सोनिया गांधींची संमती मिळाली होती; केंद्रात मंत्रिपदाची अट मुंडेंनी ठेवल्याचे चव्हाणांचे वक्तव्य
कराड, दि. १५ : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीतील एका महत्त्वाच्या घडामोडीचा दावा केला आहे. मुंडे यांना काँग्रेसमध्ये आणण्यासाठी तत्कालीन नेतृत्वाकडून प्रयत्न झाले होते आणि सोनिया गांधी यांनी त्यास मान्यताही दिली होती, असे चव्हाण यांनी सांगितले. मात्र, काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर केंद्रात मंत्रिपद देण्याची मुंडेंची अट तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी मान्य केली नाही. त्यामुळे हा पक्षप्रवेश प्रत्यक्षात होऊ शकला नाही, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.
चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार, आपण मुख्यमंत्री असताना मुंडे यांच्याशी काँग्रेस प्रवेशाबाबत चर्चा झाली होती. पक्षप्रवेशाची प्रक्रिया पुढे नेण्यापूर्वी त्यांनी सोनिया गांधी यांची परवानगी घेतली होती. मात्र, मुंडे यांनी यावेळी आपल्यासमोर खासदारकीचा राजीनामा देऊन केंद्रात मंत्री करण्याची अट ठेवली होती.
याबाबत चव्हाण यांनी सांगितले, “मी मुख्यमंत्री असताना गोपीनाथ मुंडे यांना काँग्रेसमध्ये घेण्याचा आम्ही प्रयत्न केला होता. आमचं सगळं ठरलं. सोनिया गांधींची मी परवानगी घेतली. त्यांनी माझ्याकडे अट ठेवली. मला खासदारकीचा राजीनामा द्यावा लागले. मला केंद्रात मंत्री करा. अन्यथा भाजपचे नागपूरचे दोघे नेते मला परत निवडून येऊ देणार नाहीत. तिथे त्यावेळेला जातीवादाचा विषय होताच”
मनमोहन सिंहांची परवानगी न घेतल्याने पेच निर्माण झाला
मुंडे यांना काँग्रेसमध्ये घेण्यास सोनिया गांधींची सहमती मिळाल्यानंतर पुढील महत्त्वाचा टप्पा केंद्रातील मंत्रिपदाचा होता. मात्र, या संदर्भात तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्याशी आधी चर्चा न केल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
या निर्णयाबाबत मनमोहन सिंह यांनी आपल्याला बोलावून विचारणा केली होती, असा दावा चव्हाण यांनी केला. यावेळी मुंडे यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देऊन केंद्रात मंत्रिपद देण्यास त्यांनी स्पष्टपणे नकार दिला होता.
चव्हाण यांच्या मते, “मी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांना न विचारचा सोनिया गांधी यांना गोपीनाथ मुंडे यांच्या काँग्रेस प्रवेशाबद्दल विचारलं होतं. मला पंतप्रधानांनी बोलावलं, त्यांनी मला विचारलं की, तू परस्पर त्यांना आश्वासन दिलं का? माझ्या लगेच लक्षात आलं. सोनिया गांधी यांना विचारलं, पण तुम्हाला विचारलं नाही ही मोठी चूकच झाली. भाजपच्या म्हणजे विरोधी पक्षाच्या गटनेत्याला आपल्या पक्षात घेऊन मंत्री करणं हे लाज गेल्यासारखं आहे. मी बिलकूल करणार नाही, असं मनमोहन सिंह म्हणाले.” या भूमिकेमुळे मुंडेंच्या काँग्रेस प्रवेशाची शक्यता संपुष्टात आल्याचे चव्हाण यांनी आपल्या कथनातून स्पष्ट केले आहे.
चव्हाण म्हणाले, ‘मी काय बोलावं आणि तोंड कुठे लपवावं ते कळत नव्हतं’
मुंडेंना काँग्रेसमध्ये आणण्याच्या प्रयत्नात आपण मनमोहन सिंह यांची आधी परवानगी न घेतल्याने मोठी अडचण निर्माण झाली, अशी कबुलीही चव्हाण यांनी दिली. सोनिया गांधींची संमती मिळाल्यानंतर निर्णय जवळपास निश्चित झाल्याचे वाटत असताना पंतप्रधानांच्या नकारामुळे त्यांना मुंडेंना वेगळी माहिती द्यावी लागली.
त्या प्रसंगाचे वर्णन करताना चव्हाण म्हणाले, “मनमोहन सिंह पहिल्यांदा माझ्यावर रागावले. मी डोक्याला हात लावला. म्हटलं, काय मी मोठी चूक केली. यावर मार्गच नाही ना, विचारायला हवं होतं. मंत्रिमंडळ करायचा अधिकार कुणाचा असतो? सोनिया गांधी यांनी मान्यता दिली. पण पंतप्रधान मंत्रिमंडळाबाबत निर्णय घेतात. मी काय बोलावं आणि तोंड कुठे लपवावं ते मला कळत नव्हतं. मी आलो आणि शेवटी सांगितलं, सॉरी. हे शक्य होणार नाही”

पृथ्वीराज चव्हाण यांच्या या दाव्यामुळे गोपीनाथ मुंडे आणि काँग्रेस यांच्यात एका टप्प्यावर झालेल्या कथित राजकीय चर्चेची नवी बाजू समोर आली आहे. भाजपचे प्रमुख नेते असलेल्या मुंडेंनी काँग्रेसमध्ये प्रवेशाचा विचार केला होता का आणि त्या काळातील राजकीय समीकरणांमध्ये या चर्चेचे नेमके स्वरूप काय होते, याबाबत चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, चव्हाण यांनी मांडलेली ही माहिती त्यांच्या वैयक्तिक अनुभवावर आणि त्या काळातील राजकीय घडामोडींवरील त्यांच्या कथनावर आधारित आहे. त्यामुळे या दाव्याला तत्कालीन संबंधित नेत्यांकडून किंवा अन्य स्वतंत्र स्रोतांकडून पुष्टी मिळते का, हेही महत्त्वाचे ठरणार आहे.
