निवासी आयुक्त आर. विमला यांच्या हस्ते उद्घाटन
नवी दिल्ली, दि. २ : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘कोकण हापूस आंबा महोत्सवा’चे उद्घाटन महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. कोकणातील ‘जी.आय. टॅग’ मानांकित अस्सल देवगड आणि रत्नागिरी हापूस थेट दिल्लीकरांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्घाटनप्रसंगी बोलताना निवासी आयुक्त आर. विमला यांनी सांगितले की, दिल्लीच्या बाजारपेठेत विविध प्रकारचे आंबे विक्रीसाठी उपलब्ध असतात. मात्र ग्राहकांना खरा देवगड किंवा रत्नागिरी हापूस कोणता, याबाबत अनेकदा संभ्रम निर्माण होतो. ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र सदनाच्या माध्यमातून अस्सल ‘जी.आय. टॅग’ प्राप्त कोकणी हापूस दिल्लीकरांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
“कोकणच्या सुपीक मातीत आणि विशिष्ट हवामानात पिकलेल्या हापूस आंब्याची चव, सुगंध आणि गुणवत्ता ही जगभरात प्रसिद्ध आहे. ग्राहकांना शंभर टक्के अस्सल हापूस मिळावा यासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे,” असेही त्या म्हणाल्या.
यावेळी विशेष आयुक्त श्वेता सिंघल, निवासी आयुक्त (गुंतवणूक) सुशील गायकवाड, महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, कृषी विभागाचे सहसंचालक शिवाजी आमले, सहाय्यक निवासी आयुक्त नितीन शेंडे, सहाय्यक निवासी आयुक्त स्मिता शेलार, जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, निवासी अभियंता आशुतोष द्विवेदी, निवासी उपअभियंता जमुनाप्रसाद गंगवार आणि महाराष्ट्र सदनाचे व्यवस्थापक प्रमोद कोलपते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटनानंतर निवासी आयुक्त आर. विमला यांनी महोत्सवातील विविध स्टॉल्सची पाहणी केली. या स्टॉल्समध्ये रत्नागिरी आणि देवगड हापूस आंब्यांसह कोकणातील इतर कृषी आणि प्रक्रिया उत्पादनेही विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहेत. दिल्लीतील मराठी नागरिकांसह इतर राज्यांतील नागरिकांनीही या महोत्सवाला मोठी पसंती दिली.
दिल्लीकरांकडून मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त करताना आर. विमला म्हणाल्या की, “या महोत्सवाला मिळालेला प्रतिसाद अत्यंत उत्साहवर्धक आहे. त्यामुळे पुढील वर्षी हा महोत्सव अधिक मोठ्या प्रमाणात, अधिक दिवसांसाठी आणि अधिक विस्तृत स्वरूपात आयोजित करण्याचा आमचा मानस आहे.”
कोकणातील हापूस आंब्याला देश-विदेशात मोठी मागणी असून, उत्पादकांना थेट बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि ग्राहकांना अस्सल दर्जेदार उत्पादन मिळवून देणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित या महोत्सवामुळे राजधानी दिल्लीमध्ये कोकणच्या सुप्रसिद्ध हापूस आंब्याचा सुगंध दरवळत असून, महाराष्ट्राच्या कृषी परंपरेची आणि गुणवत्तापूर्ण उत्पादनांची ओळख देशाच्या राजधानीत अधिक दृढ होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
