
“भाजपविरोधी पक्षांनी एकत्र यायची गरज आहे” – शरद पवार
मुंबई, दि. २५: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांची यशवंतराव चव्हाण, मुंबई येथे आज भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी संवाद साधत अरविंद केजरीवाल यांनी या भेटीमागील कारण स्पष्ट केले. ते म्हणाले की, २०१५ साली दिल्लीत आपचं सरकार आल्यानंतर केंद्र सरकारने एक अध्यादेश काढून अधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याचा दिल्ली सरकारचा अधिकार काढून घेतला. यासाठी आपने ८ वर्षे न्यायालयीन लढा दिला. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आमच्या बाजूने लागला. तरीही केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात अध्यादेश आणला आहे. लोकसभेमध्ये भाजपकडे बहुमत आहे, पण राज्यसभेत त्यांच्याकडे बहुमत नाही, त्यामुळे देशभरातल्या विरोधकांनी या अध्यादेशाविरोधात राज्यसभेत मतदान करावं, अशी विनंती अरविंद केजरीवाल यांनी यावेळी केली.
या मागणीचे समर्थन पवार यांनी केले. यावेळी शरद पवार म्हणाले की, ‘सध्या लोकशाहीवर आघात होतोय, ही समस्या फक्त एका दिल्लीची नाही तर देशाची आहे. केजरीवाल समर्थन मागण्यासाठी आले आहेत. केजरीवालांना राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा आहे. भाजपविरोधी पक्षांनी एकत्र यायची गरज आहे. आपण देशभरातल्या विरोधकांसोबत बोलू, असा विश्वास पवार साहेबांनी अरविंद केजरीवाल यांना दिला.