एकूण दोन गुन्हे नोंद
मुंबई, दि. १९ : शहरात एलपीजी गॅसच्या काळाबाजारावर नियंत्रण आणण्यासाठी नागरी पुरवठा विभागाने विशेष मोहीम राबवित १८ एप्रिल रोजी विविध ठिकाणी धाडी टाकल्या. या कारवाईदरम्यान चेंबूर आणि देवनार परिसरातील डॉमिनोज पिझ्झा केंद्रांमध्ये अवैधरित्या एलपीजी गॅसचा वापर होत असल्याचे उघडकीस आले असून संबंधित ठिकाणी गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई यांच्या निर्देशानुसार ही मोहीम राबविण्यात आली. उपनियंत्रक शिधावाटप ‘ई’ परिमंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या पथकांनी संयुक्त कारवाई केली. शहरात एलपीजी गॅसचा बेकायदेशीर साठा व वापर रोखण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
चेंबूरमधील कारवाई
चेंबूर येथील पेस्तमसागर रोड परिसरातील एका डॉमिनोज पिझ्झा केंद्रावर टाकलेल्या धाडीत विनाबिल एलपीजी सिलेंडर्स वापरात असल्याचे निदर्शनास आले. तपासादरम्यान एकूण ८ सिलेंडर्स अवैधरित्या प्राप्त करून वापरले जात असल्याचे आढळले. या प्रकरणी सुमारे २५,९७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित आरोपींविरुद्ध टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवनारमधील कारवाई
देवनार परिसरातील अर्जुन सेंटर येथील दुसऱ्या डॉमिनोज पिझ्झा केंद्रावरही अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली. येथे एकूण १९ एलपीजी सिलेंडर्स विनाबिल वापरात असल्याचे उघड झाले. या ठिकाणी सुमारे ४९,११७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गोवंडी पोलीस ठाण्यात संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
कारवाई अधिक तीव्र करण्याचे संकेत
एलपीजी गॅसचा काळाबाजार, अनधिकृत साठवणूक व वापर यावर आळा घालण्यासाठी नागरी पुरवठा विभागाकडून पुढील काळातही अशा धाड मोहिमा अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनीही अशा अनियमिततेबाबत माहिती देऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
