शैक्षणिक अभ्यास दौऱ्यांतून दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना देशातील महत्त्वाच्या संस्था, विज्ञान-तंत्रज्ञान आणि लोकशाही व्यवस्थेची प्रत्यक्ष ओळख
नवी दिल्ली, दि. ९: गडचिरोलीच्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा अर्थ आता केवळ वर्गखोली आणि पाठ्यपुस्तकांपुरता मर्यादित राहिलेला नाही. विमानप्रवासापासून राष्ट्रपती भवन, संसद भवन, आयआयटी, विज्ञान केंद्र आणि अन्य राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्थांच्या भेटीपर्यंतचा अनुभव या विद्यार्थ्यांना मिळत आहे. त्यामुळे गाव, जंगल आणि शाळेच्या परिचित चौकटीबाहेरचे जग त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवात येत असून, उच्च शिक्षण आणि भविष्यातील करिअरविषयीच्या त्यांच्या कल्पनांनाही नवी दिशा मिळत आहे.
गडचिरोलीसारख्या भौगोलिकदृष्ट्या दुर्गम आणि आदिवासीबहुल जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना अशा संधी मिळणे हा केवळ शैक्षणिक उपक्रमाचा भाग नसून त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा टप्पा ठरत आहे. विविध शासकीय विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या अभ्यास दौऱ्यांतून विद्यार्थ्यांना देशातील विविध क्षेत्रांची जवळून ओळख करून दिली जात आहे.
राष्ट्रपती भवनातील संवाद ठरला प्रेरणादायी क्षण
गडचिरोलीतील आदिवासी विद्यार्थ्यांच्या दिल्ली दौऱ्यात राष्ट्रपती भवनाला दिलेली भेट विशेष ठरली. आदिवासी विकास विभागाच्या जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजनेतून गडचिरोली, अहेरी आणि भामरागड येथील शासकीय आश्रमशाळांमधील ९६ विद्यार्थ्यांना दिल्लीतील शैक्षणिक अभ्यास दौऱ्याची संधी मिळाली.
या वेळी भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांची नावे, गावे, शिक्षण आणि भविष्यातील उद्दिष्टांविषयी त्यांनी माहिती घेतली. पोटेगाव येथील एका विद्यार्थ्याने आपल्याला शिक्षक व्हायचे असल्याचे सांगितले. या विद्यार्थ्याच्या ध्येयाचे कौतुक करत राष्ट्रपतींनी मोठी स्वप्ने पाहण्याबरोबरच ती पूर्ण करण्यासाठी शिक्षण, मेहनत आणि सातत्याने प्रयत्न करण्याचा संदेश दिला.
दुर्गम आदिवासी भागातून आलेल्या विद्यार्थ्याला देशाच्या प्रथम नागरिकांशी थेट संवाद साधण्याची मिळालेली संधी त्यांच्या आत्मविश्वासासाठी महत्त्वाची ठरली. अशा अनुभवातून विद्यार्थ्यांना आपल्या क्षमतेचा आणि उपलब्ध संधींचा अधिक व्यापक अंदाज येण्यास मदत होत आहे.
दिल्ली दौऱ्यात विद्यार्थ्यांनी संसद भवन, पंतप्रधान संग्रहालय, राष्ट्रीय विज्ञान केंद्र, आयआयटी दिल्ली, जंतरमंतर, राजघाट, लाल किल्ला, कुतुबमिनार आणि राष्ट्रीय प्राणीसंग्रहालयाला भेट दिली. त्यामुळे लोकशाही व्यवस्था, इतिहास, विज्ञान, उच्च शिक्षण आणि देशाच्या सांस्कृतिक वारशाचा परिचय त्यांना प्रत्यक्ष अनुभवातून झाला.
तीन वर्षांत ३६० विद्यार्थ्यांना विमानप्रवासाची संधी
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून मागील तीन वर्षांत गडचिरोली जिल्ह्यातील शासकीय निवासी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या ३६० विद्यार्थ्यांना विमानाने शैक्षणिक अभ्यास दौऱ्यावर जाण्याची संधी मिळाली. हैदराबाद, बंगळुरू आणि यावर्षी दिल्ली या ठिकाणी हे दौरे आयोजित करण्यात आले.
यातील अनेक विद्यार्थ्यांसाठी विमानप्रवासाचा अनुभव पहिल्यांदाच होता. नागपूर विमानतळावरून विमानाने महानगरांकडे जाताना त्यांच्या अनुभवविश्वाची चौकटही विस्तारत गेली. केवळ प्रवासाचा आनंद न घेता विविध संस्था आणि महत्त्वाच्या स्थळांना भेट देत विद्यार्थ्यांना देशाच्या विकासाची विविध रूपे समजून घेता आली.
मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याच्या विकासासोबतच दुर्गम आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण व व्यापक अनुभवाच्या संधी देण्यावर भर दिला जात आहे. विविध विभागांच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या अशा उपक्रमांचा त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून उल्लेख केला जात आहे.

‘मिशन जिकतूर’मधून गुणवत्तेला मिळतेय व्यासपीठ
गडचिरोली जिल्हा परिषदेने ग्रामीण आणि दुर्गम भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक संधी मिळाव्यात, या उद्देशाने ‘मिशन जिकतूर’ हा उपक्रम सुरू केला आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळविणाऱ्या जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना विमानाने मुंबईतील शैक्षणिक अभ्यास दौऱ्यावर नेण्यात आले. या दौऱ्यात विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचे मुख्य सचिव तथा गडचिरोलीचे पालक सचिव राजेश अग्रवाल यांच्याशी संवाद साधला.
या संवादात विद्यार्थ्यांनी शिक्षक, डॉक्टर, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकारी होण्याची आपली इच्छा व्यक्त केली. त्याचबरोबर मंत्रालय, विधानभवन, गेटवे ऑफ इंडिया, नेहरू विज्ञान केंद्र, तारांगण तसेच अन्य ऐतिहासिक आणि शैक्षणिक स्थळांना भेट देऊन त्यांनी विविध क्षेत्रांची माहिती घेतली.
‘मिशन जिकतूर’च्या माध्यमातून शिष्यवृत्ती आणि नवोदय प्रवेश परीक्षेची तयारी, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, उत्तरपत्रिका भरण्याचा सराव आणि शिक्षकांचे मार्गदर्शन अशा विविध बाबींवरही भर दिला जात आहे. त्यामुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला योग्य व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
अनुभवातून बदलतेय विद्यार्थ्यांची स्वप्ने
दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मोठ्या संस्थांची केवळ माहिती देण्यापेक्षा त्या प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळणे अधिक परिणामकारक ठरू शकते. विज्ञानाचे शिक्षण पुस्तकातून घेणे आणि विज्ञान केंद्रात जाऊन प्रयोग व संशोधनाचे जग जवळून पाहणे, या दोन्ही अनुभवांमध्ये मोठा फरक आहे.
त्याचप्रमाणे संसद भवन किंवा राष्ट्रपती भवनाला भेट दिल्यामुळे लोकशाही व्यवस्था आणि देशातील सर्वोच्च घटनात्मक संस्थांविषयी विद्यार्थ्यांच्या मनात प्रत्यक्ष अनुभवातून कुतूहल निर्माण होते. आयआयटीसारख्या संस्थेला भेट दिल्यानंतर उच्च शिक्षणाच्या पर्यायांविषयी त्यांना अधिक स्पष्ट कल्पना मिळू शकते.
याच कारणामुळे अशा अभ्यास दौऱ्यांकडे केवळ सहल म्हणून पाहण्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या अनुभवविश्वाचा विस्तार करणारा शैक्षणिक उपक्रम म्हणून पाहिले जात आहे. ‘मीही भविष्यात या संस्थेत शिक्षण घेऊ शकतो’, ‘मीही वैज्ञानिक किंवा अधिकारी होऊ शकतो’, असा आत्मविश्वास निर्माण होणे हा या उपक्रमांचा महत्त्वाचा परिणाम मानला जात आहे.
परंपरा जपत आधुनिक शिक्षणाकडे वाटचाल
गडचिरोलीची ओळख केवळ दुर्गम जिल्हा म्हणून नाही. आदिवासी समाजाची स्वतंत्र संस्कृती, भाषा, लोककला, परंपरा आणि निसर्गाशी असलेले घट्ट नाते ही या जिल्ह्याची मोठी संपत्ती आहे. त्यामुळे आधुनिक शिक्षण आणि तंत्रज्ञानाच्या दिशेने वाटचाल करताना हा सांस्कृतिक वारसा जपणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने आदिवासी समाजाच्या संस्कृती आणि अस्मितेबरोबरच नव्या पिढीच्या शिक्षणाचा आणि भविष्यातील संधींचाही विचार पुढे येतो. गडचिरोलीतील विद्यार्थ्यांना देशातील महत्त्वाच्या संस्था आणि आधुनिक ज्ञानव्यवस्थेशी जोडण्याचे प्रयत्न या व्यापक दृष्टिकोनातून महत्त्वाचे ठरतात.
आज गडचिरोलीच्या दुर्गम भागातील विद्यार्थी आपल्या गावाच्या सीमा ओलांडून देशाच्या राजधानीपर्यंत पोहोचत आहेत. राष्ट्रपतींशी संवाद साधण्यापासून संसद, आयआयटी आणि विज्ञान केंद्रांना भेट देण्यापर्यंतचा अनुभव त्यांच्या वाट्याला येत आहे. त्यामुळे भौगोलिकदृष्ट्या दुर्गम असलेल्या या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी संधींचे अंतर कमी करण्याचा प्रयत्न होताना दिसतो.
गावापासून महानगरापर्यंतचा हा प्रवास काही तासांचा असला, तरी विद्यार्थ्यांच्या विचारविश्वात निर्माण होणारा बदल दीर्घकाळ परिणाम करणारा ठरू शकतो. गडचिरोलीची माती, जंगल आणि आदिवासी संस्कृतीशी नाते कायम ठेवत आधुनिक शिक्षणाच्या नव्या क्षितिजांकडे पाहण्याची दृष्टी निर्माण होणे, हेच या उपक्रमांचे मोठे फलित ठरू शकते.
