भ्रामक जाहिराती व मिसब्रँडेड औषधांविरोधात ७३ लाखांहून अधिक किमतीचा साठा जप्त
मुंबई, दि. ३० : राज्यातील नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या भ्रामक औषध जाहिराती, मिसब्रँडेड औषधे आणि नियमबाह्य औषधविक्री यांच्याविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) व्यापक मोहीम हाती घेतली असून, राज्यातील सात विभागांमधील बारा आयुर्वेदिक औषधविक्री आस्थापनांवर धडक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत एकूण ७३ लाख २४ हजार ६५६ रुपये किमतीचा औषधसाठा जप्त करण्यात आला असून संबंधितांवर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जनतेची दिशाभूल करणाऱ्या आणि आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या औषधांच्या जाहिराती तसेच नियमांचे उल्लंघन करून विक्री होणाऱ्या औषधांविरोधात प्रशासनाची भूमिका अत्यंत कठोर राहणार आहे. अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.
‘औषधे व जादूटोणाविरोधी (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा, १९५४’ अंतर्गत कारवाई
राज्यभर राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेदरम्यान ‘औषधे व जादूटोणाविरोधी (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा, १९५४’ तसेच ‘औषधे व सौंदर्यप्रसाधने कायदा, १९४०’ आणि संबंधित नियमांचे उल्लंघन आढळून आले. यापुढे अशा प्रकरणांमध्ये थेट न्यायालयीन कारवाई करण्यात येणार असल्याचे आयुक्त मुंढे यांनी स्पष्ट केले.
“सुरक्षित आणि दर्जेदार अन्न व औषधे मिळणे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. हा अधिकार सुनिश्चित करण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असून अशा कारवाया अधिक प्रभावीपणे आणि सातत्याने सुरू राहतील,” असेही त्यांनी नमूद केले.
नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
कोणत्याही औषधाच्या जाहिरातीत करण्यात येणाऱ्या अतिशयोक्त किंवा चमत्कारिक दाव्यांवर सहज विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. वैद्यकीय सल्ल्याशिवाय औषधांचे सेवन केल्यास गंभीर आरोग्यविषयक दुष्परिणाम उद्भवू शकतात. त्यामुळे संशयास्पद औषधे, जाहिराती किंवा अवैध विक्रीबाबत नागरिकांनी तत्काळ प्रशासनाकडे तक्रार नोंदवावी, असे सांगण्यात आले आहे.
तक्रार नोंदविण्यासाठी नवीन सुविधा
नागरिकांना तक्रार प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून लवकरच स्वतंत्र मोबाईल अनुप्रयोग विकसित करण्यात येणार आहे. याशिवाय तक्रारींसाठी टोल-फ्री दूरध्वनी क्रमांकही कार्यान्वित करण्यात आला आहे.
तक्रार करताना तक्रारदाराचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, संबंधित आस्थापनेचा अचूक पत्ता आणि संशयित औषधाचे नाव स्पष्टपणे नमूद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्राप्त होणाऱ्या सर्व तक्रारींची गोपनीयता राखून त्यांची पडताळणी केली जाईल आणि आवश्यकतेनुसार तत्काळ कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सहआयुक्त (औषधे) गणेश रा. रोकडे यांनी दिली.
सात विभागांमध्ये विशेष मोहीम
आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार बृहन्मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या विभागांमध्ये विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत प्रामुख्याने हरिद्वार (उत्तराखंड) येथील मे. दिव्या फार्मसी या उत्पादकाच्या औषधांबाबत विविध ठिकाणी कारवाई करण्यात आली.
विभागनिहाय जप्तीची आकडेवारी
नागपूर विभाग :
मे. दिव्या फार्मसी, हरिद्वार यांच्या औषधांचा ७ लाख २६ हजार ७५५ रुपये किमतीचा साठा जप्त.
नाशिक विभाग :
एकूण ७ लाख १० हजार ९४५ रुपये किमतीचा औषधसाठा जप्त.
पुणे विभाग (आयुर्वेदिक औषधे) :
मे. दिव्या फार्मसीच्या औषधांचा १४ लाख ६८ हजार ९८१ रुपये किमतीचा साठा जप्त.
बृहन्मुंबई विभाग :
नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १ लाख ८५ हजार ६०० रुपये किमतीचा साठा जप्त.
कोकण विभाग :
कारवाईदरम्यान १८ लाख ५८ हजार रुपये किमतीचा औषधसाठा जप्त.
अमरावती विभाग :
औषध निरीक्षकांच्या तपासणीत १ लाख ४२ हजार २२९ रुपये किमतीचा साठा जप्त.
छत्रपती संभाजीनगर विभाग : एकूण ४८ हजार ७१८ रुपये किमतीचा साठा जप्त.
पुणे विभागात मिसब्रँडेड एलोपथी औषधांवर मोठी कारवाई
विशेष तपासणीदरम्यान पुणे विभागात दोन एलोपथी मिसब्रँडेड औषधांचे नमुने आढळून आले. या प्रकरणात तब्बल २१ लाख ८३ हजार ४२८ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
राज्यातील नागरिकांच्या आरोग्य संरक्षणासाठी अशा प्रकारच्या विशेष मोहिमा भविष्यातही अधिक तीव्रतेने राबविण्यात येतील, तसेच भ्रामक औषध जाहिराती, अवैध औषधसाठा आणि नियमभंग करणाऱ्या उत्पादक व विक्रेत्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असा पुनरुच्चार अन्न व औषध प्रशासनाने केला आहे.
