कोकण विभागात दीड कोटीहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त
मुंबई, दि. ३ : पुणे शहरात मागील आठवड्यात घडलेल्या विषारी दारू दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध हातभट्टी दारू निर्मिती आणि विक्री केंद्रांविरोधात व्यापक मोहीम हाती घेतली आहे. या विशेष मोहिमेदरम्यान कोकण विभागातील ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कारवाया करण्यात आल्या असून, अवघ्या पाच दिवसांत दीड कोटी रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने २९ मे ते २ जून २०२६ या कालावधीत विशेष पथकांच्या माध्यमातून राबविलेल्या कारवाईत एकूण ३१३ गुन्हे नोंदविण्यात आले. या कारवायांमध्ये २१३ आरोपींना अटक करण्यात आली असून १ कोटी ५८ लाख १७ हजार ५४६ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विषारी दारूमुळे होणाऱ्या जीवितहानीच्या घटना रोखण्यासाठी राज्यभरात अशा प्रकारच्या मोहिमा अधिक तीव्र करण्यात येत असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली.
ठाणे जिल्ह्यातील हातभट्टी केंद्रांवर मोठी कारवाई
ठाणे जिल्ह्यात हातभट्टी दारू निर्मितीचे केंद्र मानल्या जाणाऱ्या अनेक भागांवर उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केली. दिवा गावखाडी परिसरासह घेसर, अंजूर, अलीमघर, छोटी देसाई, मोठी देसाई, आगासन, खर्डी, सरळांबे, वाशाळा, घोरपे, पालेगाव, सावरणे, वेळू, कोरावले, वसारगाव, हाजीमलंग, कुशिवली, माणेरागाव, द्वारलीपाडा, कुंभार्ली, केवणी, कालवार, वडूनवघर, मामेखर्डी, कारीवली, मामणोली, जांभुळगाव, नांदपगाव, उत्तन, मुरदागाव, कोपराखाडी आणि गोराई खाडी या भागांमध्ये गुन्हे नोंदवून हातभट्टी निर्मिती केंद्रे उद्ध्वस्त करण्यात आली.
पालघर आणि रायगडमध्येही अवैध व्यवसायावर आळा
पालघर जिल्ह्यातील मालजीपाडा, वसई, विरार आणि पालघर परिसरातही मोठ्या प्रमाणावर धाडी टाकून अवैध दारू निर्मिती केंद्रांवर कारवाई करण्यात आली. त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यातील रावेगाव, बेकरेगाव आणि जावळीगाव येथेही गुन्हे दाखल करून हातभट्टी निर्मिती केंद्रे नष्ट करण्यात आली.
याशिवाय अवैध मद्य वाहतुकीविरोधात स्वतंत्र कारवाया करताना आठ वाहने जप्त करण्यात आली असून, मद्य वितरण साखळी खंडित करण्यासाठी तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम
पुण्यातील विषारी दारू प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अशा दुर्घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने विशेष दक्षता घेतली आहे. राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख आणि सहआयुक्त प्रसाद सुर्वे यांच्या निर्देशानुसार विभागीय उपआयुक्त प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.
कारवाईमध्ये अधीक्षक उत्तम शिंदे, उपअधीक्षक अभिजीत देशमुख, निरीक्षक संजय ढेरे, दिपक परब, दुय्यम निरीक्षक अंकुश अवताडे तसेच विभागातील जवानांनी सक्रिय सहभाग घेतला.
नागरिकांना माहिती देण्याचे आवाहन
अवैध मद्यनिर्मिती, बनावट मद्य विक्री, परराज्यातील मद्याचा बेकायदेशीर व्यापार तसेच मिथेनॉल, क्लोरल हायड्रेट यांसारख्या धोकादायक रसायनांचा वापर, साठवणूक किंवा वाहतूक होत असल्याची माहिती नागरिकांना मिळाल्यास ती तातडीने प्रशासनाला कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने १८००२३३९९९९ हा टोल-फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला असून ८४२२००११३३ या व्हॉट्सॲप क्रमांकावरही माहिती पाठविता येणार आहे. माहिती देणाऱ्यांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
विषारी दारूच्या घटनांमुळे निर्माण झालेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्यनिर्मिती आणि विक्रीविरोधातील ही मोहीम पुढील काळात आणखी व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार असून, जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशाराही विभागाने दिला आहे.
