Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

“सर्वोच्च न्यायालयाच्या कायदेशीर जागरूकता व न्याय तुमच्या दारी मोहिमेस महाशिबिरातून यश मिळेल” – न्यायमूर्ती  ए. ए.सय्यद

वळसंग येथे न्या. सय्यद यांच्या हस्ते विधी सेवा  महाशिबिराचे उद्घाटन

सोलापूर: घटनेने भारतीय नागरिकांना दिलेल्या हक्क व अधिकारांबाबत जागृत करणे आणि शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यत पोहोचविणे यासाठीच महाशिबीर आयोजित केले आहे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. ए. सय्यद यांनी केले.

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज वळसंग येथील श्री. शंकरलिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूल येथे महाशिबीराच्या उद्घाटनप्रसंगी न्यायमूर्ती सय्यद बोलत होते. यावेळी न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक, एन. जे. जमादार, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.आर. देशपांडे, राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डी. पी. सुराणा, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, ॲड.  मिलिंद थोबडे यांच्यासह जिल्हयातील सर्व न्यायाधिश, वकील, शासकीय अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी बोलतांना न्यायमूर्ती सय्यद म्हणाले की, स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्षपूर्तीचे औचित्य साधून केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालयाने कायदेशीर जागरूकता व न्याय तुमच्या दारी हे ध्येय निश्चित करून ही मोहिम राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली यांच्यामार्फत भारतभर राबविण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांमध्ये कायदेशीर जागरूकता निर्माण करण्यासाठी २ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर २०२१ या कालावधीमध्ये आयोजन करण्यात आले आहे. संविधानाने भारतीय नागरिकांना दिलेल्या हक्क व अधिकारांबाबत जागृत करणे आणि त्या अधिकारांचे उल्लंघन झाल्यास त्याचे निराकरण करण्यासाठी उपलब्ध असलेल्या विविध यंत्रणा व शासकीय सुविधा याबाबत जागृती करण्याचे उद्दीष्ट निश्चित केले आहे. भारतीय नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी उपलब्ध माध्यमे म्हणजे पोलीस, कार्यपालिका व न्यायपालिका यांच्याशी संपर्क साधण्याचा आणि त्यांचा वापर करण्याच्या पध्दतीची जाणीव करून देण्यासाठी हे जनसंपर्क अभियान खूपच महत्वाचे आहे.

समाजातील दुर्बल घटकांना या शिबीरामार्फत शासकीय योजनांची माहिती देवून पात्र लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळणे सोपे होईल. ज्या नागरिकांच्या काही समस्या असल्यास त्यांनी तत्काळ कोणत्याही न्यायालयात संपर्क साधावा त्यांना तेथून सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

जिल्हाधिकारी शंभरकर यावेळी म्हणाले की, आज याठिकाणी जिल्हा प्रशासन व विधी सेवा प्राधिकरण मार्फत ‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत या महाशिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. यात विधी सेवा प्राधिकरण तसेच शासनाच्या विविध योजनांबाबत नागरीकांना माहिती देण्यात येणार आहे. जेणेकरुन पात्र लाभार्थी याचा लाभ घेऊ शकतील व योजनेचा उद्देश सफल होईल. विधी सेवा प्राधिकरणामार्फत कायेदशीर मोफत सल्ला देण्यात येतो व गरजूंना सहकार्य केले जाते. त्यांच्यामार्फत “मोनोधैर्य” व Victim Compensation Scheme  या योजना राबविण्यात येतात. याची माहिती आपणास उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

