Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

लोकांनी फक्त बटणच दाबायचे आहे, दुसरे काय? : शिवसेना

लोकांनी फक्त बटणच दाबायचे आहे, दुसरे काय? : शिवसेना

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काल कलम ३७० संबंधी व्याख्यानानिमित्त मुंबईत आले होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील हे ठासून सांगितले. यामुळे दुखावलेल्या शिवसेनेने आपली खदखद सामनाच्या आजच्या अग्रलेखातून मांडली आहे.

या अग्रलेखात शिवसेना म्हणते, “राष्ट्रीय प्रश्नांची एक प्रकारची नशा असते आणि मग इतर विषय गौण ठरतात. राज्यांच्या प्रश्नांवर नंतर केव्हाही बोलता येईल असे सध्या वातावरण आहे. गुंतवणूक, शेती, शिक्षण, उद्योग, आरोग्य अशा क्षेत्रांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्राला पुढे नेले असे प्रमाणपत्र अमित शहा यांनी दिले व तेच पुढचे मुख्यमंत्री असे मुंबईत येऊन जाहीर केले. त्यामुळे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका हा आता केवळ औपचारिकपणाच उरला. लोकांनी फक्त बटणच दाबायचे आहे, दुसरे काय?”

सविस्तर अग्रलेख वाचा

महाराष्ट्रात 21 ऑक्टोबरला मतदान आणि 24 तारखेला मतमोजणी होईल. याच दिवसात हरयाणाचीही विधानसभा निवडणूक होत आहे. हा सर्व कार्यक्रम दिवाळीआधीच संपणार असल्याने मंदीच्या बाजारात फटाके व मिठायांची आवक वाढणार आहे. विधानसभेचा कार्यकाळ 9 नोव्हेंबर 2019 ला संपेल. त्यामुळे महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री, नवे राज्य मिळेल. निवडणुका एकाच टप्प्यात होत आहेत हे महत्त्वाचे. मतदारांच्या मनात काय आहे व राज्याचे निकाल काय लागतील हे सांगायला आता भविष्यवाल्या पोपटरावांची गरज नाही. लोकसभा निवडणुकांतील निकालांपेक्षा वेगळे काही घडण्याची शक्यता आज तरी दिसत नाही. नवे राज्य, नवे मुख्यमंत्री महाराष्ट्रात 10 नोव्हेंबरनंतर सूत्रे हाती घेतील, पण तो नवा मुख्यमंत्री मीच असेन, दुसरा कोणीही नाही असे श्री. देवेंद्र फडणवीस यांनी ठामपणे जाहीर केले आहे. याचा अर्थ त्यांनी हायकमांडशी यावर चर्चा केली आहे व तसा शब्द घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काल मुंबईत होते. त्यावेळी बोलतांना त्यांनी 370 कलम हटविण्याच्या निर्णयाचे समर्थन करत विरोधकांचा जोरदार समाचार घेतला. या निर्णयाचे देशाला आणि समाजाला कसे फायदे होणार आहेत हेदेखील सांगितले. त्याचवेळी त्यांनी फडणवीस यांना राजतिलकदेखील लावला. याआधी चंद्रकांत पाटलांचे असे म्हणणे होते की, निवडून आलेले आमदार नेता निवडतील व दिल्लीश्वरांच्या आदेशाने जे व्हायचे ते होईल. ते आता होणार नाही. महाराष्ट्रात यावेळी पाऊस चांगला झाला आहे. मराठवाड्यात दुष्काळ आहे. कुठे पूर तर कुठे होरपळ आहे, पण चंद्रकांत पाटील यांनी

