राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकारातून आयोजन; सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकात्मता, निरोगी जीवनशैली आणि नशामुक्तीचा संदेश
पुणे, दि. १६ : पुण्यात रविवारी आयोजित ‘राष्ट्रीय एकता दौड’मध्ये विविध वयोगटांतील नागरिकांसह देशभरातून आलेल्या धावपटूंनी सहभाग घेतला. सुमारे ४० हजार धावपटूंनी नोंदणी केलेल्या या मॅरेथॉनच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतेसोबतच व्यसनमुक्त आणि निरोगी भारताचा संदेश देण्यात आला. केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकारातून सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
लोकमान्य टिळक चौकातील (अलका टॉकीज) प्रारंभस्थळावरून मान्यवरांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर दौडला सुरुवात झाली. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार तथा भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
या मॅरेथॉनमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील धावपटूंबरोबरच देशाच्या विविध भागांतील स्पर्धक सहभागी झाले होते. पुण्यातील नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती लावत उपक्रमाला प्रतिसाद दिला. तरुणांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेकांनी धावण्यात सहभाग घेतला.
दौडच्या माध्यमातून ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेला आणि ‘नशामुक्त युवा भारत’च्या संदेशाला महत्त्व देण्यात आले. नियमित व्यायाम, आरोग्यदायी जीवनशैली आणि व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन या उपक्रमातून करण्यात आले.
लोकमान्य टिळक चौकातून सुरू झालेल्या या दौडचा समारोप फर्ग्युसन महाविद्यालय येथे झाला. मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाल्याने पुण्यातील या उपक्रमाला व्यापक प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

