

कोरोनाव्हायरसच्या साथीमुळे कोलाहल माजलेल्या या जगात, आधीचं शिकलेलं विसरुन, नव्यानं विचार करून नवीन काहीतरी शिकायला, आत्मसात करायला हवं आहे. ते कसं करायचं याची दिशा अॅडम ग्रांटचं “थिंक अगेन” हे पुस्तक देऊ शकेल.

– नीलांबरी जोशी

-संदर्भ : थिंक अगेन – अॅडम ग्रांट
-ही नजर पहाया… या ओळी सुधीर मोघे यांच्या आहेत.
-Inside Job ही आईसलँडची इकॉनॉमी कशी कोसळली यावरची डॉक्युमेंटरी पहाण्यासारखी आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *