मराठी अभ्यास केंद्राचे डॉ. दीपक पवार यांची खा. संजय राऊत व शिवसेना ठाकरे गटाबाबतची विशेष पोस्ट जरूर वाचा
मुंबई, दि. २८: महाराष्ट्रातून लोकसभेत गेलेल्या विरोधीपक्षातील खासदारांमध्ये कॉंग्रेस खालोखाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे राज्यसभेवर महाराष्ट्रातून आपल्याला एक सदस्य तरी पाठवता यावा ही ठाकरे गटाची अपेक्षा राहणं स्वाभाविक होतं. ही जागा प्रियांका चतुर्वेदी यांना मिळावी यासाठी आदित्य ठाकरे हे प्रयत्नशील होते. परंतु, ऐनवेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाने हि जागा पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासाठी सोडावी असा आग्रह धरला. ज्यात त्यांना यश आले. आणि इथेच माशी शिंकली. शिवसेना ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी थोरल्या पवारांना हि जागा मिळावी यासाठी वकिली केली व ज्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा राज्यसभेवर जाता आलं नाही हि सल चतुर्वेदी यांच्या मनात राहिली. ज्याचा उद्रेक उद्धव ठाकरे यांनी खासदारांसाठी आयोजित केलेल्या बैठकीत झाला. यावेळी आदित्य ठाकरेही संजय राऊत यांच्यावर नाराज झाल्याच्या तसेच दोघांमध्ये खटके उडाल्याच्या बातम्या सर्वत्र ऐकायला येत होत्या. या साऱ्या पार्श्वभूमीवर अनपेक्षितपणे मुख्य प्रवाहातील राजकारणाबाहेरील परंतु, मराठीकारणाच्या राजकारणाचे पुरस्कर्ते असलेल्या प्रा. डॉ. दीपक पवार यांनी एक फेसबुक पोस्ट लिहीत आपलं मत व्यक्त केलं आहे. जाणून घ्या डॉ. दीपक पवार नेमकं काय म्हणाले आहेत.
संजय राऊत हे पत्रकार, शिवसेना पक्षाचे प्रवक्ते आणि दैनिक सामनाचे संपादक म्हणून गेली अनेक वर्षे लोकांना परिचित आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणातील ते अत्यंत वादग्रस्त व्यक्तिमत्त्व आहे. २०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर ते अधिकच वादग्रस्त झाले, हे सर्वांनाच माहीत आहे. त्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले. या सत्तास्थापनेत विविध शक्तींमध्ये एका व्यक्तीची भूमिका निर्णायक ठरली, ती व्यक्ती म्हणजे संजय राऊत. हे चांगले की वाईट, शिवसेनेने भाजपला दगा दिला का, हिंदुत्वाशी फारकत घेतली का, असे अनेक नॅरेटिव्ह मागील सात वर्षांत ऐकायला मिळाले. मात्र, हिंदुत्वाशी फारकत ही शिवसेनेच्या अस्तित्वासाठी व भविष्यातील प्रगतीसाठी आवश्यकच आहे. गेल्या सात वर्षांत महाराष्ट्रात प्रमुख विरोधी आवाज म्हणून राजकीय प्रभाव जर कोणाचा असेल, तर तो संजय राऊत यांचा आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांची शिवसेना, तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेस आणि चौथ्या क्रमांकावर परिस्थितीनुसार भूमिका घेणारा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा गट दिसतो, कारण त्यांची सत्तेत राहायचे की विरोधात, ही भूमिका अजून स्पष्ट झालेली नाही.
संजय राऊत यांची ही राज्यसभेतील चौथी टर्म आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून ते राज्यसभेवर आहेत आणि सामनाही ते चालवतात. त्यांच्या विरोधात विविध प्रकारचे आरोप झाले. उद्धव ठाकरे यांचे सरकार पडल्यानंतर शिंदे गटाने त्यांना आपल्या पक्षात आणण्यासाठी प्रयत्न केले. इतर मार्गांनी ते शक्य न झाल्याने त्यांना तुरुंगातही टाकण्यात आले. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी तेथील अनुभवांवर आधारित ‘नरकातला स्वर्ग’ हे पुस्तक लिहिले. ते पुस्तक अधिक सुसूत्रपणे मांडता आले असते, असे वाटते; मात्र संघर्ष, तुरुंगवास आणि लेखन, या सर्व अपेक्षा एकाच व्यक्तीकडून ठेवणे योग्य नाही.संजय राऊत यांच्याबद्दल मतभेद स्पष्ट दिसतात. काही जण त्यांना ‘नऊ वाजताचा सकाळचा भोंगा’ म्हणतात आणि त्यांच्या वक्तव्यांवर टीका करतात. दुसरीकडे एक मोठा वर्ग असा आहे की, भारतीय जनता पक्षाच्या ‘हिंदी-हिंदू-हिंदुस्थान’ या कथनाला विरोध करण्याची जी हिंमत इतरांमध्ये नाही, ती संजय राऊत दाखवतात म्हणून सौ दाऊद, एक राऊत सारखी पाने समाज माध्यमांवर लोकप्रिय होतात.माझ्या त्यांच्याशी काही भेटी झाल्या आहेत, मात्र त्या औपचारिक स्वरूपाच्या होत्या. फोन, मेसेज किंवा प्रत्यक्ष संवाद—या सर्वांमध्ये ते वेगवेगळ्या पद्धतीने वागतात. विशेषतः शिवसेनेबाहेरील कार्यकर्त्यांशी ते फारसे मोकळेपणाने बोलत नाहीत, असा माझा अनुभव आहे.शिवसेनेत शहाणं असणं पुरेसे नाही, ठाकरे कुटुंबाच्या जवळ असणेही गरजेचे आहे. त्यामुळे राऊत यांनी स्वसंरक्षणार्थ तटबंदी बांधली आहे.यामुळे त्यांचे शत्रू खूप आहेत. अलीकडेच शरद पवार यांना राज्यसभेची खासदारकी मिळावी यासाठी संजय राऊत यांनी प्रयत्न केल्याच्या बातम्या आल्या. पवारांनी या टप्प्यावर खासदारकी मागावी का? त्यांनी ती मागू नये, असे बहुतांश लोकांचे मत आहे. त्यांच्या मुलीने यासाठी प्रयत्न करणेही योग्य नव्हते. मात्र, महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या मतांचा विचार केला तर काँग्रेसमधील काही लोकांचे मत असे आहे की हा निर्णय दिल्लीत झाला. राष्ट्रवादीने शिवसेनेतील वरिष्ठांशी चर्चा केली असावी आणि त्यामुळे प्रियंका चतुर्वेदी यांना पुन्हा उमेदवारी देण्याऐवजी ती पवारांना देण्यात आली.२०२० मध्ये प्रियंका चतुर्वेदी शिवसेनेत आल्यावर त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाली होती. त्या काळात त्यांनी अधिक आक्रमक भूमिका घेतली. काही वेळा मराठीत ट्विट करण्याचेही प्रयत्न त्यांनी केले. मात्र, दिल्लीतील त्यांचा वावर आणि संसदेतील कामगिरी पाहता त्यांचा मराठी राजकारणाला किती उपयोग होतो, याबद्दल प्रश्न उपस्थित होतो. शिवसेनेतील काहींना इंग्रजी बोलणारा प्रतिनिधी संसदेत हवा असतो; पण इंग्रजी बोलणारा मराठी माणूस का नको, हा प्रश्न उपस्थित होतो. परवेझ दमानिया ते प्रीतिश नंदी अशा व्यक्तींची निवड का होते, याचे उत्तर शिवसेनेने प्रामाणिकपणे द्यायला हवे.प्रियंका चतुर्वेदी यांची उमेदवारी संजय राऊत यांच्यामुळे रद्द झाली असेल, तर शरद पवारांना तिकीट मिळाले हे योग्य की अयोग्य, यापलीकडे जाऊन त्या निर्णयाचे स्वागत केले पाहिजे, कारण त्या जागी एका मराठी व्यक्तीची निवड झाली. पवारांनी ती मागू नये, आणि ती शिवसेनेतीलच एखाद्या कार्यकर्त्याला द्यायला हवी होती, हेही तितकेच खरे आहे.२०२८ च्या सुमारास संजय राऊत यांची राज्यसभेची सहा वर्षांची मुदत संपेल. त्यांनी अलीकडील पत्रकार परिषदेत “मी कदाचित खासदार राहीन, राहणार नाही” असे म्हटले. या विधानातून भविष्यातील काही अंतर्गत मतभेदांचा संकेत मिळू शकतो. मात्र, पुढील दोन वर्षांत राजकीय परिस्थिती बदलण्याची शक्यता आहे. सध्या त्यांच्या पक्षाकडे किंवा महाविकास आघाडीकडे आणखी एक खासदार निवडून आणण्याइतकी ताकद आहे का, हा प्रश्न आहे. तरीही, संजय राऊत संसदेबाहेर असले तरी त्यांचा प्रभाव कायम राहील.काहींचे मत आहे की संजय राऊत नसते तर शिवसेना फुटली नसती. मात्र, हिंदुत्वाच्या अतिरेकामुळे फूट पडणे आवश्यक होते. त्यातून कदाचित महाराष्ट्र धर्माच्या लढाईत सेना थोडीफार भूमिका निभाऊ शकेल. ते त्यांच्या भूमिकेमुळे झाले असेल, तर त्यांचे अभिनंदन करावे लागेल. अलीकडील काळात ते कॅन्सरमुळे आजारी होते आणि त्याचा ताण त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो. आजारानंतर त्यांनी लगेच पत्रकार परिषदांना सुरुवात केली, ती काहीशी घाईत झाली असे वाटते. सार्वजनिक चर्चेत आपली उपस्थिती टिकवून ठेवण्याची ओढ त्यामागे असू शकते. मात्र, त्यांनी प्रकृतीची काळजी घेणे अत्यावश्यक आहे, कारण त्यांच्या पक्षासाठी पुढील काळ आव्हानात्मक आहे.
शिवसेनेत आज खऱ्या अर्थाने मराठीवादी भूमिका मांडणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे संजय राऊत, दिवाकर रावते आणि सुभाष देसाई यांसारखी जुनी पिढी आता सक्रिय नाही. नव्या पिढीत मराठीवादी विचारांची कमतरता जाणवते. महाराष्ट्रधर्माची जाणीव आणि हिंदुत्वाच्या नॅरेटिव्हला उत्तर देण्याची क्षमता महत्त्वाची ठरणार आहे. शिंदे गटातील काहीजण प्रियंका चतुर्वेदी यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करत असतील, तर त्यांनी आपल्या कोट्यातून त्यांना राज्यसभेत पाठवावे आणि मग मूळ शिवसेनेवर टीका करावी. दरम्यान, संजय राऊत यांनी आणखी एक नवा शत्रू निर्माण केला आहे, त्याबद्दलही त्यांचे अभिनंदनच करावे लागेल. उद्धव आणि आदित्य ठाकरे अनेकदा माणसे ओळखण्यात चुका करतात; मात्र संजय राऊत यांच्या बाबतीत त्यांनी अशी चूक केलेली दिसत नाही. त्यांच्याशी असलेल्या नात्यात चूक करणे पक्षासाठी आत्मघातकी ठरेल. ही चूक ते करणार नाहीत, एवढी अपेक्षा ठेवावी लागेल.
