राज्यात २० ते २२ एप्रिलदरम्यान वादळी पावसाची शक्यता; शेतकऱ्यांना सतर्कतेचे आवाहन
मुंबई, दि. १८ : राज्यातील विविध भागांमध्ये येत्या काही दिवसांत हवामानात बदल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून २० ते २२ एप्रिल या कालावधीत वादळी पाऊस, मेघगर्जना आणि काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले आहे.
हवामान अंदाजानुसार पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसर, खानदेश, मराठवाडा तसेच विदर्भाच्या काही भागांमध्ये दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होऊन वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. १९ एप्रिल रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस पडू शकतो. त्यानंतर २० आणि २१ एप्रिल रोजी पावसाचा प्रभाव वाढण्याची शक्यता असून पश्चिम महाराष्ट्र (विशेषतः पुणे विभाग), मराठवाड्यातील दक्षिण भाग आणि छत्रपती संभाजीनगर विभाग तसेच विदर्भातील अमरावती विभागातही पावसाचे प्रमाण दिसून येऊ शकते. २२ एप्रिलपासून पावसाची तीव्रता काहीशी कमी होण्याचे संकेत आहेत.
या संभाव्य बदलांचा शेतीवर परिणाम होऊ शकतो, याची दखल घेत कृषी विभागाने शेतकऱ्यांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. शेतीची कामे हवामानाच्या अंदाजानुसार नियोजनबद्ध पद्धतीने करावीत, काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा ताडपत्रीने झाकून संरक्षित करावीत, असे सांगण्यात आले आहे.
तसेच वादळी वारे, पाऊस आणि गारपीट यांपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी योग्य उपाययोजना करणे गरजेचे असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. शेतमाल, भाजीपाला किंवा काढणी केलेली इतर उत्पादने उघड्यावर ठेवू नयेत, असेही सूचित करण्यात आले आहे. राज्यातील बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी सतर्क राहून वेळेवर उपाययोजना केल्यास संभाव्य नुकसान कमी करता येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
