कुकशेत–नेरूळ परिसरात हिवताप आणि डेंग्यू प्रतिबंधासाठी भव्य जनजागृती दिंडी
नवी मुंबई, दि. १६ : राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कुकशेत आणि नेरूळ परिसरात आयोजित करण्यात आलेली हिवताप व डेंग्यू प्रतिबंधात्मक जनजागृती दिंडी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. नागरिकांनी स्वतःचे घर आणि परिसर स्वच्छ ठेवून डासांची उत्पत्ती होणार नाही याची काळजी घेणे हीच डेंग्यू आणि हिवतापावरील सर्वात प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना असल्याचे प्रतिपादन नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी यावेळी केले.
गावदेवी मैदान, कुकशेत गाव येथून या जनजागृती दिंडीचा शुभारंभ महापौर सुजाता पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आरोग्य समिती सभापती डॉ. जयाजी नाथ, ब प्रभाग समिती अध्यक्षा रूपाली भगत, नगरसेविका स्वप्ना गावडे, मिरा पाटील, प्रिती भोपी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राजेश म्हात्रे, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. रत्नप्रभा चव्हाण तसेच आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रीय डेंग्यू दिन हा केवळ शासकीय कार्यक्रम नसून नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी स्वीकारण्याचा दिवस असल्याचे सांगत महापौर सुजाता पाटील यांनी नागरिकांना घराच्या आसपास कुठेही पाणी साचू देऊ नये, पाण्याच्या टाक्या व ड्रम झाकून ठेवावेत तसेच उघड्यावर पडलेल्या वस्तूंमध्ये डासांची पैदास होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन केले.
या दिंडीमध्ये महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील सुमारे ८०० हून अधिक अधिकारी-कर्मचारी तसेच नागरिक सहभागी झाले होते. दिंडीच्या प्रारंभी महापौरांच्या हस्ते हिवताप आणि डेंग्यूविषयी माहिती देणाऱ्या आकर्षक चित्ररथाचे उद्घाटन करण्यात आले. या चित्ररथामध्ये डासांची उत्पत्ती होणारी ठिकाणे आणि प्रतिबंधात्मक उपाय त्रिमितीय नमुन्यांच्या माध्यमातून प्रभावीपणे सादर करण्यात आले होते.
महापौर सुजाता पाटील यांनी सांगितले की, महानगरपालिकेचा आरोग्य विभाग वर्षभर विविध माध्यमांतून डास प्रतिबंधात्मक मोहिमा राबवत असतो. मात्र आजार झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा तो होऊ नये यासाठी आधीच काळजी घेणे अधिक महत्त्वाचे आहे. एखादा डेंग्यू किंवा हिवतापाचा रुग्ण आढळल्यानंतर त्या परिसरातील शंभर मीटर क्षेत्रात आरोग्य विभागाकडून विशेष तपासणी केली जाते. या मोहिमेदरम्यान नागरिकांनी महापालिका कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असेही त्यांनी नमूद केले.
आरोग्य समिती सभापती डॉ. जयाजी नाथ यांनी राष्ट्रीय डेंग्यू दिनाच्या “डेंग्यू नियंत्रणासाठी जनसहभाग : चेक, क्लिन आणि कव्हर” या घोषवाक्याचा उल्लेख करत नागरिकांना “चेक” म्हणजे घराभोवती पाणी साचले आहे का ते तपासा, “क्लिन” म्हणजे परिसर स्वच्छ ठेवा आणि “कव्हर” म्हणजे पाण्याची भांडी, टाक्या व ड्रम झाकून ठेवा, ही त्रिसूत्री अंगीकारण्याचे आवाहन केले. दिंडी यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभागातील डॉक्टर, आशा सेविका आणि कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीचेही त्यांनी कौतुक केले.
वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राजेश म्हात्रे यांनी पावसाळ्यात उघड्यावर पडलेल्या टाकाऊ वस्तू, गच्चीवरील टायर, रिकामे डबे आणि साचलेल्या पाण्यामुळे डासांची वाढ झपाट्याने होते, त्यामुळे हिवताप आणि डेंग्यूचा धोका वाढतो, असे सांगितले. नागरिकांनी नियमित स्वच्छता ठेवावी आणि आजाराची लक्षणे आढळल्यास त्वरित नजिकच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.
सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. रत्नप्रभा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या दिंडीमध्ये पारंपरिक वारकरी वेशभूषेत महिला आणि पुरुष कर्मचारी सहभागी झाले होते. टाळ-मृदुंगाच्या गजरात, पताका फडकावत आणि घोषणाबाजी करत ही दिंडी कुकशेत व नेरूळ परिसरातून मार्गक्रमण करत होती. विशेष म्हणजे, हिवताप आणि डेंग्यूविषयी जनजागृती करणारे अभंग नवी मुंबई महानगरपालिका कर्मचारी कवी वसंत निमसे यांनी रचले होते, तर त्यांना संगीतबद्ध करून गणेश देशमुख यांनी सादर केले.
दिंडीत सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या लकी ड्रॉमध्ये राजश्री जगदाळे, प्रवीण ठाकूर आणि अरुण मलपेकर यांना स्नेहभेट प्रदान करण्यात आली. सकाळी ७ वाजल्यापासून सुरू झालेल्या या जनजागृती उपक्रमामुळे कुकशेत आणि नेरूळ परिसर अभंग, ओव्या आणि आरोग्यविषयक घोषणांनी दुमदुमून गेला होता.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या या अभिनव उपक्रमामुळे नागरिकांमध्ये डेंग्यू आणि हिवताप प्रतिबंधाबाबत जागरूकता वाढण्यास मोठी मदत होणार असल्याचे उपस्थितांनी सांगितले.
