राज्यात विधानसभा निवडणुकीत ५८ टक्क्यांहून अधिकच्या मतदानाची नोंद
मुंबई, दि. २०: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज काही अपवाद वगळता सुरळीत मतदान झालं. निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या हंगामी आकडेवारीनुसार राज्यात ५८ टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद झाली होती. सर्वाधिक ६९ टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद गडचिरोली जिल्ह्यात झाली. सर्वात कमी ५० टक्क्यांहून कमी मतदानाची नोंद मुंबई शहर आणि ठाणे जिल्ह्यात झाली. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सुमारे ५४ टक्के मतदानाची नोंद झाली.
सर्वाधिक सुमारे ७५ टक्के मतदान चिमूर विधानसभा मतदार संघात झालं. कागल, करवीर, ब्रह्मपुरी, शाहुवाडी, सिल्लोड, नेवासा या मतदारसंघात ७० टक्क्यांहून अधिक मतदान झालं. सर्वात कमी मतदानाची नोंद कल्याण पश्चिम आणि कुलाबा मतदारसंघात झाली. येथे केवळ ४१ टक्के मतदान झालं. चांदिवली, पिंपरी, उल्हासनगर, भिवंडी, धारावी, हडपसर, जळगाव या मतदारसंघात ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदान झालं. आता शनिवारी २३ तारखेला मतदारांनी कोणाला कौल दिला हे स्पष्ट होईल.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज्यात गेल्यावेळेपेक्षा कमी मतदान नोंदवलं गेलं. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ६३ टक्क्यांपेक्षा जास्त आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात ६१ पूर्णांक १ दशांश टक्के मतदानाची नोंद झाली होती. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ६१ पूर्णांक ३३ शतांश टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
Source – AIR