आत्मविश्वासाने सांगितले

की,देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यातील सर्व प्रश्न मार्गी लावले आहेत. महाराष्ट्रात आता कोणतेच प्रश्न शिल्लक नाहीत. असा आत्मविश्वास याआधी कोणत्याही पक्षाने दाखवला नव्हता. ही ऊर्जा, हा आत्मविश्वास ज्यांच्यापाशी आहे त्यांच्यासाठी विजयाचा मार्ग सुकरच होत असतो. भाजपकडे हा आत्मविश्वास आहे असेच एकंदरीत वातावरण दिसते. त्याचा आम्हाला आनंदच आहे. महाराष्ट्रात विरोधी पक्ष आधीच गर्भगळीत होऊन पडले आहेत. काँग्रेस पक्ष व राष्ट्रवादीतील दिग्गज नेते, विद्यमान आमदारांनी भाजपात व शिवसेनेत प्रवेश केला आहे. काँग्रेस अतिदक्षता विभागात आहे तर राष्ट्रवादी लटपटत्या पायांवर उभी आहे. शरद पवार हे महाराष्ट्र पालथा घालीत आहेत, पण उपयोग काय? त्यांची तडफ वाखाणण्यासारखी आहे इतकेच. मुख्यमंत्र्यांनी सांगितले, ‘शरद पवारांचे ‘पर्व’ महाराष्ट्रातून संपले आहे.’ इथे ‘पर्व’ हा शब्द त्यांनी वापरला आहे. जो काही घडवतो, निर्माण करतो त्याचेच ‘पर्व’ असते व पर्व हे कधीतरी संपतच असते. बाकी सर्व ‘माजी’ ठरतात. मुख्यमंत्र्यांनी असाही आरोप केला आहे की, ‘पवारांनी तोडफोडीचे राजकारण केले. त्याची फळे ते भोगत आहेत.’ अर्थात तोडफोडीच्या राजकारणामुळेच सध्या अनेक पक्ष तरारत आहेत हे महाराष्ट्राची जनता पाहत आहे. निवडणुका लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठी माणसे तोडून फोडूनच घ्यावी लागतात, हा आजवरचा इतिहास आहे. विचारांच्या पायऱ्या आता ढिल्या पडत आहेत, पण हे सर्व केले तरी

लोकांचे प्रश्न

सुटायला हवेत. ते खरेच सुटले असतील तर युतीला 250 पेक्षा जास्त जागा महाराष्ट्रात मिळतील. काँग्रेसचे नेते म्हणतात, युतीच्या राजवटीबद्दल जनतेत संताप आहे. पण तरीही लोकसभा निवडणुका देशभरात भाजपने जिंकल्या आहेत. निवडणुका लढण्यासाठी सुसज्ज कार्यकर्त्यांची जी फळी लागते ती आज काँग्रेस पक्षाजवळ शिल्लक आहे काय? मुळात लोकांच्या भावना वेगळ्या व काँग्रेस पक्षाचे धोरण त्याविरोधात असे सुरू आहे. 370 कलमाच्या बाबतीत काँग्रेसने लोकविरोधी भूमिका घेऊन आपले उरलेसुरले अस्तित्व संपवून टाकले. महाराष्ट्रात विकास, बेरोजगारी, कर्जमाफीतला गोंधळ, पीक विमा योजनेतील त्रुटी या प्रश्नांवर सत्तेत असूनही शिवसेनेने आवाज उठवला. ते मार्गीही लावले. आज त्यावर बोलणारे विरोधक त्यावेळी मात्र गप्प होते. भाजपचे नेते सध्या 370 कलमावर बोलत आहेत आणि लोकही सर्व विसरून ते ऐकत आहेत. त्यामुळे चंद्रकांतदादा म्हणतात त्याप्रमाणे राज्यात प्रश्न उरलेले नाहीत व काँग्रेसने नसलेले प्रश्न उगाच उकरून काढू नयेत. राष्ट्रीय प्रश्नांची एक प्रकारची नशा असते आणि मग इतर विषय गौण ठरतात. राज्यांच्या प्रश्नांवर नंतर केव्हाही बोलता येईल असे सध्या वातावरण आहे. गुंतवणूक, शेती, शिक्षण, उद्योग, आरोग्य अशा क्षेत्रांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्राला पुढे नेले असे प्रमाणपत्र अमित शहा यांनी दिले व तेच पुढचे मुख्यमंत्री असे मुंबईत येऊन जाहीर केले. त्यामुळे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका हा आता केवळ औपचारिकपणाच उरला. लोकांनी फक्त बटणच दाबायचे आहे, दुसरे काय?

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *