वंशज, इतिहासप्रेमी आणि शिवभक्तांचा तीव्र आक्षेप
पुणे, दि. ५ : शालेय इतिहास शिक्षणातील बदलांच्या पार्श्वभूमीवर आठवीच्या इतिहास विषयाच्या पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याच्या विस्ताराचे दर्शन घडविणारा नकाशा वगळण्यात आल्याचा आरोप करत मराठा साम्राज्यातील विविध राजघराण्यांचे वंशज विशेषतः श्रीमंत भोसले घराणे, श्रीमंत राजे शिर्के घराणे, सुभेदार मालुसरे घराणे, इतिहासप्रेमी, गडदुर्ग संवर्धक आणि शिव-शंभुभक्त यांनी या निर्णयाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणी संबंधित निर्णयाला कायदेशीर आव्हान देत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.
दि. ५ मे २०२६ रोजी पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत नागपूरच्या भोसले घराण्याचे वंशज श्रीमंत राजे मुधोजी भोसले यांच्या नेतृत्वाखाली ही भूमिका मांडण्यात आली. यावेळी शंभुपत्नी महाराणी येसूबाई यांचे वडील स्वराज्यनिष्ठ श्रीमंत पिलाजीराव राजे शिर्के यांच्या वंशपरंपरेतील शंभुसेना प्रमुख श्रीमंत दीपकराजे शिर्के, सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांचे वंशज सुभेदार कुणाल मालुसरे, तसेच विविध ऐतिहासिक घराण्यांचे प्रतिनिधी, गडदुर्ग संवर्धक, इतिहास अभ्यासक आणि शिवभक्त उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत बोलताना उपस्थित मान्यवरांनी सांगितले की, मराठा साम्राज्याचा इतिहास हा केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून अठराव्या शतकात भारतीय उपखंडातील विस्तीर्ण भूभागावर मराठ्यांचे प्रभावी अधिपत्य होते. त्यामुळे त्या साम्राज्याच्या विस्ताराचे दर्शन घडविणारा नकाशा पाठ्यपुस्तकातून वगळणे ही ऐतिहासिक वास्तवाकडे दुर्लक्ष करणारी बाब असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
याचिकाकर्त्यांमध्ये श्रीमंत राजे मुधोजी महाराज भोसले (नागपूर), दीपकराजे शिर्के (पुणे), शिवाजीराजे जाधव (सिंदखेडराजा), ऋषिकेश निकम पाटील (छत्रपती संभाजीनगर), रघुजीराजे आंग्रे (अलिबाग), रविंद्र पडवळ (पुणे), कुणाल मालुसरे (पुणे), राम नारायण मराठा पानिपत (हरियाणा), शरद मोडे (बीड) आणि अथर्व मारणे (पुणे) यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. याचिकेत इतिहासातील संदर्भ, नकाशाचे महत्त्व आणि विद्यार्थ्यांना अचूक ऐतिहासिक माहिती मिळण्याची गरज याबाबत सविस्तर मुद्दे मांडण्यात आले आहेत.
याचिकेनुसार, मराठा साम्राज्याचा नकाशा वगळल्यामुळे विद्यार्थ्यांना त्या कालखंडातील राजकीय आणि भौगोलिक वास्तवाची संपूर्ण माहिती मिळण्यात अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सुधारित पाठ्यपुस्तकात संबंधित नकाशाचा पुनर्समावेश करण्याचे निर्देश एनसीईआरटी(NCERT) ला द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
आपल्या पूर्वजांनी रक्ताचे पाणी करून हे रयतेचे स्वराज्य आणि मराठा साम्राज्य उभे केले. जगाला हेवा वाटेल असा आपला इतिहास आहे. पुस्तक, ग्रंथ, चित्रपट, सिरियल, मालिका, महानाट्य, नाटकाच्या माध्यमातून जर कोण इतिहास पुसण्याचा, चुकीचा दाखविण्याचा , तो कमी लेखण्याचा प्रयत्न करत असेल, तर महाराष्ट्रासह भारत देशातील, जगातील मराठा समाज व आम्ही वंशज मावळे गप्प बसणार नाही. भावी पिढीला शुद्ध आणि सत्य इतिहास मिळावा, यासाठीच आम्ही हा न्यायालयीन लढा पुकारला असल्याचे मत पत्रकार परिषदे दरम्यान श्रीमंत राजे मुधोजी भोसले, श्रीमंत दिपकराजे शिर्के, कुणाल मालुसरे व अन्य वंशजांनी व इतिहास प्रेमींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
या संदर्भात दाखल करण्यात आलेली जनहित याचिका सुमारे २६६ पानांची असून त्यामध्ये विविध ऐतिहासिक, शैक्षणिक आणि घटनात्मक मुद्द्यांचा समावेश करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. या प्रकरणाची सुनावणी लवकरच मुंबई उच्च न्यायालयात होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली असून इतिहास अभ्यासक, शिवप्रेमी आणि विविध सामाजिक संघटनांकडून या उपक्रमाला पाठिंबा मिळत असल्याचे सांगण्यात आले.
पत्रकार परिषदेला नागपूरचे महाराज राजे मुधोजी महाराज भोंसले, माजी सैनिक अधिकारी दीपकराजे शिर्के, सुभेदार कुणाल मालुसरे, रविंद्र पडवळ, ऋषिकेश निकम पाटील, चंद्रकांत ढेंबरे यांच्यासह विविध इतिहासप्रेमी संघटनांचे प्रतिनिधी आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठा साम्राज्याच्या इतिहासाचे अचूक आणि सर्वसमावेशक चित्र विद्यार्थ्यांसमोर यावे, हीच या न्यायालयीन लढ्यामागील प्रमुख भूमिका असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले.
