Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

“उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी सतत सुसंवाद साधत आहेत” – शरद पवार यांची मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमने

“उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी सतत सुसंवाद साधत आहेत” – शरद पवार यांची मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमने

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोनाशी लढताना चालू परिस्थितीतील राजकारणावर भाष्य केले.

जाणून घ्या नेमकं काय म्हणाले शरद पवार

संपूर्ण विश्वात आज एकाच समस्येची चर्चा सुरू आहे ती म्हणजे कोरोनाचे संकट. कोरोनाचा सामना धीराने व योग्य नियोजन करून केला पाहिजे. भारतातही केंद्र सरकार व राज्य सरकार, संपूर्ण शासकीय यंत्रणा, वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी हे सगळेजण कोरोनाला पराभूत करण्यासाठी धीराने उभे राहिले आहेत.

मा. प्रधानमंत्र्यानी काल देशाला संबोधित करत पुढील दिवसांसाठी काही सूचना केल्या. त्यांनी मांडलेल्या भूमिकेला पूर्णपणे सहकार्य करण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे. प्रधानमंत्र्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी व इतर राजकीय पक्षांशी संपर्क साधून या संकटावर एकत्रितपणे मात कशी करता येईल याची चर्चा केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारीही अशीच भूमिका घेत आहेत. मा. उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी सतत सुसंवाद साधत आहेत. संवादाच्या माध्यमातून जनतेला धीर देण्याची खबरदारी ते घेत आहेत.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन लॉकडाऊनचा कालावधी ३ मे वाढवण्यात आला आहे, आपल्याला या काळात सरकारला पूर्णपणे सहकार्य करायचं आहे. त्याचे कारण असे की पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत आपल्या इथली परिस्थिती वेगळी आहे. या आजाराची लागण झालेल्यांचा आकडा पाहिल्यास हे चिंताजनक चित्र आहे. कोरोनाचे १३०६ रुग्ण बरे झाले आहेत, तर ३७७ रुग्ण दुर्दैवाने मृत्युमुखी पडले. जे रुग्ण यात मृत्युमुखी पडले त्यात एका विशिष्ट वयाच्या वरील घटक जास्त आहेत. याचा नीट अभ्यास केला असता लक्षात येते की बळी पडणारे रुग्ण हे अन्य व्याधींनी ग्रासलेले होते. भारताचे वैशिष्ट्य असे की, शारीरिक दृष्ट्या एखाद्या आजाराला सामोरं जाण्यासाठी आपल्याकडे प्रतिकारशक्तीही जास्त आहे. त्यामुळे युरोप व अमेरिकेशी आपली तुलना शक्य होणार नाही. तसेच प्रशासनाकडून जी उपाययोजना करणे गरजेचे आहे त्यासाठी सर्व पावले टाकली गेली आहेत. वैद्यकीय क्षेत्रात, अन्नधान्याच्या क्षेत्रात योग्य ती काळजी सरकारने घेतली आहे. कष्ट करणाऱ्या कामगार वर्गांचे काम दुर्दैवाने थांबलेय. पण त्यांना पुढेही सेवेमध्ये ठेवण्याची काळजी उद्योजकांनी घेतली पाहिजे.

परप्रांतीय कामगार हे आता आपल्या गावी जाण्याच्या मानसिकतेत आहेत. परंतु राष्ट्र पातळीवर जे धोरण ठरले आहे त्यानुसार त्यांना प्रवास करण्याची सुविधा आपण देऊ शकत नाही. मात्र, त्यांना अन्न व आरोग्य सुविधा देण्यासाठी आपले प्रशासन तसेच अन्य सेवाभावी संस्था पुढे येत आहेत. बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची परिस्थिती अतिशय गंभीर आहे. सरकारकडून या कामगारांना काही निधी देऊन, आधार देण्याची व्यवस्था होत आहे.

