कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन
मुंबई, दि. ३० : हवामानातील वाढती अनिश्चितता आणि शेतीसमोरील नव्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक, हवामान अनुकूल शेती तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी एप्रिल २०२६ महिन्यात ‘विशेष डिजिटल शेती शाळा’ आयोजित करण्यात येत असल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आणि पानी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
राज्यातील कृषी विद्यापीठे, कृषी विभागातील तज्ञ आणि प्रगतशील शेतकरी यांच्या सहभागातून १ ते २२ एप्रिल २०२६ या कालावधीत चार टप्प्यांत या डिजिटल शेती शाळांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक सत्र सायंकाळी ७.३० वाजता सुरू होणार असून, कृषी विभाग, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, पाणी फाउंडेशन आणि उमेद यांच्या यू-ट्यूब माध्यमातून या सत्रांचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
चार टप्प्यांत आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन
या डिजिटल शेती शाळांमध्ये शेतीच्या विविध टप्प्यांवर आधारित सखोल मार्गदर्शन दिले जाणार आहे.
- १ एप्रिल २०२६: पेरणीपूर्व तंत्रज्ञान – बेड तयार करणे, टोकण पद्धत, कमी मशागत, आंतरपीक पद्धती, बियाणे उगवण क्षमता तपासणी व बीजप्रक्रिया
- ८ एप्रिल २०२६: जैविक व नैसर्गिक निविष्ठा – बीजामृत, जीवामृत, लिंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, ट्रायकोडर्मा निर्मिती व उपयोग
- १५ एप्रिल २०२६: एकात्मिक कीड व्यवस्थापन – सापळा पिके, पक्षी थांबे, चिकट सापळे, मित्र किटक संवर्धन, सेंद्रिय अर्कांचा वापर
- २२ एप्रिल २०२६: भात शेतीतील सुधारित तंत्र – थेट पेरणी (डीएसआर), श्री पद्धत, यांत्रिक लावणी
हवामान अनुकूल तंत्रज्ञानावर भर
राज्यात पावसाचा खंड, अनियमित हवामान आणि नैसर्गिक आपत्तींमुळे पारंपरिक शेती पद्धतींना मोठे आव्हान निर्माण झाले आहे. उत्पादन खर्च वाढत असताना उत्पन्न टिकवणे कठीण होत आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने “हवामान अनुकूल तंत्रज्ञान अभियान” सुरू केले असून, त्याअंतर्गत शेतकऱ्यांना कमी खर्चात अधिक उत्पादन मिळविण्यासाठी मार्गदर्शन केले जात आहे. डिजिटल शेती शाळा हा या अभियानाचा महत्त्वपूर्ण भाग मानला जात आहे.
विविध यंत्रणांचा सहभाग
या उपक्रमात कृषी विभागासोबत कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे, उमेद, माविम, पशुसंवर्धन विभाग आदी संस्थांचा सक्रिय सहभाग आहे. तज्ञ आणि अनुभवी शेतकरी यांच्या संवादातून ज्ञानाचे आदानप्रदान होऊन शेतकऱ्यांना प्रत्यक्ष उपयोगी माहिती मिळणार आहे.
सर्व घटकांना सहभागाचे आवाहन
शेतकरी, महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे सदस्य, कृषी मंडळे, बीजोत्पादक, फार्मर कप स्पर्धेत सहभागी होणारे गट तसेच वनपट्टेधारक यांनी या डिजिटल शेती शाळांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभाग आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामार्फत करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे राज्यातील शेती अधिक शाश्वत, तंत्रज्ञानाधारित आणि उत्पन्नवाढीला पूरक ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
