रायगड संवर्धनासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहाय्याची ग्वाही
रायगड, दि. २७ : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार ३५३ व्या राज्याभिषेक दिनानिमित्त दुर्गराज रायगडावर आज पारंपरिक उत्साह, दिमाख आणि भक्तिमय वातावरणात सोहळा पार पडला. हजारो शिवभक्त, वारकरी, इतिहासप्रेमी आणि विविध भागांतून आलेल्या नागरिकांच्या उपस्थितीत रायगड किल्ला शिवमय झाला. या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थित राहिलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आदर्श समोर ठेवून राज्य शासन कार्यरत असल्याचे सांगत रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहाय्य करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.
सोहळ्यावेळी व्यासपीठावर रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले, ग्रामविकास व पंचायत राज राज्यमंत्री योगेश कदम, पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पोलीस अधीक्षक आचल दलाल, शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समितीचे अध्यक्ष सुनील पवार, कोकण कडा मित्र मंडळ रायगडचे अध्यक्ष रोहित पवार, उपाध्यक्ष संकेत वडके, विविध लोकप्रतिनिधी, अधिकारी तसेच मान्यवर उपस्थित होते.
रायगडावरील पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याची घोषणा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात रायगड किल्ल्याच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. रायगडावरील पाण्याची समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार गुरुत्वाकर्षण आधारित पाणीपुरवठा योजनेस तातडीने मान्यता देण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले. रायगडासारख्या ऐतिहासिक गडावर येणाऱ्या लाखो शिवभक्तांना भविष्यात अधिक चांगल्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा निर्धार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महिलांच्या सन्मानाचा वारसा आणि शेतकऱ्यांप्रती बांधिलकी
छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांच्या सन्मानासाठी घालून दिलेला आदर्श आजही शासनाच्या धोरणांमध्ये प्रतिबिंबित होत असल्याचे सांगताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ कोणत्याही अडथळ्यांशिवाय सुरू राहील, अशी ग्वाही दिली.
यंदा मान्सून उशिरा दाखल झाल्याने शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महत्त्वाचे आश्वासन दिले. कमी पाऊस किंवा दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली तरी राज्य शासन शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. “शासकीय तिजोरीवर पहिला अधिकार अन्नदाता बळीराजाचाच आहे,” असे ठामपणे सांगत त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय प्राधान्याने घेतले जातील, असे स्पष्ट केले.

युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या संवर्धनावर भर
उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले की, रायगडासह महाराष्ट्रातील युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा प्राप्त १२ ऐतिहासिक गड-किल्ल्यांचे जतन, संवर्धन आणि जागतिक स्तरावर त्यांची ओळख अधिक भक्कम करण्यासाठी शासन पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे. ऐतिहासिक वारशाचे जतन ही राज्य शासनाची महत्त्वाची जबाबदारी असून त्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
‘शिवसृष्टी’ प्रकल्पाला अंतिम मान्यता देण्याची मागणी
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी रायगड किल्ला आणि पायथ्याशी असलेल्या ऐतिहासिक वास्तूंच्या जतनासाठी तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता अधोरेखित केली. पाचाड येथे उभारण्यात येणाऱ्या ‘शिवसृष्टी’ प्रकल्पासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता, याची आठवण करून देत त्यांनी सांगितले की, या प्रकल्पासाठी शासनाने सुमारे ८० ते ८५ एकर जागा संपादित केली आहे. आगामी मंत्रिमंडळ बैठकीत या प्रकल्पाला अंतिम मान्यता देऊन निधीत वाढ करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
ऐतिहासिक वास्तूंच्या दुरुस्तीसाठी पाठपुरावा
रायगड किल्ल्यावरील तटबंदी, भिंती आणि पडझड झालेल्या ऐतिहासिक संरचनांच्या दुरुस्तीसाठी केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडून येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी केंद्र शासन स्तरावर पाठपुरावा करण्याची विनंतीही भरत गोगावले यांनी केली. तसेच रायगड जिल्हा परिषदेच्या जागेवरील पडझड झालेल्या विश्रामगृहाच्या जागी आधुनिक आणि सुसज्ज विश्रामगृह उभारण्यात यावे, जेणेकरून गडावर येणाऱ्या शिवभक्तांना अधिक चांगल्या मुक्कामाची सुविधा उपलब्ध होईल, अशीही त्यांनी मागणी केली.
रायगडावर शिवमय वातावरण
सोहळ्याच्या प्रारंभी रायगड पोलीस दलाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना शासकीय मानवंदना देण्यात आली. त्यानंतर पारंपरिक पालखी सोहळा राजसदरेवर दाखल झाला. मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करण्यात आला.
ढोल-ताशांचा दणदणाट, पोवाड्यांचे सादरीकरण, पारंपरिक लोकनृत्ये, युद्धकला प्रात्यक्षिके, शिवप्रेमी पथकांचे सांस्कृतिक कार्यक्रम आणि “छत्रपती शिवाजी महाराज की जय” च्या घोषणांनी संपूर्ण रायगड परिसर दुमदुमून गेला. राज्याच्या विविध भागांतून आलेल्या हजारो शिवभक्तांनी या ऐतिहासिक सोहळ्याचा उत्साहात सहभाग घेतला.
प्रशासनाकडून व्यापक सुविधा
राज्याभिषेक दिन सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा प्रशासनाने पोलीस विभाग, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, महावितरण तसेच विविध शासकीय विभागांच्या समन्वयातून व्यापक नियोजन केले होते. भाविकांसाठी आरोग्य सुविधा, पिण्याचे पाणी, वाहतूक व्यवस्था, पार्किंग, सुरक्षा आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने सोहळा सुरळीत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
