“नागपूर–मडगाव रेल्वे सेवेमुळे विदर्भ आणि कोकणातील संपर्क अधिक मजबूत” – नितीन गडकरी
नागपूर, दि. १६ : नागपूर ते मडगाव दरम्यान सुरू करण्यात आलेल्या नव्या रेल्वे सेवेमुळे विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकण विभाग यांच्यातील संपर्क अधिक सुलभ आणि गतिमान झाला असून, नागपूरकरांसाठी गोव्याचा प्रवास आता अधिक सोयीस्कर झाला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. या रेल्वे सेवेला प्रवाशांकडून शंभर टक्के प्रतिसाद मिळत असल्याचे सांगत, भविष्यात ही गाडी दररोज सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्नशील राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
नागपूर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वर नागपूर–मडगाव एक्सप्रेसला हिरवी झेंडी दाखवल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी नागपूरच्या महापौर नीता ठाकरे, मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके, मध्य रेल्वे नागपूर विभागाचे विभागीय महाव्यवस्थापक विनायक गर्ग तसेच नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यासह रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, नागपूर–मडगाव रेल्वे सेवा ही केवळ प्रवासी सुविधा नसून विदर्भ आणि कोकण यांच्यातील आर्थिक, पर्यटन आणि सांस्कृतिक देवाणघेवाण वाढविणारी महत्त्वाची कडी ठरणार आहे. नागपूर हे देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने येथून विविध भागांशी संपर्क वाढविण्यासाठी केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा प्रकल्प राबवले जात आहेत.
नागपूर शहरातील वाहतूक व्यवस्था देशातील सर्वोत्तम व्यवस्थांपैकी एक असल्याचे नमूद करत त्यांनी नागपूर आणि अजनी रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचे काम वेगाने सुरू असल्याची माहिती दिली. अजनी परिसरातील कारागृह शहराबाहेरील पाटणसावंगी परिसरात हलविण्याचे नियोजन सुरू असून, त्या जागेचा भविष्यात आधुनिक विकासासाठी उपयोग करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नागपूरमध्ये नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणी, संत्रा मार्केट परिसरात आधुनिक बसस्थानक निर्मिती तसेच मेट्रो रेल्वेचा विस्तार कन्हान आणि बुटीबोरीपर्यंत करण्याची योजना असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर लॉजिस्टिक पार्क विकसित करण्याचे कामही प्रस्तावित आहे. शहरातील रेल्वे स्थानकाजवळील धान्य भंडार आणि मालवाहतूक केंद्रे लॉजिस्टिक पार्कच्या माध्यमातून शहराबाहेर हलविल्यास वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.
नागपूर–मडगाव रेल्वे सेवेला मंजुरी दिल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रेल्वेमंत्री आणि मध्य रेल्वे प्रशासनाचे आभार मानले. ही सेवा प्रवाशांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असून पर्यटन, व्यापार आणि रोजगार निर्मितीलाही चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, मध्य रेल्वेने नागपूर–मडगाव विशेष गाडीचे नियमितीकरण करून तिला ११२०३/११२०४ नागपूर–मडगाव एक्सप्रेस म्हणून अधिकृत मान्यता दिली आहे. ही द्वि-साप्ताहिक गाडी नागपूरहून प्रत्येक बुधवार आणि शनिवार रोजी दुपारी ३ वाजून ५ मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५ वाजून ४५ मिनिटांनी मडगाव येथे पोहोचणार आहे. तसेच मडगावहून गुरुवार आणि रविवार रोजी रात्री ८ वाजता सुटणारी गाडी दुसऱ्या दिवशी रात्री ९ वाजून ३० मिनिटांनी नागपूर येथे येणार आहे.
या रेल्वेला वर्धा, अकोला, भुसावळ, नाशिक रोड, पनवेल, रत्नागिरी, कणकवली आणि सावंतवाडी रोड यांसारख्या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. त्यामुळे विदर्भ, खानदेश, मुंबई परिसर आणि कोकण यांच्यातील रेल्वे संपर्क अधिक मजबूत होणार असून, प्रवाशांसाठी ही सेवा मोठा दिलासा ठरणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
