‘जागर २०२६’ व्याख्यानमालेत पर्यावरणाचा संदेश
नवी मुंबई, दि. १३ : नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञानस्मारकात आयोजित ‘जागर २०२६’ व्याख्यानमालेत सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे Sayaji Shinde यांनी पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश दिला. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त सुरू असलेल्या या व्याख्यानमालेतील सहाव्या व्याख्यानात त्यांनी ‘सह्याद्री देवराई’ उपक्रमाचा प्रवास आणि आपल्या अभिनय कारकीर्दीचा अनुभव उपस्थितांसमोर मांडला.
यावेळी त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, “कोणी सोबत येईल याची वाट न बघता झाडे लावण्याची सुरुवात स्वतःपासूनच करायला हवी. जगात पहिल्यांदा झाड आले, मग माणसे आली. माणसांनंतरही झाडेच राहणार आहेत. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या वयाइतकी झाडे लावावीत आणि दुसऱ्याला सांगण्यापेक्षा स्वतःपासूनच सुरुवात करावी.”
कार्यक्रमास महापौर सुजाता पाटील, महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सभागृहासह बाहेर लावलेल्या एलईडी स्क्रीनसमोरही मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती लावली होती.
व्याख्यानात पुढे बोलताना सयाजी शिंदे म्हणाले, “आपल्या लहानपणी जी झाडे होती ती कुठे गेली हे मागे वळून पाहताना जाणवले, त्यामुळे निसर्गावर झालेला प्रतिकूल परिणाम अनुभवला आणि मग झाडे लावायची ठरविली. आपल्याला आईने जन्म दिल्यानंतर ऑक्सिजन लागतो, तो झाड देते. झाड अन्न देते, सावली देते, खूप काही देतच राहते. त्यामुळे ‘झाडाचे गुण गाऊ – झाडाचे गुण घेऊ’ ही भूमिका जपत ‘सह्याद्री देवराई’ हा उपक्रम हाती घेतला.”
त्यांनी देवराई संकल्पनेविषयी सांगताना नमूद केले, “या देवराईमध्ये सर्व प्रकारच्या वृक्ष, वेली, वनस्पतींच्या प्रजाती हव्यात. पशुपक्ष्यांना जपणारी देशी झाडे हवीत. अशा १०० देवराया उभ्या कराव्यात व त्यात एक हजार प्रजाती हव्यात हे स्वप्न आहे.”
विद्यार्थ्यांमध्ये वृक्षप्रेम वाढवण्यासाठी त्यांनी ‘चला सावली पेरूया’ हा उपक्रम सुचवला. “विद्यार्थ्याने एखाद्या वृक्षाचे बी घेऊन ते पेरायचे, त्याचे रोप तयार करायचे, त्याच्या वाढीची आपल्या वहीत नोंद करायची, यामुळे त्या झाडाशी त्याचे नाते तयार होईल,” असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच वाढदिवस, परीक्षेचा निकाल यांसारख्या प्रसंगी झाडे लावण्याचेही त्यांनी आवाहन केले.
वृक्षारोपण करताना नियोजनाचे महत्त्व अधोरेखित करत ते म्हणाले, “वृक्षारोपण करताना आधी पाण्याची सोय असेल, खत, संरक्षण असेल याची खात्री करा आणि मगच झाडे लावा.”
पर्यावरण आणि मानवी जीवनातील संबंध स्पष्ट करताना त्यांनी सांगितले, “झाडापासून माणसाची प्रगती झाली, मात्र शहरांची निर्मितीच झाडे तोडून झाली आहे. आपल्याला चुलीवरचे जेवण लागते, जाळायला – पाळण्याला झाडे लागतात, पण आपण झाडे लावायला मात्र पुढे येत नाही.”
यावेळी त्यांनी ‘सेलिब्रिटी झाडे’, देवळात ‘वृक्षप्रसाद’ यांसारख्या अभिनव संकल्पनाही मांडल्या. तसेच आपल्या अभिनय प्रवासाचा आढावा घेताना “मी सातारचा असल्यामुळे सातारी इंग्रजी बोलतो, सातारी तेलगू बोलतो, सातारी तामिळ बोलतो,” असे म्हणत त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
भाषा आणि आईचे महत्त्व अधोरेखित करताना ते म्हणाले, “भाषेचा जन्मच जगण्यातून झाला आहे आणि जगातील सर्वात उत्तम भाषा आईची आहे. आई इतकं ग्रेट आणि हुशार मला कोणी भेटलं नाही.”
पर्यावरणीय दृष्टिकोन मांडताना त्यांनी सांगितले, “झाडं मुळातून एकमेकांशी बोलतात. झाड वाढताना फुलताना पाहणे हे आनंद देणारे मेडिटेशन आहे.” यावेळी महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा उल्लेख करत त्यांनी त्यांना समाज परिवर्तनाचे दीपस्तंभ संबोधले. तसेच नवी मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञानस्मारकाला भेट देण्याचे आवाहनही त्यांनी केले.
दरम्यान, ‘जागर २०२६’ व्याख्यानमालेच्या माध्यमातून सामाजिक समता सप्ताहात विविध विषयांवर जनजागृती करण्यात येत असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.
