लहान आणि दुर्गम गावांमध्येही खोकल्यावरील सिरप विक्रीसाठी परवाना बंधनकारक; औषध नियमांमध्ये महत्त्वाची दुरुस्ती लागू
नवी दिल्ली, दि. १७ : देशभरात खोकल्यावरील सिरपच्या विक्री आणि वितरणावर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने औषधे नियम, १९४५ मध्ये महत्त्वाची दुरुस्ती अधिसूचित केली आहे. या बदलानुसार, लहान गावांमध्ये कफ सिरपच्या विक्रीसाठी पूर्वी उपलब्ध असलेली नियामक सूट रद्द करण्यात आली असून आता अशा औषधांची विक्री केवळ परवानाधारक औषध विक्रेत्यांमार्फतच करता येणार आहे.
केंद्रीय मंत्रालयाने निर्गमित केलेल्या माहितीनुसार, ही दुरुस्ती २९ डिसेंबर २०२५ रोजी अधिसूचित करण्यात आली होती. त्यासंबंधीची राजपत्र अधिसूचना ३० डिसेंबर २०२५ रोजी ‘गॅझेट ऑफ इंडिया एक्स्ट्राऑर्डिनरी’मध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती. या दुरुस्तीअंतर्गत औषधे नियम, १९४५ मधील अनुसूची ‘के’ मधील अनुक्रमांक १३, नोंद ७ मधून “सिरप” हा शब्द वगळण्यात आला आहे.
औषधे आणि सौंदर्य प्रसाधने कायदा, १९४० अंतर्गत तयार करण्यात आलेल्या औषधे नियम, १९४५ मधील अनुसूची ‘के’मध्ये काही विशिष्ट प्रकारच्या औषधांना आणि त्यांच्याशी संबंधित नियमांना मर्यादित स्वरूपातील सूट देण्यात आलेली होती. यामध्ये एक हजारांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये काही परिस्थितींमध्ये किरकोळ विक्री परवान्याच्या अटींशिवाय कफ सिरपची विक्री करण्याची मुभा होती.
मात्र नव्या दुरुस्तीनंतर ही सूट पूर्णपणे रद्द झाली आहे. त्यामुळे देशातील सर्व भागांमध्ये, विशेषतः लहान आणि दुर्गम गावांमध्येही खोकल्यावरील सिरपची विक्री आणि वितरण करण्यासाठी संबंधित औषध विक्रेत्यांकडे वैध परवाना असणे आवश्यक राहणार आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या मते, सिरप स्वरूपातील औषधांच्या वितरणावर अधिक प्रभावी देखरेख ठेवणे, औषधांच्या गैरवापराला आळा घालणे आणि सार्वजनिक आरोग्य सुरक्षेला अधिक बळकटी देणे हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश आहे. औषधांच्या विक्रीसंदर्भातील विद्यमान सवलतींची चौकट बदलत्या आरोग्यविषयक गरजांनुसार अद्ययावत करणेही आवश्यक बनले होते.
गेल्या काही वर्षांत काही प्रकारच्या कफ सिरपच्या गैरवापराबाबत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर औषधांच्या उत्पादन, साठवणूक, वितरण आणि विक्री प्रक्रियेतील नियंत्रण अधिक मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ही दुरुस्ती करण्यात आल्याचे मानले जात आहे.
या निर्णयामुळे देशभरात औषध विक्रीसंदर्भातील नियमांचे अधिक काटेकोर पालन होण्यास मदत होणार असून खोकल्यावरील औषधांचे वितरण अधिक पारदर्शक आणि जबाबदार पद्धतीने होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, कफ सिरपचे उत्पादक, वितरक, घाऊक विक्रेते आणि किरकोळ औषध विक्रेते यांनी औषधे आणि सौंदर्य प्रसाधने कायदा, १९४० तसेच औषधे नियम, १९४५ अंतर्गत लागू असलेल्या सर्व परवाना आणि नियामक अटींचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिले आहेत.

