
सीवूड्सच्या एस एस हायस्कुलमध्ये वर्तमानपत्रांपासून कागदी पिशव्या तयार करीत विद्यार्थ्यांची प्रतिबंधात्मक प्लास्टिक विरोधात कृती
नवी मुंबई, दि. १०: स्वच्छतेसोबतच पर्यावरणाला विघातक असणा-या प्लास्टिकचा वापर रोखण्यासाठी जनजागृती करण्यासोबतच प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमा विभाग कार्यालयांमार्फत तसेच परिमंडळ स्तरावरील पथकांमार्फत राबविण्यात येत आहेत. या अनुषंगाने ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४’ अंतर्गत सद्यस्थितीत सुरू असलेल्या ‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’ या मोहिमेमध्ये नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे साहेब यांच्या निर्देशानुसार शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना स्वच्छतेसोबत प्लास्टिक प्रतिबंधाचे महत्व पटवून देण्यात येत आहे.
याकरिता घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि शालेय शिक्षण विभाग संयुक्तपणे कार्यवाही करीत आहे. अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, शिक्षण विभागाच्या उपआयुक्त संघरत्ना खिल्लारे तसेच घनकचरा विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे यांच्या मार्गदर्शनाखाली अशाच प्रकारचा अभिनव उपक्रम एस.एस. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सीवूडस या ठिकाणी परिमंडळ १ चे उपआयुक्त सोमनाथ पोटरे व बेलापूर विभागाचे सहा. आयुक्त शशिकांत तांडेल आणि स्वच्छता अधिकारी सूर्यकांत म्हात्रे यांच्या नियंत्रणाखाली राबविण्यात आला.

या उपक्रमांतर्गत एस.एस. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सीवूडस येथील विद्यार्थ्यांना प्लास्टिकपासून होणारी मानवी जीवनाची व निसर्गाची हानी विविध प्रकारची माहिती देत पटवून देण्यात आली तसेच प्लास्टिक पिशव्यांनी कापडी – कागदी पिशव्यांचा पर्यावरणपूरक पर्याय वापरात आणावा यासाठी प्रोत्साहीत करण्यात आले. विशेष म्हणजे यावेळी वर्तमानपत्रांपासून आकर्षक कागदी पिशव्या तयार करण्याचे प्रशिक्षणही विद्यार्थ्यांना देण्यात आले. रद्दीत जाणा-या वर्तमानपत्रांचा उपयोग पिशव्यांकरिता होत असल्याने व तोही स्वत:च्या हाताने पिशव्या बनवून केला जात असल्याने विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले होते. थ्री आर ची संकल्पना राबविताना टाकाऊपासून टिकाऊ निर्मितीचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला.
त्याचप्रमाणे यावेळी विद्यार्थ्यांना कच-याचे घरापासूनच ३ प्रकारे वर्गीकरण करणे, कम्पोस्ट पीटव्दारे कच-याची विल्हेवाट लावणे, प्लास्टिकचा वापर टाळणे, थ्री आरचे महत्व अशा विविध बाबींची माहिती देण्यात आली व त्याची स्वत:पासूनच अंमलबजावणी करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. या उपक्रमाच्या आयोजनासाठी रोटरॅक्ट क्लब ऑफ नवी मुंबई यांचे बेलापूर विभाग कार्यालयाला अनमोल सहकार्य लाभले. याप्रसंगी स्वच्छता व प्लास्टिक प्रतिबंधात्मक तसेच माझी वसुंधरा अभियानाची शपथ देण्यात आली. या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक संतोष पाटील व ज्योत्स्ना नायर आणि शिक्षकवृंद तसेच बेलापूर विभागातील सर्व स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते.