“काही सेकंदात त्यांची नजर कागदावरून स्कॅन व्हायची आणि त्यातील चुका ते चटकन शोधायचे” – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. २३: शोकप्रस्तावावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहिलेले विकासाचे स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. ‘विकास आता लांबणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही’ ही दादांची घोषणा आम्ही सत्यात उतरवू, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यशैलीचे कौतुक करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, प्रशासनावर त्यांची जबरदस्त पकड होती. फाईल हातात घेतल्यावर काही सेकंदात त्यांची नजर कागदावरून स्कॅन व्हायची आणि त्यातील चुका ते चटकन शोधायचे. साध्या वायर लटकत असल्या किंवा पायरी नीट बसवलेली नसली तरी ते संबधितांना सुनावत असत. ११ वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर होता. बाहेरून फणसासारखे काटेरी वाटत असले तरी आतून ते अत्यंत मृदू मनाचे होते. लाडकी बहीण योजनेसाठी ४६ हजार कोटींची तरतूद करताना त्यांनी अर्थकारणाचा समतोल उत्तम राखला होता.
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, जनतेच्या प्रश्नांबाबत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली. नागरिकांच्या निवेदनांचे बारकाईने परीक्षण करून योग्य ती कार्यवाही करण्याची त्यांची कार्यपद्धती उल्लेखनीय होती. कधी मतभेद असले तरी वैयक्तिक पातळीवर सौजन्यपूर्ण संबंध त्यांच्या सोबत कायम राहिले, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
यावेळी माजी मंत्री सुरूपसिंग हिऱ्या नाईक, माजी विधान परिषद सदस्य अशोक गजानन मोडक, गंगाधर पटने, श्रीमती निला देसाई या दिवंगत सदस्यांच्या वाटचालीला सभापती प्रा. राम शिंदे यांनी उजाळा दिला. दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून या दिवंगत सदस्यांना सर्व उपस्थित सदस्यांनी श्रद्धांजली वाहिली.
विधान परिषद सदस्य माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, प्रवीण दरेकर, सतेज पाटील, विक्रम काळे, शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, संजय खोडके, प्रसाद लाड, भाई जगताप, निरंजन डावखरे, पंकज भुजबळ, चित्रा वाघ, अभिजित वंजारी, मनिषा कायंदे, सचिन अहिर, किरण सरनाईक यांनी मनोगत व्यक्त करीत सहवेदना व्यक्त केल्या.
