कालच्या पंतप्रधान मोदींच्या संबोधनाला ढोंग म्हणत संजय राऊत यांनी २०२३ साली मंजूर झालेल्या महिला आरक्षण विधेयकाचा केला उल्लेख
नवी दिल्ली, दि. १८ : लोकसभेत नारीशक्ती विधेयक नामंजूर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करत विरोधकांवर टीका केली. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधानांवर जोरदार पलटवार केला असून या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे.
पंतप्रधानांच्या भाषणावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी विविध मुद्द्यांवरून टीका केली. त्यांनी पंतप्रधानांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी केली. खा. संजय राऊत म्हणाले की, “नरेंद्र मोदी काय बोलत आहेत याकडे देश गांभीर्याने पाहत नाही. ते आचारसंहितेचा भंग करत आहेत. खोटं बोलण्याचा राष्ट्रीय आजार त्यांना जडलेला आहे. २०२३ साली मंजूर झालेलं महिला आरक्षणाचं विधेयक यांनी अद्याप अंमलात आणलेले नाही. याबद्दल नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशाची माफी मागायला पाहिजे. डीलिमिटेशन बिल तुमच्या मर्जीनुसार तुम्ही आणत होता, त्याचा पराभव झाला आहे. हे राष्ट्रावर संकट नसून भारतीय जनता पक्षावर संकट आहे. भारतीय जनता पक्षाच्या संकटासाठी राष्ट्राला संबोधित करणं हा मूर्खपणा आहे.”
तसेच त्यांनी पुढे म्हटले की, “महिला आरक्षणाच्या नावाखाली जे छाती पिटून घेताय, आक्रोश, ढोंग करताय, त्यांनी २०२३ साली संसदेत काय झाले ते एकदा तपासून घ्यायला पाहिजे. मोदींच्या कालच्या भाषणात ८६ वेळा काँग्रेसचा उल्लेख होता. ते काँग्रेसमुक्त भारत करायला निघाले होते. मात्र, त्यांच्या डोक्यातून अद्याप काँग्रेस गेलेली नाही. मोदी कळत नकळतपणे सांगत आहेत की, काँग्रेस शिवाय या देशाला नेतृत्व कोणी देऊ शकत नाही. मोदी त्यांच्या कृतीतून वारंवार हे सिद्ध करत आहे.”
संजय राऊत यांनी पुढे विविध सामाजिक आणि राष्ट्रीय मुद्द्यांवरही भाष्य केले. ते म्हणाले की, “मोदींना कधी लव्ह जिहादच्या नावाखाली तर कधी धर्मांतराचे मुद्दे, तर कधी कोणी काय खावे असे मुद्दे निर्माण करून हा देश कायम पेटवायचा असतो. पण, त्यांना असे कधीही वाटत नाही की, काश्मीरमधील पहलगाम, पुलवामामध्ये असंख्य हिंदू मारले गेले. त्यांच्या सुद्धा माता भगिनी या महिला आहेत. त्या महिलांचा आक्रोश त्यांना कधीही दिसला नाही.”
दरम्यान, नारीशक्ती विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असून या विषयावर पुढील काही दिवसांतही राजकीय घडामोडी वेगाने घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
