सहा खासदारांच्या विलीनीकरणाला मान्यता, संजय राऊतांचा न्यायव्यवस्था व केंद्र सरकारवर घणाघात
मुंबई, दि. १९ : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला दिल्लीत मोठा राजकीय धक्का बसला आहे. लोकसभा सचिवालयाने आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून फुटून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सहभागी झालेल्या सहा खासदारांच्या गटाच्या विलीनीकरणाला अधिकृत मान्यता दिली आहे. या निर्णयानंतर संबंधित सहाही खासदारांना लोकसभेत शिंदे गटाचे अधिकृत खासदार म्हणून मान्यता मिळाली आहे. या निर्णयानंतर ठाकरे गटाचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत तीव्र प्रतिक्रिया देत लोकसभा अध्यक्ष, केंद्र सरकार तसेच न्यायव्यवस्थेवर गंभीर आरोप केले.
“सर्वोच्च न्यायालयही गुलाम आहे”
लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयावर टीका करताना संजय राऊत म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयही गुलाम आहे. सर्वोच्च न्यायालयाने ४० आमदारांच्या आमच्या प्रलंबित प्रकरणाचा निकाल दिला असता, तर वारंवार देशात पक्ष फोडले गेले नसते. देशात लोकशाहीवर बलात्कार करून हत्या होत आहे. संविधान कुठे उरले आहे? दहाव्या परिशिष्टात कुठल्याही पक्षफुटीला किंवा विलीनीकरणाला मान्यता नाही. मग लोकसभा अध्यक्षांनी ६ फुटीर खासदारांच्या गटाला मान्यता कशी दिली?” राऊत यांनी या निर्णयामुळे लोकशाही आणि संविधानिक व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचा आरोपही केला.
“मशाल चिन्हावर निवडून आलेले लोक पन्नास कोटींना विकत घेतले”
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर थेट निशाणा साधताना संजय राऊत म्हणाले, “एकनाथ शिंदे म्हणजे आचार्य विनोबा भावे नाहीत. दाढी जरी असली त्यांना आचार्यांप्रमाणे, तर ते आचार्य विनोबा भावे नाहीत. ते बोलतील ते सत्य आहे आणि नीतिमत्तेचे आहे असे नाही. ते मशालीवर निवडून आलेले ६ लोक तुम्ही ५० कोटींना विकत घेतले. मशाल चिन्हावर निवडून आलेले लोक निर्लज्ज आणि गद्दार आहेत. ते चांगले की वाईट हे सोडून द्या, हे गद्दार आहेत. यात कोणते शौर्य, नीतिमत्ता आणि लोकशाही आहे? चांगले आणि वाईट याचे उत्तर त्यांनी द्यावे. आम्ही त्यांना मशाल चिन्हावर निवडून आणले. माननीय उद्धव ठाकरे साहेबांना मते पडली आहेत, मशालीला मते पडली आहेत, तुमच्या चोरलेल्या धनुष्यबाणाला नाही.”
“दाढीवर हात फिरवून आम्हाला नीतिमत्ता शिकवू नका”
संजय राऊत यांनी आपल्या टीकेत आणखी तीव्र शब्दांचा वापर करत एकनाथ शिंदे यांच्यावर आणि भाजप नेतृत्वावर हल्लाबोल केला. ते म्हणाले, “तुम्ही काय आम्हाला सांगत आहात? एक दिवस ही दाढी एखादा हनुमान येईल आणि जाळून टाकेल, हे लक्षात घ्या. दाढीवरती हात फिरवून तुम्ही आम्हाला नीतिमत्ता शिकवू नका. तुमची जी नीतिमत्ता आहे, ती अमित शाह यांच्या पायापाशी गहाण पडली आहे. मुळात तुम्हाला आब्रू नव्हती. हे जे ६ लोक आहेत त्यांना लाज वाटली पाहिजे, ते निर्लज्ज आहेत. गद्दार शब्दसुद्धा त्यांना कमी पडेल. लोकसभेचे अध्यक्ष किंवा पार्लमेंट जे आहेत, हा लोकशाहीवरचा बलात्कार करून हत्या केल्यासारखा प्रकार आहे. हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे. हे जे आहेत ते सिरीयल रेपिस्ट आहेत. लाज वाटत नाही का या लोकांना पक्ष फोडायला? ५०-५० कोटींना माणसे विकत घेता? लोकांना खायला अन्न नाही, पाणी नाही, लोक शिक्षणासाठी उपोषणाला बसले आहेत आणि तुम्ही आम्हाला काय दाखवत आहात? तुम्ही सिरीयल रेपिस्ट आणि सिरीयल किलर आहात.”

राजकीय वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता
लोकसभा अध्यक्षांनी सहा खासदारांच्या विलीनीकरणाला अधिकृत मान्यता दिल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. या निर्णयावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत असून, संजय राऊत यांनी केलेल्या तीव्र व्यक्तव्यांमुळे या वादाला आणखी राजकीय रंग चढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या निर्णयावर शिंदे गटाकडून समाधान व्यक्त करण्यात आले असून, ठाकरे गटाने मात्र या निर्णयावर तीव्र आक्षेप नोंदवत लोकशाही प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
