राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला जाणार
पुणे, दि. ९ : मतदारसंघ पुनर्रचनेच्या संभाव्य विधेयकावरून देशाच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले असताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. पक्षाचे आठ खासदार सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी केलेल्या सूचक वक्तव्यामुळे या भेटीबाबतच्या चर्चांना आणखी वेग आला आहे. “१७ ऑगस्टपर्यंत सर्वांना अनेक घडामोडी बघाव्या लागतील, तोपर्यंत पुलाखालून बरंच पाणी वाहून जाईल,” असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार यांनी मतदारसंघ पुनर्रचना, पक्षाच्या खासदारांची पंतप्रधानांशी होणारी भेट तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर झालेल्या टीकेसह विविध राजकीय मुद्द्यांवर भूमिका स्पष्ट केली.
खासदारांच्या मोदी भेटीने चर्चेला उधाण
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आठ खासदार सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. पक्षाकडून ही भेट शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, त्याचवेळी संसदेत मतदारसंघ पुनर्रचनेशी संबंधित विधेयक येण्याची शक्यता आणि त्यावरून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जात आहे.
यापूर्वी खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. त्यामुळे आगामी काळातील राजकीय समीकरणांबाबत विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
याच मुद्द्यावर भाष्य करताना रोहित पवार यांनी “संसदेत हे विधेयक आल्यावर कोण कोणाच्या बाजूने उभे राहते आणि कोण गैरहजर राहते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. आमचे खासदार पंतप्रधानांना भेटणार असले, तरी ही भेट केवळ शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांची वेळ मिळायला दहा दिवस लागतात, पण पंतप्रधानांची वेळ लगेच कशी मिळते?” असा सवाल उपस्थित केला.
‘आमचे खासदार विधेयकाच्या विरोधातच राहतील’
मतदारसंघ पुनर्रचनेच्या मुद्द्यावर आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व खासदार प्रस्तावित विधेयकाच्या विरोधात मतदान करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच मतदानाच्या वेळी कोणताही खासदार गैरहजर राहणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मतदारसंघ पुनर्रचनेच्या प्रक्रियेत अधिकाऱ्यांचा वापर करून मतदारसंघांच्या रचनेत फेरबदल करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
“सध्या डिलिमिटेशनच्या नावाखाली अधिकाऱ्यांना हाताशी धरून मतदारसंघांची मोडतोड करण्याचे काम सुरू आहे. जर लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांची अशा प्रकारे तोडफोड केली गेली, तर देशात लोकशाहीच शिल्लक राहणार नाही,” असा संताप रोहित पवार यांनी व्यक्त केला. त्यांच्या या भूमिकेमुळे संसदेत मतदारसंघ पुनर्रचनेचे विधेयक आल्यास राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार त्याला विरोध करण्याच्या भूमिकेत राहतील, हे स्पष्ट झाले आहे.
सुनेत्रा पवारांवरील ‘गुंगी गुडिया’ टीकेवरही रोहित पवारांचा निशाणा
दरम्यान, काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत करण्यात आलेल्या ‘गुंगी गुडिया’ या टीकेवरही रोहित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी विरोधकांच्या टीकेकडे केवळ राजकीय आरोप म्हणून न पाहता संबंधित पदावरील व्यक्तीच्या भूमिकेच्या संदर्भात विचार करण्याची गरज असल्याचे म्हटले.
रोहित पवार म्हणाले, “विरोधकांच्या टीकेकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे आहे. तुमच्याकडे राज्याचे उपमुख्यमंत्रिपद असताना त्या अधिकारांचा वापर करून धाडसी निर्णय घेणे अपेक्षित असते. मात्र, पत्रकार परिषदेत त्यांच्याच पक्षाचे नेते स्वतःला पक्षाध्यक्ष समजून वावरतात आणि पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात, हे चुकीचे आहे. सुनेत्रा पवार यांनी आपल्या पदाचा वापर करत आक्रमक भूमिका मांडावी, अशी अनेकांची अपेक्षा आहे. परंतु, त्यांच्याच पक्षाचे नेते त्यांना बोलू देत नाहीत की त्यांचा काही वेगळा प्रोटोकॉल आहे, हे समजत नाही,” असा टोला त्यांनी लगावला.
१७ ऑगस्टपर्यंतच्या घडामोडींकडे लक्ष
मतदारसंघ पुनर्रचनेचा मुद्दा संसदेत पुन्हा चर्चेत येण्याची शक्यता, विविध पक्षांकडून सुरू असलेल्या राजकीय हालचाली आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी होणारी भेट यामुळे पुढील काही दिवस महत्त्वाचे ठरणार आहेत.
विशेषतः १७ ऑगस्टपर्यंत अनेक राजकीय घडामोडी घडतील, असे रोहित पवार यांनी सूचित केल्याने त्यांच्या वक्तव्याचा नेमका राजकीय संदर्भ काय, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे संसदेत मतदारसंघ पुनर्रचनेचा विषय प्रत्यक्ष चर्चेला आल्यावर कोणता पक्ष कोणती भूमिका घेतो, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष राहणार आहे.

