अपेक्षांचा वाढता ताण सामान्य कार्यकर्त्यांसाठी त्रासदायक ठरत असल्याची व्यक्त केली भावना
नागपूर/मुंबई, दि. १३: राज्याच्या राजकारणात आज एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार संदीप माधुरी दिवाकरराव जोशी यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ‘आता मला थांबायचं!’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध केलेल्या भावनिक पत्रातून त्यांनी हा निर्णय स्पष्ट केला आहे.
राजकारण हे केवळ पद, प्रतिष्ठा किंवा सत्तेपुरते मर्यादित नसून समाजसेवा, निष्ठा आणि मूल्यांची वाट असल्याचे नमूद करत, सध्याच्या राजकीय वातावरणात वाढलेली स्पर्धा, सततचे संघर्ष आणि अपेक्षांचा वाढता ताण सामान्य कार्यकर्त्यांसाठी त्रासदायक ठरत असल्याची भावना जोशी यांनी व्यक्त केली आहे. “मी स्वतःला आजही भारतीय जनता पार्टीचा एक सामान्य कार्यकर्ता मानतो. मात्र परिस्थिती पाहता आता थांबण्याचा निर्णय मनाशी पक्का झाला आहे,” असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
आपण ५५ वर्षांचे झालो असून, आता तरुणांना संधी देणे आणि स्वतःची जागा मोकळी करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. पक्षाने दिलेल्या संधी, जबाबदाऱ्या आणि विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, पक्षाच्या नेतृत्वाकडे—विशेषतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे—माफी मागून हा निर्णय जाहीर करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
जोशी यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ (आमदारकी) १३ मे रोजी संपुष्टात येत असून, तोपर्यंत आमदार म्हणून दिलेली सर्व घटनात्मक, नैतिक आणि सार्वजनिक कर्तव्ये पूर्ण जबाबदारीने पार पाडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र त्यानंतर कोणतेही पद स्वीकारणार नाही, पक्षाकडून पुन्हा जबाबदारी दिली तरी ती नम्रपणे नाकारणार असल्याचे त्यांनी ठामपणे नमूद केले आहे.
राजकारणातून निवृत्त होत असले तरी सामाजिक कार्य सुरूच राहील, असे सांगत त्यांनी पुढे सर्वसामान्य सामाजिक कार्यकर्ता म्हणून जनसेवेत सक्रिय राहण्याची भूमिका मांडली आहे. हा निर्णय कोणत्याही क्षणिक भावनेतून नसून सखोल विचारांती घेतल्याचेही त्यांनी पत्रात स्पष्ट केले आहे.
आपल्या या निर्णयामुळे कुटुंबीय, समर्थक, पक्षाचे कार्यकर्ते आणि शुभेच्छुकांना दुःख होईल याची जाणीव असल्याचे सांगत, सर्वांची मनापासून माफी मागत आणि आभार व्यक्त करत जोशी यांनी पत्राचा शेवट केला आहे. “कुर्सी नही, किमत बचाने चला हुं | शोर नहीं, सुकून चुनने चला हुं” या ओळींमधून त्यांनी आपल्या निर्णयामागची भूमिका अधोरेखित केली आहे.
या निर्णयामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता असून, दीर्घकाळ संघटनात्मक आणि सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या नेत्याच्या या निर्णयाकडे लक्ष वेधले जात आहे.
