सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश सूर्यकांत यांची तीव्र टिप्पणी
नवी दिल्ली, दि. १६ : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी शुक्रवारी न्यायव्यवस्था, वकिली व्यवसाय आणि सोशल मीडियावरील वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. दिल्ली उच्च न्यायालयाने वरिष्ठ वकिलांच्या नियुक्तीबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी केली नसल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान त्यांनी ही कठोर निरीक्षणे नोंदवली. यावेळी त्यांनी पत्रकारीता करणाऱ्या, समाज मध्यमांवर सक्रिय तरुणांना तसेच माहिती अधिकार कार्यकर्त्यांना झुरळाची उपमा दिली. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या वक्तव्यावर देशभरातून आता उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. भारतीय चित्रपट सृष्टीतील हरहुन्नरी अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी समाज माध्यमावर उपरोधिक पोस्ट करत आपलं मत व्यक्त केलं आहे. आपल्या पोस्ट मध्ये ते म्हणतात, “झुरळांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे हे खरं आहे? बऱ्याच वर्षांच्या राष्ट्रीय आणि पक्षीय धोरणांच्या अपयशामधे विनाकारण त्यांना खेचल्या बद्दल?”.
यानंतर आणखी एक पोस्ट करत अतुल कुलकर्णी यांनी आपली उद्विग्नता व्यक्त केली आहे. ते म्हणतात, अलिकडे अतीव दुःख होऊन उद्धिग्न होण्याचे प्रसंग बरेचदा येतात. पण मा. सरन्यायाधीशांच्या कालच्या वक्तव्यानं मनाचं जे केलं आहे ते वर्णनातीत आहे. किती पातळ्यांवर भयानक आहे हे… काय करूया हो आपण, ह्या देशावर निःसिम प्रेम करणारे नागरिक म्हणून?”. अशाच प्रकारच्या प्रतिक्रिया राजकीय क्षेत्रासह माध्यम क्षेत्रातील दिग्गजांनी व्यक्त केल्या आहेत.
काल सर्वोच्च न्यायालयात नेमकं काय घडलं
सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी समाजातील काही घटकांवर टीका करताना “झुरळांसारखे तरुण” असा उल्लेख केला. त्यांनी म्हटले की, “समाजव्यवस्थेवर सतत हल्ले करणारे काही परजीवी आधीच आहेत आणि तुम्हालाही त्यांच्यासोबत हातमिळवणी करायची आहे का?” त्यानंतर त्यांनी अधिक कठोर शब्दांत प्रतिक्रिया देताना सांगितले की, “काही तरुण झुरळांसारखे आहेत. त्यांना रोजगार मिळत नाही, व्यावसायिक क्षेत्रात स्थान मिळत नाही. मग त्यापैकी काही जण माध्यमांमध्ये जातात, काही सोशल मीडियावर सक्रिय होतात, काही माहिती अधिकार कार्यकर्ते बनतात, तर काही इतर प्रकारचे कार्यकर्ते बनून प्रत्येक संस्थेवर हल्ले करू लागतात.”
या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीतील काही वकिलांच्या कायद्याच्या पदव्यांच्या वैधतेवरही गंभीर शंका व्यक्त केली. सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले की, सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या काही वकिलांकडे असलेल्या कायद्याच्या पदव्यांच्या प्रामाणिकतेबाबत त्यांना गंभीर संशय आहे. “योग्य प्रकरण समोर आल्यानंतर या पदव्यांची चौकशी करण्याचे आदेश देण्याची वेळ येऊ शकते,” असे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाकडून तपासाची शक्यता देखील त्यांनी सूचित केली.
सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमल्या बागची यांच्या खंडपीठाने “काळे कोट घालून फिरणारे हजारो फसवे लोक” असल्याचा उल्लेखही केला. न्यायालयाने संबंधित याचिका ग्राह्य धरण्यास नकार दिला आणि याचिकाकर्त्याच्या वकिलाने सोशल मीडियावर वापरलेल्या भाषेबाबतही नाराजी व्यक्त केली.
“फेसबुकवर तुम्ही कोणती भाषा वापरत आहात, हे लोकांनी पाहिले पाहिजे. व्यावसायिक शिस्त म्हणजे काय, हे आम्ही दाखवून देऊ,” असा इशाराही सरन्यायाधीशांनी दिला. न्यायालयाच्या या भूमिकेनंतर याचिकाकर्त्याने अखेर आपली याचिका मागे घेतली.
दरम्यान, संबंधित वकिलाने यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना वरिष्ठ वकील म्हणून नियुक्त न करण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दाखल केली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्वीच्या आदेशाचे पालन झाले नसल्याचा आरोप करत अवमान याचिकाही दाखल करण्यात आली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ती याचिका फेटाळून लावली होती.
न्यायालयातील या सुनावणीमुळे न्यायव्यवस्थेतील शिस्त, वकिली व्यवसायातील नैतिकता आणि सोशल मीडियावरील वाढत्या आक्रमक प्रवृत्तीबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या कठोर निरीक्षणांमुळे बनावट पदव्या, व्यावसायिक शिस्तभंग आणि न्यायसंस्थेवर होणाऱ्या दबावाच्या मुद्द्यांवर पुढील काळात अधिक व्यापक तपास आणि कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
