शिंदे गटाला धक्का देत नाशिकमध्ये अपक्ष गोकुळ गिते यांची बाजी
मुंबई, दि. २२ : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघातून होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला असून, महायुतीने या निवडणुकीत मोठे यश संपादन केले आहे. एकूण १७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत १६ जागांवर महायुती समर्थित उमेदवार विजयी झाले असून, एका जागेवर अपक्ष उमेदवाराने विजय मिळवला आहे. या निकालामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात महायुतीचे वर्चस्व अधिक दृढ झाल्याचे मानले जात आहे.
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी १८ जून २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. मात्र निवडणुकीपूर्वीच ६ मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने उर्वरित ११ जागांसाठीच प्रत्यक्ष मतदान झाले. मतमोजणीनंतर समोर आलेल्या निकालात भाजपने सर्वाधिक जागा जिंकत आपले वर्चस्व सिद्ध केले.
निवडणुकीच्या अंतिम निकालानुसार भाजपचे ११ उमेदवार विजयी झाले, तर शिवसेनेला ३ जागांवर यश मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे २ उमेदवार विजयी झाले असून नाशिक मतदारसंघात अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी विजय मिळवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
विशेष म्हणजे नाशिकमध्ये महायुतीतील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणारे अपक्ष उमेदवार तथा भाजपचे बंडखोर गोकुळ गिते यांनी विजय संपादन केला. त्यामुळे या मतदारसंघाचा निकाल राजकीयदृष्ट्या विशेष चर्चेचा विषय ठरला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत विजयी होण्यासाठी वैध मतांच्या ५० टक्क्यांपेक्षा एक मत अधिक मिळवणे आवश्यक असते. यालाच ‘विजयाचा कोटा’ असे संबोधले जाते. पहिल्या पसंतीच्या मतांमधून हा कोटा पूर्ण न झाल्यास पुढील पसंतीच्या मतांची मोजणी करून अंतिम निकाल निश्चित केला जातो.
या निवडणुकीत ठाणे, यवतमाळ, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, पुणे, वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर आणि अहिल्यानगर या सहा मतदारसंघांमध्ये उमेदवार बिनविरोध निवडून आले. उर्वरित मतदारसंघांमध्ये मतदानानंतर निकाल जाहीर करण्यात आले.
विजयी उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे आहे :
- ठाणे – रवींद्र फाटक (शिवसेना) – बिनविरोध
- यवतमाळ – दुष्यंत चतुर्वेदी (शिवसेना) – बिनविरोध
- रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग – अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस) – बिनविरोध
- पुणे – विक्रम काकडे (राष्ट्रवादी काँग्रेस) – बिनविरोध
- वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर – अरुण लखाणी (भाजप) – बिनविरोध
- अहिल्यानगर – प्राजक्त तनपुरे (भाजप) – बिनविरोध
- छत्रपती संभाजीनगर-जालना – सुहास शिरसाट (भाजप) – विजयी
- नाशिक – गोकुळ गिते (अपक्ष) – विजयी
- भंडारा-गोंदिया – अविनाश ब्राह्मणकर (भाजप) – विजयी
- सांगली-सातारा – धैर्यशील कदम (भाजप) – विजयी
- परभणी-हिंगोली – सईद खान (शिवसेना) – विजयी
- सोलापूर – राजेंद्र राऊत (भाजप) – विजयी
- धाराशिव-लातूर-बीड – बसवराज पाटील (भाजप) – विजयी
- नागपूर – राजीव पोतदार (भाजप) – विजयी
- जळगाव – नंदकिशोर महाजन (भाजप) – विजयी
- अमरावती – प्रवीण पोटे (भाजप) – विजयी
- नांदेड – अमर राजूरकर (भाजप) – विजयी
या निकालानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महायुतीची पकड अधिक मजबूत झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेषतः भाजपने बहुसंख्य जागांवर विजय मिळवत आगामी राजकीय समीकरणांसाठी आपली संघटनात्मक ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. दुसरीकडे नाशिकमधील निकालामुळे महायुतीतील अंतर्गत नाराजी आणि स्थानिक राजकीय समीकरणांचीही चर्चा रंगू लागली आहे. आगामी काळात या निकालांचे राज्याच्या व्यापक राजकारणावर काय परिणाम होतात, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.
