केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना आवाहन
नागपूर, दि. ११: विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी व्यावसायिक दृष्टिकोन बाळगून गुणवत्तापूर्ण संत्रा उत्पादन करून त्याचे विपणन आधुनिक तंत्रज्ञानाने केल्यास त्यांची आर्थिक भरभराट होईल. याकरिता इतर शेतकऱ्यांच्या यशोगाथा तसेच नवनवीन प्रयोग यांची माहिती घेऊन संत्र्याचे एकरी उत्पादन २० टनाच्या वर जाईल असा संकल्प करण्याचे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना आज नागपूर येथे केले.
ऍग्रोव्हिजन फाऊंडेशन तर्फे वनामती येथे आयोजित संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी संबोधित करताना ते बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था नागपूरचे संचालक डॉ. दिलीप घोष, राज्यसभा खासदार डॉ .अनिल बोंडे त्याचप्रमाणे ऍग्रो व्हिजनचे मार्गदर्शक आणि कृषी विज्ञान वैज्ञानिक मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. सी. डी. मायी प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना गडकरी यांनी सांगितलं की उत्तम बीज हे फळाच्या वाढीसाठी महत्त्वाचं असून रोपवाटिकां मधून संत्र्याची रोपे ही रोगमुक्त तसेच जास्त उत्पादन देणारी असली पाहिजे यासाठी – रोपवाटिकांना अद्यावत करण्याचे आवाहन त्यांनी नर्सरी धारकांना केले .नर्सरी ॲक्ट मध्ये सुधारणा करण्याचे तसेच शासकीय माध्यमातून अशा रोपवाटीकांना अनुदान देखील उपलब्ध करण्याचे धोरण आखण्याचे त्यांनी ऍग्रो व्हिजनच्या फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले. ड्रोन द्वारे खत – कीटकनाशक फवारणी, सेंद्रिय खताचा वापर यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाच्या वाढीमध्ये होईल.
विदर्भातील शेतकऱ्यांनी ऑरगॅनिक कार्बन त्याचप्रमाणे बायोचार यासारख्या नवीन संशोधनाला प्राथमिकता दिली पाहिजे. जमीन पाणी तसेच खताचे नियोजन करून उत्पादन खर्च देखील कमी करण्याकडे शेतकऱ्यांनी लक्ष दिले पाहिजे. यांत्रिक उपकरणांसाठी शेतकरी उत्पादक संस्थांच्या माध्यमातून ते कसे कमी पैशात उपलब्ध होतील यासाठी देखील शेतकरी उत्पादक संघटनांनी पुढाकार घेतला पाहिजे असे त्यांनी सांगितले.
या कार्यशाळेमध्ये तज्ञांनी आपल्या सादरीकरणाद्वारे संत्रा उत्पादकांसाठी बियाण्यांची निवड, फळ लागवड या विविध विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यशाळेला मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.
