जीआय टॅगधारक रत्नागिरी हापूस आंब्यांची घरपोच सेवा; टपाल खात्याचा अभिनव उपक्रम
मुंबई/रत्नागिरी, दि. १४ : ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देत शेतकरी आणि ग्राहक यांना थेट जोडण्यासाठी भारतीय टपाल खात्याच्या मुंबई क्षेत्राने जीआय टॅग असलेल्या रत्नागिरी हापूस आंब्यांची घरपोच डिलिव्हरी सुरू केली आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य मोबदला मिळण्यास मदत होणार असून ग्राहकांना ताजे आणि दर्जेदार आंबे थेट घरी मिळणार आहेत.
टपाल खात्याच्या विस्तृत आणि विश्वासार्ह वाहतूक जाळ्याचा वापर करून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामुळे मध्यस्थांची भूमिका कमी होऊन शेतकरी आणि ग्राहक यांच्यात थेट बाजारपेठ साखळी निर्माण होत आहे. विशेषतः रत्नागिरीतील लहान बागायतदार आणि स्थानिक व्यावसायिकांना महानगरातील बाजारपेठेत सहज प्रवेश मिळणार आहे.
या सेवेमध्ये ऑर्डर देण्यासाठी क्यूआर कोड तसेच व्हॉट्सअॅपसारख्या सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याशिवाय कॅश ऑन डिलिव्हरीची सुविधा देखील देण्यात आली आहे. त्यामुळे मोठ्या गुंतवणुकीशिवाय छोट्या उत्पादकांनाही त्यांच्या उत्पादनांची विक्री करणे सुलभ होणार आहे.
या उपक्रमाचा उद्देश केवळ हंगामी सेवा पुरवणे नसून शाश्वत स्वरूपाची बाजारपेठ निर्माण करणे हा आहे. ग्रामीण भागातील उपजीविका मजबूत करण्याबरोबरच स्थानिक उद्योजकतेला चालना देण्याचा यामागे हेतू असल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले आहे.
मुंबई क्षेत्राच्या पोस्टमास्टर जनरल कैया अरोडा यांनी सांगितले की, या उपक्रमाद्वारे रत्नागिरीतील आंबा उत्पादक आणि मुंबईतील ग्राहक यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आहे. जीआय टॅगधारक आंब्यांची थेट डिलिव्हरी केल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा योग्य दर मिळेल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळेल.
या माध्यमातून भारतीय टपाल खाते आपल्या लॉजिस्टिक क्षमतेचा वापर करून वित्तीय समावेशन आणि कृषी क्षेत्राला सहाय्य देण्याची भूमिका अधिक बळकट करत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
