मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला नवी गती
मुंबई, दि. २० : मुंबई–अहमदाबाद उच्चगती रेल्वे (बुलेट ट्रेन) प्रकल्पाच्या उभारणीत आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार पडला असून महाराष्ट्रातील सावली (घणसोली) ते विक्रोळी या मार्गावरील समुद्राखालच्या रेल्वे बोगद्याच्या खोदकामाला आज दुसऱ्या टनेल बोरिंग मशीन (टीबीएम) द्वारे प्रारंभ करण्यात आला. या टप्प्याची एकूण लांबी १० किलोमीटर असून त्यापैकी सुमारे ७ किलोमीटरचा बोगदा ठाणे खाडीजवळ समुद्राखालून जाणार आहे. कोणत्याही रेल्वे कॉरिडॉरसाठी भारतात प्रथमच समुद्राखालून रेल्वे बोगदा तयार केला जात असल्याने हा प्रकल्प देशाच्या अभियांत्रिकी इतिहासातील महत्त्वाचा मैलाचा दगड मानला जात आहे.
मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील एकूण २१ किलोमीटर लांबीच्या भुयारी बोगद्यापैकी १६ किलोमीटरचा भाग सावली (घणसोली) ते वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) दरम्यान अत्याधुनिक टनेल बोरिंग मशीनच्या साहाय्याने तयार केला जाणार आहे. यापूर्वी ५ जुलै २०२६ रोजी पहिल्या टीबीएमद्वारे विक्रोळीकडून बीकेसीच्या दिशेने सुमारे ६ किलोमीटर लांबीच्या बोगद्याच्या खोदकामास सुरुवात झाली होती. उर्वरित ५ किलोमीटरचा भाग न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धतीने (एनएटीएम) यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आला आहे.
भारतातील सर्वात मोठ्या रेल्वे टनेल बोरिंग मशीनपैकी एक
या प्रकल्पासाठी वापरण्यात येणारे टनेल बोरिंग मशीन हे भारतात रेल्वे बोगद्यांच्या बांधकामासाठी वापरल्या गेलेल्या सर्वात मोठ्या यंत्रांपैकी एक आहे. या मशीनचा कटरहेड व्यास १३.६ मीटर असून तो सुमारे चार मजली इमारतीच्या उंचीइतका आहे. या यंत्राचे एकूण वजन ३,२०० टन असून ते सुमारे पाचशे आशियाई हत्तींच्या वजनाइतके आहे. मशीनची एकूण लांबी ९६ मीटर असून ती जवळपास एका फुटबॉल मैदानाच्या लांबीएवढी आहे.
या अत्याधुनिक यंत्रामध्ये कटर व्हील, मुख्य बेअरिंग, जॉ क्रशर, इरेक्टर, मुख्य शिल्ड, टेल शिल्ड तसेच बोगद्याच्या बांधकामासाठी सहाय्य करणाऱ्या चार विशेष गॅन्ट्रींचा समावेश आहे.
मिक्सशील्ड तंत्रज्ञानामुळे सुरक्षित आणि अचूक बोगदा
या मशीनची रचना मिक्सशील्ड प्रकारातील, निमस्वयंचलित आणि स्लरी-आधारित टनेल बोरिंग मशीन म्हणून करण्यात आली आहे. उत्खननादरम्यान बोगद्याच्या पुढील भागाला स्थिर ठेवण्यासाठी दाबयुक्त बेंटोनाइट स्लरी सर्किट वापरण्यात येते. त्यामुळे गुंतागुंतीच्या आणि आव्हानात्मक भूगर्भीय परिस्थितीतही सुरक्षित, स्थिर आणि कार्यक्षम पद्धतीने बोगदा तयार करणे शक्य होते. जगभरात ही पद्धत अत्यंत विश्वासार्ह आणि सिद्ध तंत्रज्ञान म्हणून स्वीकारली जाते.
मुंबईसारख्या दाट लोकवस्तीच्या शहरी भागात बोगद्याचे काम करताना जमिनीचे खचणे, वाहतुकीवरील परिणाम आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनात होणारा व्यत्यय कमीत कमी राहावा, यासाठी या मिक्सशील्ड तंत्रज्ञानाची निवड करण्यात आली आहे.
एकाच वेळी उत्खनन आणि काँक्रीट रिंग उभारणी
या टनेल बोरिंग मशीनमध्ये अत्याधुनिक सेमी-कंटिन्युअस ॲडव्हान्स प्रणाली बसविण्यात आली आहे. या प्रणालीमुळे बोगद्याच्या काँक्रीट रिंग बसविण्याचे काम आणि पुढील भागाचे उत्खनन ही दोन्ही कामे एकाच वेळी सुरक्षित व कार्यक्षम पद्धतीने करता येतात. परिणामी मशीनच्या प्रत्यक्ष उत्खननाचा वेग वाढून संपूर्ण प्रकल्प नियोजित कालावधीत पूर्ण करण्यास मदत होणार आहे.
