शरद पवार यांच्या पाठोपाठ अमित शहाही भेटले पंतप्रधान मोदींना; राजकीय चर्चांना उधाण
नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. या भेटीबाबत काल पासूनच दबक्या आवाजात चर्चा चालू होती. राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ता स्थापनेसाठीच्या वार्ता चालू असताना अचानक घेतलेली ही भेट भविष्यातील राजकीय भूकंप तर घडवून आणणार नाही ना अशी राजकीय निरीक्षकांना शंका होती.
यावेळी शरद पवार यांनी महाराष्ट्रतील शेतकऱ्यांना लवकरात लावकर जास्तीत जास्त मदत मिळावी अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याजवळ केली. महाराष्ट्रात ऑक्टोबर महिन्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले. सध्या राज्यपालांनी जाहीर केलेली ८,००० कोटी रुपयांची मदत तुटपुंजी असून आद्यप ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही असेही त्यांनी नमूद केले. ही भेट जवळपास ४५ मिनिटं लांबली. यानंतर पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यामध्ये जवळपास ३० मिनिटं चर्चा झाली. ही बैठक शेतकरी प्रश्नी होती. कोणत्याही राजकीय विषयावर चर्चा झाली नसल्याचे त्यांनी बैठकी नंतर माध्यमांना सांगितले. यावेळी त्यांनी वसंतदादा इन्स्टिट्यूटतर्फे पुण्यात होणाऱ्या साखरेच्या आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्सचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिलं.
पण शरद पवार यांच्या सोबत बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शाह यांच्याही चर्चा केल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेषकरून शिवसेनेच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.
