प्रारूप यादी १७ ऑगस्टला, अंतिम मतदार यादी १९ ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार
मुंबई, दि. १८ : भारत निवडणूक आयोगाने राज्यातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन – एसआयआर) कार्यक्रमाचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. राज्यातील अलीकडील अतिवृष्टीमुळे विविध भागांमध्ये पुनरीक्षणाच्या कामावर परिणाम झाल्याने मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी आयोगाकडे मुदतवाढीची विनंती केली होती. ही विनंती मान्य करून आयोगाने सुधारित कार्यक्रमाला मंजुरी दिल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण ही निवडणूक प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाची आणि नियमित प्रशासकीय प्रक्रिया आहे. या प्रक्रियेद्वारे मतदार याद्यांमधील नोंदी अद्ययावत करणे, पात्र नागरिकांची नावे समाविष्ट करणे, अपात्र नोंदी वगळणे तसेच मतदार यादी अधिक अचूक आणि पारदर्शक ठेवण्याचे काम केले जाते.
सुधारित कार्यक्रमानुसार, मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत (बीएलओ) गृहभेटीची मोहीम ३० जून ते ८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. याच कालावधीत मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण आणि आवश्यक त्या ठिकाणी पुनर्रचनेचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.
त्यानंतर सोमवार, दि. १७ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर दि. १७ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत मतदारांकडून दावे आणि हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. या प्रक्रियेद्वारे नव्या मतदारांची नोंदणी, नावातील दुरुस्ती, पत्ता बदल, नाव वगळणे अथवा इतर आवश्यक बदलांसाठी अर्ज करता येणार आहे.
याचबरोबर दि. १७ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत संबंधित प्रकरणांमध्ये नोटिसा देणे, सुनावणी घेणे तसेच प्राप्त दावे आणि हरकतींचा नियमानुसार निपटारा करण्याची प्रक्रिया पार पडणार आहे. संबंधित निवडणूक नोंदणी अधिकारी सर्व अर्जांची छाननी करून अंतिम निर्णय घेतील. या सर्व प्रक्रियेनंतर सोमवार, दि. १९ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून, त्यानंतर अद्ययावत मतदार यादी अधिकृतपणे लागू होईल.
याबाबत सह मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर यांनी पात्र नागरिकांना आवाहन करताना सांगितले, “पात्र नागरिकांनी निर्धारित कालावधीत मतदार यादीत नाव समाविष्ट होण्यासाठी गणना प्रपत्र भरून देऊन निवडणूक प्रशासनाला सहकार्य करावे.”
निवडणूक प्रशासनाने नागरिकांना आपल्या मतदार नोंदी वेळेत तपासून आवश्यक असल्यास दावे व हरकती निश्चित मुदतीत सादर करण्याचे आवाहन केले आहे. यामुळे मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि सर्वसमावेशक होण्यास मदत होणार आहे.

