“सफाई कर्मचाऱ्यांसाठी आधुनिक वसाहत उभारणार” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आठशेहून अधिक कुटुंबांना हक्काची घरे मिळणार
नागपूर, दि. १२ : सफाई कर्मचाऱ्यांसह समाजातील प्रत्येक घटकाचा आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक स्तर उंचावणे हे राज्य शासनाचे प्रमुख उद्दिष्ट असून, नागपूर महानगराच्या वाढत्या गरजा आणि भविष्यातील आव्हाने लक्षात घेता लाड-पागे समितीच्या शिफारसींनुसार सुमारे ५०० जणांना लवकरच नियुक्तीचे आदेश निर्गमित करण्यात येणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
नागपूर महानगरपालिकेच्या वतीने महर्षी सुदर्शन वाल्मिकी वसाहत तसेच प्रधानमंत्री आवास योजना २.० (शहरी) अंतर्गत उभारण्यात येणाऱ्या ‘स्वप्नपूर्ती’ सदनिका प्रकल्पाच्या भूमिपूजन समारंभात मुख्यमंत्री बोलत होते.
यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, महसूलमंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वित्त राज्यमंत्री ॲड. आशीष जयस्वाल, महापौर नीता ठाकरे, सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंह डागोर, उपमहापौर लिला हातीबेड, स्थायी समितीच्या अध्यक्षा शिवानी दाणी, माजी महापौर दयाशंकर तिवारी, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विपीन इटनकर तसेच विविध लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महर्षी सुदर्शन वाल्मिकी यांच्या नावाने सफाई कर्मचाऱ्यांसाठी ही वसाहत उभी होणार असल्याने वसाहतीच्या कामात कुठलीही कमतरता राहू नये याची दक्षता घेण्याचे निर्देश” त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
ते पुढे म्हणाले, “गरिबांच्या घराच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रधानमंत्री आवास योजना ही अत्यंत महत्त्वाची अशी योजना आहे. आगामी काळात सर्व विधानसभा क्षेत्रांत या योजनेची अंमलबजावणी होणार आहे.”
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, राज्य शासन सफाई कर्मचाऱ्यांच्या जीवनमानात दर्जात्मक सुधारणा करण्यासाठी पायाभूत सुविधा, सुरक्षित निवास, आरोग्य आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर भर देत आहे. लाड-पागे समितीच्या शिफारसींची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करून आवश्यक मनुष्यबळाची भरती करण्यात येणार असून, त्यामुळे नागपूर महानगरपालिकेच्या सेवा अधिक सक्षम होतील.
“अत्यंत स्तुत्य प्रकल्प” – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, “सुदर्शन वाल्मिकी समाजाचे जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेचा हा प्रकल्प अत्यंत स्तुत्य आहे.”
ते पुढे म्हणाले, “दोन्ही प्रकल्पांच्या माध्यमातून आठशे ते नऊशे कुटुंबांना हक्काची घरे मिळणार असून राज्य सरकारने त्याकडे विशेष लक्ष दिले आहे. समाजाने आता आधुनिक काळाच्या गरजा लक्षात घेऊन हॉस्पिटॅलिटीच्या क्षेत्रात पदार्पण करावे, छोट्या-छोट्या कंपन्या सुरू करून सेवा पुरवाव्या आणि रोजगारांची निर्मितीही करावी.”
महर्षी सुदर्शन वाल्मिकी वसाहतीत उभारल्या जाणार आधुनिक सुविधा
नागपूर महानगरपालिकेच्या वतीने मौजा नारी येथे उभारण्यात येणाऱ्या महर्षी सुदर्शन वाल्मिकी वसाहतीत सफाई कर्मचाऱ्यांसाठी एकूण १४ इमारतींमध्ये दोन बीएचकेच्या ३९२ सदनिका उभारण्यात येणार आहेत.
याशिवाय प्रधानमंत्री आवास योजना २.० (शहरी) अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘स्वप्नपूर्ती’ गृहनिर्माण प्रकल्पात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी एक आणि दोन बीएचकेच्या एकूण ५१८ परवडणाऱ्या सदनिका उभारण्यात येणार आहेत.
दोन्ही प्रकल्प तीन वर्षांच्या कालावधीत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असून, वसाहतीमध्ये उद्यान, शुद्ध पाणीपुरवठा, सौरऊर्जा व्यवस्था, खेळाचे मैदान, अंतर्गत रस्ते, सुरक्षा व्यवस्था आणि इतर सर्व आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
समाजाच्या उन्नतीसाठी शासनाची वचनबद्धता
महापौर नीता ठाकरे यांनी प्रास्ताविकातून दोन्ही प्रकल्पांची माहिती दिली. उपमहापौर लिला हातीबेड यांनी राज्य शासन आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून समाजाच्या उन्नतीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा उल्लेख केला. तर सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंह डागोर यांनी या महत्त्वपूर्ण विकासकामांसाठी राज्य शासन आणि नागपूर महानगरपालिकेचे आभार मानले.
या प्रकल्पांमुळे सफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षित, सुसज्ज आणि सन्मानजनक निवासाची सुविधा उपलब्ध होणार असून, आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांच्या घराच्या स्वप्नाला प्रत्यक्ष आकार मिळणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

