शिवसेना नेते खा. संजय राऊत यांची भारतीय जनता पक्षावर टीका
मुंबई/नाशिक, दि. २५: काल मुंबईत ठाकरे बंधूंनी आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र येत युती जाहीर केली. हि युती जाहीर होऊन २४ तास उलटण्या आधीच शिवसेना ठाकरे गट व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नाशिक येथील नेत्यांनी थेट भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या विनायक पांडे तर मनसेच्या यतीन वाघ आणि दिनकर पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तत्पूर्वी, हा प्रवेश होताना स्थानिक आमदार असेलल्या देवयानी फरांदे यांनी या पक्ष प्रवेशाला विरोध केला होता. या साऱ्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजप पक्षप्रवेशाच्या घटनेवर तीव्र टीका केली असून, इतर पक्षांतून नेत्यांना फोडून घेणं हे “श्रीमंत भिकाऱ्याचं लक्षण” असल्याचं म्हणत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
पक्ष सोडून गेलेल्या विनायक पांडे यांच्याबद्दल बोलताना राऊत म्हणाले, “एखाद्या पक्षात ते स्थिर राहिले आणि जिथे राहिले तिथे त्या स्थिरतेने काम केलं असं कधी आम्हाला दिसलं नाही तरी ते आमच्या पक्षामध्ये होते.”
भारतीय जनता पक्षावर टीका करताना ते म्हणाले, “भारतीय जनता पक्ष हा जगातला सर्वात मोठा पक्ष आहे असा दावा ते करतात. भारतीय जनता पक्षाकडे देशात सर्वाधिक संपत्ती आणि साधारण दहा हजार कोटीचा निधी आहे. गौतम अडाणी सुद्धा भारतीय जनता पक्षाचे सदस्य बरोबर ना? तरीही त्यांना इतर पक्षांचे खासदार आमदार नगरसेवक आणि कार्यकर्ते फोडावे लागतात. हे श्रीमंत भिकाऱ्याचे लक्षण आहे. आणि श्रीमंत जेव्हा भिकारी होतो तेव्हा तो अत्यंत लाचर आणि लोचटपणे वागतो. पहा ना चेहऱ्यावरचा लोचटपणा गिरीश महाजनच्यांचा आज पाहिला.”
“त्यांच्या पक्षातून विरोध होतो या लोकांना घ्यायला. लोक रस्त्यावर उतरलेत. दिवे आणि फरांदे आमदार आहेत त्या रस्त्यावरती उतरलेल्या आहेत,” असं राऊत म्हणाले. ते म्हणाले, “कुणालाही न जुमानता हे लोक इतर पक्षातल्या कार्यकर्त्यांना फोडून विकत घेतात. या महाराष्ट्राच्या परंपरेला काळीमा फासणार कृत्य आहे. दिनकर पाटील यांच्या प्रवेशाबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले कि, “काल संध्याकाळपर्यंत या दोन्ही पक्षातले नेते ठाकरे बंधूंच्या युतीबद्दल पेढे लाडू एकमेकांना भरवत होते. दिनकर पाटील लाडू वाटत होते. लाडू भरवत होते हे आमचे जे गेले वीर ते गुलाल उजळत नाचत होते आणि नाचता नाचता तिकडे गेले.”
त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदींवरही टीका केली, “देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी हे राजकीय चारित्र्याच्या गप्पा मारतात ना. मग ज्यांच्यावर तुम्ही कालपर्यंत आरोप करत होतात नाशिकमध्ये भ्रष्टाचाराचे गुंडगिरीचे अंडरवर्ल्डचे हे सगळे तुमच्या पक्षातच कसे?” पक्ष सोडताना या नेत्यांनी विकासाचं कारण दिलं असून यावरही खा. संजय राऊत यांनी आसूड ओढलं आहे. राऊत म्हणाले, “आता ट्रम्प पण जाणार आहे यांच्या पक्षात, अमेरीकेचा विकास करायचा आहे. फ्रांसचा अध्यक्ष मॅक्रॉन जाणार आहे कारण फ्रांसचा विकास झालेला नाही.”
