भारत–उझबेकिस्तान संयुक्त लष्करी सराव ‘दुस्तलिक’साठी भारतीय तुकडी रवाना; १२ ते २५ एप्रिलदरम्यान सराव
नवी दिल्ली, दि. १३ : भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातील संयुक्त लष्करी सराव ‘दुस्तलिक’च्या सातव्या आवृत्तीसाठी भारतीय सैन्याची तुकडी आज रवाना झाली. हा सराव १२ ते २५ एप्रिल २०२६ दरम्यान उझबेकिस्तानमधील नामंगन येथील गुरुमसराय फील्ड ट्रेनिंग परिसरात आयोजित करण्यात आला आहे.
‘दुस्तलिक’ हा दोन्ही देशांमध्ये दरवर्षी आळीपाळीने आयोजित केला जाणारा संयुक्त लष्करी सराव असून, याआधीची आवृत्ती एप्रिल २०२५ मध्ये पुणे (औंध) येथील परदेशी प्रशिक्षण केंद्रात पार पडली होती. या सरावाचा उद्देश परस्पर लष्करी सहकार्य वृद्धिंगत करणे आणि विशेषतः अर्ध-पर्वतीय भागात संयुक्त कारवायांची क्षमता विकसित करणे हा आहे.
या वर्षीच्या सरावात भारतीय तुकडीत एकूण ६० जवानांचा समावेश आहे. त्यामध्ये भारतीय लष्करातील ४५ जवान, जे प्रामुख्याने महार रेजिमेंटच्या एका बटालियनमधील आहेत, तसेच भारतीय वायुदलातील १५ जवानांचा समावेश आहे. उझबेकिस्तानकडूनही सुमारे ६० सैनिक सहभागी होत असून तेथील लष्कर आणि वायुदलाचे प्रतिनिधित्व या सरावात असणार आहे.
सरावादरम्यान उच्च शारीरिक तंदुरुस्ती, संयुक्त नियोजन, सामूहिक रणनिती सराव आणि विशेष शस्त्र हाताळणी कौशल्यांवर भर दिला जाणार आहे. याशिवाय दोन्ही देशांच्या कमांड-अँड-कंट्रोल यंत्रणांमध्ये समन्वय साधत संयुक्त कारवायांचे नियोजन आणि अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासाठी एकसंध कार्यपद्धती विकसित करण्यावरही लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
या संयुक्त सरावाच्या माध्यमातून दोन्ही देशांना रणनिती, तांत्रिक कौशल्ये आणि कार्यपद्धती यांची देवाणघेवाण करण्याची संधी मिळणार असून यामुळे परस्पर समन्वय आणि कार्यक्षमता अधिक बळकट होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, या सरावामुळे भारत आणि उझबेकिस्तानमधील संरक्षण सहकार्य अधिक दृढ होण्यास मदत होणार असून दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध आणि परस्पर समज वाढीस लागेल, असे अधिकृत सूत्रांनी नमूद केले आहे.
