रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा तिसरा वर्धापन दिन
मुंबई, दि. १७ : राज्यातील कौशल्य विकासाला गती देण्यासाठी रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या विस्ताराला प्राधान्य देत आगामी काळात राज्यभरात ५० ठिकाणी शाखा सुरू करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कौशल्याधारित शिक्षणासोबत रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्यावर भर देण्यात येणार असून, उद्योगांच्या गरजेनुसार सक्षम मनुष्यबळ तयार करण्याचा उद्देश आहे.
रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या संदर्भातील दिशा स्पष्ट केली. विद्यापीठाने सिंगापूरच्या कौशल्य शिक्षण पद्धतीचा आदर्श घेऊन विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाशी निगडित प्रशिक्षण द्यावे, तसेच शिक्षण पूर्ण केल्यानंतर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील यासाठी अभ्यासक्रम अधिक परिणामकारक करावेत, असे त्यांनी नमूद केले.
राज्यात कौशल्याधारित शिक्षणाला चालना देण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत असून, त्यामध्ये उद्योजकता विकासालाही महत्त्व दिले जात आहे. मुख्यमंत्री महाफंड योजनेअंतर्गत सुलभ व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्याची तरतूद असून, त्यातून मोठ्या प्रमाणावर नवीन उद्योजक निर्माण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि प्रशिक्षण केंद्रांशी समन्वय साधून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योगांशी जोडण्यावरही भर दिला जात आहे.
तसेच, राज्यात स्टार्टअप्सना चालना देण्यासाठी आवश्यक आर्थिक सहाय्य आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कौशल्य शिक्षण, नवोन्मेष आणि उद्योजकता यांचा संगम घडवून आणण्याच्या दृष्टीने विविध विभागांमध्ये समन्वय साधण्यावर शासनाचा भर असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
कार्यक्रमात विद्यापीठाशी संलग्न विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धांतील यशाचा गौरव करण्यात आला. तसेच शैक्षणिक व प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. या उपक्रमांमुळे कौशल्य विकासाच्या क्षेत्रात राज्याची वाटचाल अधिक मजबूत होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