भूमिगत कामासाठी उभारला ३९ मीटर खोल लाँचिंग शाफ्ट
टनेल बोरिंग मशीन भूमिगत मार्गावर उतरवण्यासाठी मुंबईतील सावली येथे ३९ मीटर खोल लाँचिंग शाफ्ट तयार करण्यात आला आहे. ही खोली साधारण बारा मजली इमारतीच्या उंचीइतकी असल्याने या कामाचे अभियांत्रिकी स्वरूप किती आव्हानात्मक आहे, याची कल्पना येते.
मर्यादित जागेचा कार्यक्षम वापर करण्यासाठी मशीनचे विविध भाग स्वतंत्रपणे खाली उतरविण्यात आले. सर्वप्रथम मशीनच्या गॅन्ट्री खाली उतरवून त्या आधीच एनएटीएम पद्धतीने तयार करण्यात आलेल्या बोगद्यात पुढे नेण्यात आल्या. त्यानंतर मुख्य शिल्ड आणि कटरहेड शाफ्टमध्ये उतरवून त्यांची यशस्वी जोडणी करण्यात आली.
अत्याधुनिक सुरक्षा आणि निरीक्षण व्यवस्था
या टनेल बोरिंग मशीनच्या ट्रेलिंग बॅकअप प्रणालीमध्ये चार दुहेरी मजली गॅन्ट्री बसविण्यात आल्या असून त्यामध्ये रोलर क्रशर, स्लरी पंप, हायड्रॉलिक प्रणाली, ऑपरेटर केबिन, ग्राउटिंग प्रणाली, वीजपुरवठा यंत्रणा, आपत्कालीन आश्रय कक्ष, कार्यशाळा, केबल व्यवस्था आणि इतर सहाय्यक उपकरणांचा समावेश आहे.
सुरक्षेसाठी मशीनमध्ये मिथेन, ऑक्सिजन, कार्बन मोनॉक्साइड आणि कार्बन डायऑक्साइड या वायूंचे प्रत्यक्ष वेळेत निरीक्षण करणारी बहुवायू निरीक्षण प्रणाली बसविण्यात आली आहे. तसेच स्वयंचलित अग्निशोध यंत्रणा, स्वयंचलित अग्निशमन प्रणाली, सुरक्षा जलपडदा आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी स्वतंत्र जलफवारणी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.
शाफ्ट परिसरात आधुनिक पायाभूत सुविधा
टनेल बोरिंग मशीनच्या कामासाठी शाफ्ट परिसरात जलशुद्धीकरण प्रकल्प, स्लरी प्रक्रिया केंद्र, बेंटोनाइट साठवण टाक्या, स्वतंत्र वीज उपकेंद्र, बॅकअप जनरेटर, ग्राउटिंगसाठी रेडी मिक्स काँक्रीट प्रकल्प, स्लरी वाहतूक व्यवस्था, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प तसेच आवश्यक वाहतूक आणि पुरवठा सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत.
प्रत्यक्ष वेळेतील निरीक्षण आणि जलरोधक संरचना
बोगद्याचे सुरक्षित उत्खनन आणि आसपासच्या संरचनांचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी सरफेस सेटलमेंट पॉइंट, ऑप्टिकल डिस्प्लेसमेंट सेन्सर, टिल्ट मीटर, स्ट्रेन गेज, बाय-रिफ्लेक्टिव्ह टार्गेट आणि भूकंपलेखक यांसारख्या अत्याधुनिक उपकरणांद्वारे सतत प्रत्यक्ष वेळेत निरीक्षण करण्यात येत आहे.
टीबीएमच्या सहाय्याने तयार होणारा बोगदा पूर्णपणे जलरोधक संरचना म्हणून विकसित केला जात आहे. भूजलाचा परिणाम रोखण्यासाठी बोगद्याच्या अस्तरावर दुहेरी स्तराच्या इथिलीन प्रॉपिलीन डायीन मोनोमर गॅस्केट आणि जलशोषक सील वापरण्यात आले असून त्यामुळे बोगद्याची दीर्घकालीन सुरक्षितता, टिकाऊपणा आणि कार्यक्षमता सुनिश्चित केली जाणार आहे.
मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील हा समुद्राखालचा बोगदा पूर्ण झाल्यानंतर देशाच्या उच्चगती रेल्वे नेटवर्कमध्ये अत्याधुनिक अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा नवा अध्याय सुरू होणार असून, भारताच्या पायाभूत सुविधांच्या विकासात हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