गरजूंच्या मदतीसाठी समाजातील सर्व घटक पुढे आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते तसेच इतर पक्षाचे घटकदेखील यात उतरले आहेत. यात कोणी राजकारण आणू नये. स्वतःची चिंता न करता समोरच्याला अडचणीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न सर्वांकडून होतो आहे.

अन्नधान्याच्या संबंधी जी काळजी घ्यायची ते संबंधित मंत्री छगन भुजबळ व त्यांचे सहकारी योग्यप्रकारे घेत आहेत. आज पर्यंत ५ कोटी ९ लाख गरजूंना ३८ हजार क्विंटल धान्य वाटप झाले आहे. त्याचबरोबर ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही त्यांनाही योग्य ती मदत केली जात आहे.

अर्थकारणावर या महामारीचा विपरीत परिणाम झाला आहे. बाजारपेठेला मर्यादा आल्या आहेत. शेतीवरही परिणाम होत आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या वस्तू बाजारात येण्यास संकटं येत आहेत. हातात आलेले पीक सोडून देण्याची भूमिका शेतकऱ्याला घ्यावी लागतेय. उद्योग बंद असल्याने उद्योजकांवर कामगारांची जबाबदारी वाढत आहे, त्यामुळे पुढील काळात बेकारी व बेरोजगारीचे संकट वाढू शकते. हे प्रमाण दिवसेंदिवस वाढेल असे दिसत असल्याने आपण आताच योग्य खबरदारी घ्यायला हवी.

राज्यात मे महिन्यामध्ये साधारणतः पिण्याच्या पाण्याची कमतरता भासते. यासाठी शासनाने योग्य ती खबरदारी घेऊन जिल्हा, तालुका पातळीवर योग्य ती काळजी व उपाययोजना आताच करायला हव्यात. पाणी संकटाला सामोरे जाण्याची तयारी ठेवायला हवी.

कोरोनाचे संकट एक-दोन महिन्यांचे नसून आर्थिक क्षेत्रात यावर मात करण्यासाठी पुढील एक-दोन वर्षांचा कालावधी लागू शकतो. यासाठी केंद्राने अजून खबरदारी घ्यायला हवी.
तसेच अन्न महामंडळ हे गहू, बाजरी, तांदूळ, ज्वारी याची खरेदी करतात त्याची उपलब्धता राज्या-राज्यात करून सर्वसामान्यांच्या फायद्याचा विचार करायला हवा. त्यासोबतच सीएसआर फंड सुरू करून त्याला मदत कशी होईल, राज्याला त्याचा काय फायदा होऊ शकतो याकडे लक्ष दिले पाहिजे.

काल वांद्रे रेल्वे स्थानकाजवळ एक दुर्दैवी प्रसंग घडला. हजारोंच्या संख्येने या ठिकाणी लोक जमा झाले. यातून सोशल डिस्टन्सिंगच्या सूचना पाळल्या गेल्या नाहीत. लोकांमध्ये असे संभ्रमाचे वातावरण निर्माण होईल अशा कोणत्याही सूचना कोणी देऊ नये. राजकीय पक्षाच्या नेत्यांना मी विनंती करू इच्छितो की राजकीय संघर्ष काही चुकीचा नाही, पण देशावर भीषण संकट असताना राजकारण करण्याची आताची स्थिती नाहीये. म्हणून कुठल्या पक्षाचे सरकार आहे हे न पाहता या संकटावर मात करण्यासाठी पावले टाकण्याची गरज आहे. वांद्रे येथील घटनेची पुनरावृत्ती होऊ नये याची काळजी घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो.

डॉ. बाबासाहेबांच्या जयंती दिनी त्यांचे स्मरण करण्यासाठी लाखोंचा जनसागर चैत्यभूमीला येतो. पण आंबेडकरी जनतेने योग्य खबरदारी घेऊन बाबासाहेबांच्या विचाराला साजेसं वर्तन केलं, गर्दी टाळली याबद्दल त्या सर्वांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो. तसेच अहोरात्र संकटाशी लढणाऱ्या प्रशासन यंत्रणेचेही मी मनापासून अभिनंदन करतो.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *