खा. संजय राऊत व संदीप देशपांडे यांनी उघड केला पडद्यामागचा घटनाक्रम
मुंबई, दि. २७: महाराष्ट्रातील शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून लागू करण्यात आलेल्या हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात काल उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने व राज ठाकरे यांच्या मनसेने मोर्चाची हाक दिली होती. शिवसेनेचा मोर्चा ७ जुलै रोजी होणार होता. तर मनसेचा मोर्चा ६ जुलै रोजी होणार असल्याची घोषणा करण्यात आली. परंतु, काही वेळातच मनसेने आपल्या मोर्चाचा दिवस बदलून ५ जुलै केला. राज ठाकरे यांनी आधी जाहीर केलेला दिवस अचानक का बदलला याबाबत सस्पेन्स होता. आज सकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आधी एक्स(Twitter) या समाजमाध्यमाच्या मार्फत पोस्ट करत व त्यानंतर पत्रकार परिषदेत मोठा राजकीय बॉंब टाकत कालचा सस्पेन्स उघड केला. शिवसेना ठाकरे गट व मनसे यांचा संयुक्त मेळावा होणार असून त्याबाबतची घोषणा यावेळी संजय राऊत यांनी केली. यावेळी ते म्हणाले कि काल मातोश्री येथे बैठक आटोपून मी बाहेर पडत असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मला फोन आला. राज ठाकरे यांनी जाहीर केलेल्या मोर्चाच्या तारखेबाबत आपण अनभिज्ञ होतो. हिंदी भाषेच्या सक्ती व त्रिभाषा सुत्रा विरोधात दोन मोर्चे निघणे योग्य दिसत नसल्याचे यावेळी राज ठाकरे म्हणाले. त्यामुळे दोन्ही पक्षांचे मोर्चे एकाच दिवशी म्हणजेच ५ जुलै रोजी एकत्र काढण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे खासदार संजय राऊत म्हणाले.
विशेष म्हणजे संजय राऊत यांनी जेव्हा समाज माध्यमावर हि गोष्ट जाहीर केली तेव्हा त्यांनी आणखी एका इंग्रजी भाषेत केलेल्या पोस्ट मध्ये केंद्रीय गृह मंत्री अमित शाह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले आहे. याच वेळी मनसे तर्फे संदीप देशपांडे यांनीही पत्रकारांना काल पडद्यामागे घडलेल्या गोष्टींची माहिती दिली. दोन्ही ठाकरे बंधू किमान मोर्चानिमित्त एकत्र येण्याची घोषणा झाल्यानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली. गतवर्षी झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसेने भाजप व एकूणच महायुतीला उघड कमी अंशतः पाठींबा दिला होता. त्यावेळी महायुतीच्या गळाला लागलेल्या राज ठाकरे यांनी ऐन मुंबई महापालिका निवडणुकीआधी त्यांना कात्रजचा घाट दाखवला असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