महसूल विभागातर्फे राज्य शासनाच्या विविध योजना राबविण्यात येतात. त्याची माहिती व लाभ शेवटच्या सर्व लाभार्थ्यांना मिळावा यासाठी शासन नेहमीच प्रयत्नशील असते. याचाच भाग म्हणून याठिकाणी आज ३२ विभागाचे ३८ स्टॉल उभारण्यात आले आहेत. या स्टॉलच्या माध्यमातून शासनाच्या विविध सेवा एका छताखाली उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यात जनमाणसांशी नित्य संबंध येणाऱ्या विभागाचे स्टॉल लावण्यात आले आहेत. यात मुख्यत्वे महसूल, कृषी, आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण यांचा समावेश आहे. लाभार्थींना एकाच ठिकाणी योजनांची माहिती देणे, अर्ज भरुन घेणे, योजनेस आवश्यक असलेल्या कागदपत्रांची व निकषांची माहिती देणे इत्यादी कामे केली जाणार आहेत. तसेच याठिकाणी प्रातिनिधीक स्वरुपात काही लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. याठिकाणी कोविड लसिकरणाचा स्टॉल उभा करण्यात आला आहे. यात ज्या १८ वर्षावरील नागरीकांनी अद्यापपर्यंत कोविड लस घेतलेली नाही अशा जास्तीत जास्त नागरिकांनी येथे लस घ्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यातील सर्व मतदारसंघातील मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम सुरु आहे. दि.१ नोव्हेंबर रोजी प्रारुप यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यावर दि.१ ते ३० नोव्हेंबरपर्यंत दावे व हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. २० डिसेंबरपर्यंत हरकती निकाली काढण्यात येणार असून ५ जानेवारी २०२२ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. निवडणुकासाठी मतदार यादी अद्ययावतीकरण आणि शुद्धीकरणसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर १३, १४ आणि २७, २८ नोव्हेंबर रोजी विशेष शिबिराचे आयोजन केलेले आहे. येथे १८ वर्ष पूर्ण झालेल्या मदतदारांचे नाव नोंदणी, मतदार यादीतून नाव वगळणी तसेच नावाची दुरुस्ती याबाबत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे याचा लाभ नागरीकांनी घ्यावा. प्रत्येक मतदाराला voter help line या ऍपच्या माध्यमातून मतदार यादीतील नाव पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच National Voter Service Portal NVSP मधून E- EPIC कार्ड download करणे तसेच सर्व फॉर्म ऑनलाईन भरण्याची सुविधा मा. निवडणूक आयोगाने निर्माण केली आहे, याचाही लाभ नागरिकांनी घ्यावा, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच  इथे लावलेल्या स्टॉलला आपण भेट द्यावी व आपल्या पात्रतेनुसार योग्य त्या योजनेचा लाभ घ्यावा. तसेच यावेळी न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक, एन. जे. जमादार यांनीही आपले विचार व्यक्त केले. या प्रसंगी २४ लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला.

या महाशिबीरामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, महिला व बालविकास कार्यालय, बचत गट, राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा शल्य चिकित्सक, आरोग्य विभाग, कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, स्वच्छ भारत अभियान, शिक्षण विभाग, पुरवठा विभाग, महसूल विभाग, विशेष सहाय्य योजना, महा ई सेवा केंद्र, पोस्ट ऑफिस, सामाजिक वनीकरण विभाग, पोलीस विभाग, सहाय्यक कामगार आयुक्त, समाजकल्याण विभाग, आदिवासी विभाग, जिल्हा उद्योग केंद्र , खादी ग्रामोद्योग महामंडळ, कौशल्य विकास विभाग, आण्णाभाऊ साठे महामंडळ, उपप्रादेशिक परिवहन विभाग, महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग, लघु पाटबंधारे विभाग, निबंधक सहकारी संस्था, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग, इंटरनॅशनल जस्टिस मिशन, विपला फांऊडेशन इत्यादीं मार्फत स्टॉल उभारण्यात आले होते.

प्रास्ताविक जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. आर. देशपांडे यांनी केले. आभार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव शशिकांत मोकाशी यांनी मानले.

या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांची नाष्टा व जेवणाची सोय स्वामी समर्थ अन्नछत्र, अक्कलकोट यांचेमार्फत करण्यात आली होती.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *