गंभीर दुखापतीनंतरही दाखवले प्रसंगावधान; मुंबईकर वैमानिकाला ‘खरा हिरो’ म्हणत अभिनंदन
मुंबई, दि. ०१ : मुंबईचे वैमानिक कॅप्टन स्मित माछर यांनी स्वतःवर प्राणघातक हल्ला झाल्यानंतरही विमानातील १८० प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत दाखवलेल्या धैर्याची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. गंभीर दुखापत झालेली असतानाही त्यांनी प्रसंगावधान राखून प्रवाशांचे प्राण वाचवल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले असून, त्यांना महाराष्ट्राचा अभिमान असल्याचे म्हटले आहे.
फ्लाय दुबईच्या विमानाचे वैमानिक असलेल्या कॅप्टन स्मित माछर यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. या गंभीर प्रसंगातही त्यांनी धीर न सोडता परिस्थिती हाताळली आणि विमानातील १८० प्रवाशांचे प्राण वाचवले. प्रतिकूल परिस्थितीत दाखवलेल्या त्यांच्या धैर्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन संदेशातून कॅप्टन स्मित यांच्या धाडसाचे विशेष कौतुक केले. गंभीर दुखापतीनंतरही त्यांनी दाखवलेली तत्परता आणि संकटाच्या वेळी घेतलेली जबाबदारी उल्लेखनीय असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, या कठीण प्रसंगात प्रवाशांनीही एकजुटीने आणि तत्परतेने काम केल्याबद्दल त्यांचेही मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे, ‘मुंबईचा सुपुत्र आणि खरा ‘हिरो’ कॅप्टन स्मित यांच्याबद्दल मला अभिमान वाटतो. स्मित यांनी अत्यंत असाधारण आणि विलक्षण पद्धतीने शेकडो लोकांचे प्राण वाचवले! गंभीर दुखापतीतही स्मित यांनी दाखवलेली प्रसंगावधानता आणि धैर्य खरोखरच अनुकरणीय आहे. कठीण प्रसंगात प्रवाशांनीही एका टीमप्रमाणे तत्परतेने काम केलं, त्यांनाही सलाम. स्मित लवकर बरे व्हावे आणि त्यांना उत्तम आरोग्य लाभो, अशी कामना करतो! आपण युवकांसाठी प्रेरणास्थान आहात. महाराष्ट्र आणि देशाला आपला अभिमान वाटतो, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन संदेशात म्हटले आहे.
कॅप्टन स्मित माछर यांनी संकटाच्या क्षणी दाखवलेले धैर्य आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी केलेले प्रयत्न यामुळे त्यांचे नाव चर्चेत आले आहे. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी सदिच्छाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.
