विधानसभेतील लक्ष्यवेधीवर फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांचे उत्तर
मुंबई, दि. ६ : आंबा मोहर आल्यानंतर झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर मोहर झडला. त्यामुळे कोकणातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आंबा व काजू पिकाच्या नुकसानीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री, कोकणातील आमदार व संबंधित मंत्र्यांची बैठक अधिवेशन संपण्यापूर्वी घेण्यात येईल. या बैठकीत शेतकऱ्यांना भरपाई कशी देता येईल याबाबत ठोस निर्णय घेतला जाईल, असे रोजगार हमी योजना, फलोत्पादन, खारभूमी विकास विभाग मंत्री भरत गोगावले यांनी सांगितले. अवकाळी पाऊसामुळे आंबा व काजू बागांच्या नुकसानी संदर्भात सदस्य दीपक केसरकर यांनी लक्षवेधीद्वारे सूचना मांडली होती. त्यावर मंत्री भरत गोगावले यांनी उत्तर दिले. सदस्य शेखर निकम, सुनील प्रभू, प्रकाश सुर्वे यांनी चर्चेत सहभाग घेतला.
मंत्री गोगावले म्हणाले की, पाऊस, थंडी व अचानक हवामान बदलामुळे कोकणात आंबा आणि काजू पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून प्राथमिक पाहणीत आंबा मोहराचे सुमारे ८० ते ९० टक्के नुकसान झाल्याचे निष्पन्न झाले आहे. डिसेंबर-जानेवारीमध्ये आलेल्या आंबा मोहरावर हवामानातील अचानक बदल, पाऊस तसेच वृक्षजन्य रोगांचा परिणाम झाला. कृषी विद्यापीठ व कृषी विभागाने संयुक्त पाहणी करून शासनाकडे अहवाल सादर केला आहे. प्राथमिक अहवालानुसार आंबा मोहराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काजू पिकांवरही हवामान बदलाचा परिणाम झाल्याचे निदर्शनास आले असून त्याबाबत क्षेत्रीय स्तरावर कृषी विद्यापीठ व कृषी विभागामार्फत सविस्तर पाहणी सुरू आहे.
गतवर्षी कोकण विभागात आंबा पिकासाठी सुमारे २२४ कोटी रुपयांची विमा संरक्षित रक्कम अदा करण्यात आली होती. त्यापैकी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ८४ कोटी रुपये देण्यात आले. यावर्षी आंबा पिकासाठी ६०४ कोटी रुपयांची विमा संरक्षित रक्कम असून त्यातील २३३ कोटी रुपये सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आहेत. काजू पिकासाठी गतवर्षी १६ कोटी रुपयांची विमा रक्कम अदा करण्यात आली होती, त्यापैकी ८ कोटी रुपये सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी होते. चालू वर्षात काजू पिकासाठी एकूण ९४ कोटी रुपयांची विमा संरक्षित रक्कम असून त्यापैकी ४९ कोटी रुपये सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आहेत, असेही त्यांनी सांगितले.
कोकणातील शेतकऱ्यांना फेब्रुवारी ते डिसेंबर २०२५ या कालावधीत नैसर्गिक आपत्तीसाठी १०६ कोटी रुपयांची मदत वितरित करण्यात आल्याचेही मंत्री गोगावले यांनी सांगितले. आंबा व काजू पिकांवरील कीड व रोग नियंत्रणासाठी शेतीशाळा व वेबिनारचे आयोजन करण्यात आले असून त्याची शेतकरी स्तरावर अंमलबजावणी सुरू आहे. तसेच ॲपच्या माध्यमातून आंबा व काजू पिकांच्या प्लॉटचे सर्वेक्षणही करण्यात येत आहे. टास्क फोर्समार्फत आठ गावांची निवड करून त्या ठिकाणी आंबा पिक संरक्षणासाठी प्रात्यक्षिके राबवली जात आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
