महाराजकीय भूकंप: अजित पवारांसोबत संपूर्ण राष्ट्रवादी की आमदारांचा गट, चित्र अद्याप अस्पष्ट
मुंबई: आज सकाळी सकाळी महाराष्ट्रात मोठा राजकीय महाभूकंप झाला. थोड्याच वेळापूर्वी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी अनुक्रमे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राजभवनावर त्यांना शपथ दिली. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले. माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, “युतीला चांगला जनादेश मिळाला होता. पण शिवसेना आमची साथ सोडून दुसऱ्या पक्षासोबत गेली. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. स्थिर सरकार देण्यासाठी अजित पवारांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला.”
पुढे त्यांनी अजित पवारांचे आभार मानत राज्यात स्थिर सरकार देण्याचा विश्वास दिला.”
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ते सत्तेत गेले आहेत की त्यांच्यामागे आमदारांचा गट उभा आहे हे अद्याप गुलदस्त्यात आहे. या साऱ्या घडामोडी शिवसेनेसाठी धक्कादायक आहेत कारण आज महाशिवआघाडी राज्यपालांकडे सत्तास्थपनेचा दावा सादर करणार होती. कोणी बंडखोरी की थेट युती केली या बाबत नेमकं चित्र थोड्याच वेळात स्पष्ट होईल.
शपथविधी झाल्यानंतर थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना शुभेच्छा दिल्या.
